Breaking News

‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा भाजपाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष आणि खजिनदाराची चौकशी कराः नाना पटोले

युद्धनौका आयएनएस ‘विक्रांत बचाव’ मोहिमेच्या नावाखाली भाजपा व किरीट सोमय्या यांनी सर्वसामान्य जनतेकडून जमा केलेल्या पैशांचा हिशोब जनतेला दिला पाहिजे. किरीट सोमय्या यांनी जमा केलेला निधी भारतीय जनता पक्षाला दिला असे सांगितले आहे. सर्वसामान्य जनतेचा हा विश्वासघात असून तो गंभीर गुन्हा सुद्धा आहे. सोमय्यांनी हा निधी भारतीय जनता पक्षाला दिला असेल तर ह्या पक्षाची व या पक्षाच्या तत्कालीन प्रदेशाध्यक्ष तसेच खजिनदाराची चौकशी करावी, अशी मागणी काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी केली.
यासंदर्भात बोलताना नाना पटोले म्हणाले की, आयएनएस ‘विक्रांत बचाव’च्या मोहिमेअंतर्गत १४० कोटी रुपये जमा करण्याचा किरीट सोमय्या यांचा निर्धार होता. त्यासाठी किरीट सोमय्या व भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी हातात डबे घेऊन सर्वसामान्य लोकांकडून ‘सेव्ह विक्रांत’च्या नावाखाली रोख पैसे जमा केले, या पैशांची कोणतीही पावती लोकांना दिलेली नाही. त्यासाठी कोणतीही परवानगी घेतल्याचेही स्पष्ट झालेले नाही. जनतेकडून जमा केलेली रक्कम राजभवन, राष्ट्रपतीभवन अथवा संरक्षण मंत्रालय यापैकी कोणाकडेही जमा न करता जनतेचा हा पैसा सोमय्या यांनी भारतीय जनता पक्षाकडे जमा केल्याचे सोमय्या यांच्या वकिलांनी उच्च न्यायालयात सांगितल्याच्या बातम्या प्रसारमाध्यमात आलेल्या आहेत. हा जनतेचा विश्वासघात असून खोटे बोलून वसुली केली आहे. जर भारतीय जनता पक्षाने हा पैसा घेतला असेल तर तोही गुन्हाच आहे, म्हणून भारतीय जनता पक्ष व त्या पक्षाच्या प्रदेशाध्यक्षांवर कारवाई झाली पाहिजे. ‘विक्रांत बचाव’चा पैसा हडपणा-या भाजपलाही सहआरोपी करा अशी मागणी केली.
‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली भाजपाने जनतेच्या भावनेशी खेळ केला आहे. सोमय्या यांच्या वकिलाच्या दाव्यानुसार ११ हजार रुपये जमा केल्याचे समजते पण ही रक्कम यापेक्षा नक्कीच मोठी आहे. तो रोख पैसा भाजपाने कसा घेतला व त्याचा कशासाठी वापर केला हे जनतेला जाणून घ्यायचा अधिकार आहे. ‘विक्रांत बचाव’च्या नावाखाली केलेल्या वसुली प्रकरणी सोमय्या यांच्याबरोबर भाजपाचीही चौकशी करुन कडक कारवाई झाली पाहिजे अशी मागणीही त्यांनी केली.

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *