Breaking News

मराठा समाजाला आरक्षण; महायुती सरकारचा ऐतिहासिक निर्णय

मराठा समाजाला शिक्षण व नोकरीत १० टक्के आरक्षण देण्याचे विधेयक विधिमंडळाचे विशेष अधिवेशन बोलावून एकमताने संमत करण्याचा राज्यातील महायुती सरकारने आज ऐतिहासिक निर्णय घेतला. त्याबद्दल मी मुख्यमंत्री एकनाथजी शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे मनःपूर्वक अभिनंदन करतो. या ऐतिहासिक निर्णयाचे मी स्वागत करतो, अशी प्रतिक्रिया भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी व्यक्त केली.

एक्स या समाज माध्यमावर चंद्रशेखर बावनकुळे यांनी म्हटले आहे की, आजचा हा निर्णय अंत्योदयाला न्याय मिळवून देणारा आहे. गेली काही वर्षे राज्यातील मराठा समाजाच्या आरक्षणाबद्दलची आग्रही मागणी सरकारने मोठ्या आत्मीयतेने पूर्ण केली.मराठा समाजाला आरक्षण जरूर द्यावे, मात्र ते देताना सरकारने ओबीसी व इतर कोणत्याही समाजावर अन्याय करू नये ही आमची मागणी होती. त्या मागणीचा सन्मान सरकारने ठेवला, ही अत्यंत समाधानाची बाब आहे.

पुढे चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, सरकारने गेल्या चार महिन्यात अतिशय पारदर्शी व प्रामाणिक प्रयत्न यासाठी केले. सर्वपक्षीय नेत्यांची बैठक घेतली. न्या. सुनील शुक्रे यांच्या अध्यक्षतेखाली मागासवर्ग आयोग नेमला. महसूल विभागाकडून अतिशय शास्त्रीय राज्यव्यापी सर्वेक्षण केले. अखेर, आज शेवट गोड झाला. मराठा समाजाला टिकणारे आरक्षण महायुती सरकारने बहाल केले.

चंद्रशेखर बावनकुळे पुढे बोलताना म्हणाले, आजचा दिवस खूप मोलाचा आहे. समाजातील प्रत्येक घटकाला न्याय देणे, हेच लोककल्याणकारी सरकारचे प्रथम कर्तव्य असते, ते आज या सरकारने सिद्ध केले. पूर्वीच्या त्रुटी दूर करून न्यायालयाने आखून दिलेल्या मर्यादेबाहेर जाऊन आरक्षण दिले.बहुजन हिताय असा नारा बुलंद करत आरक्षणाची तटबंदी अधिक मजबूत केली.

पुढे बोलताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले, असे धाडसी निर्णय घेण्यासाठी विलक्षण राजकीय इच्छाशक्ती असावी लागते. सरकार जनतेचे असावे लागते, ते आज बावन्नकशी उजळून निघाले. कायद्याच्या चौकटीत राहून व कसोटीवर घासून सरकारने सामाजिक उन्नतीचा मार्ग प्रशस्त केला. सर्वच विरोधी पक्ष नेत्यांनी या विधेयकाला एकमताने पाठिंबा दिला, त्याबद्दल मी विरोधी पक्षांच्या नेत्यांचे मनापासून आभार मानतो.

Check Also

एनआयएकडून रामेश्वरन कॅफे स्फोटप्रकरणातील आरोपींना अटक

राष्ट्रीय तपास संस्थेने (NIA) बेंगळुरू येथील रामेश्वरम कॅफेमध्ये झालेल्या स्फोटामागील मुख्य आरोपीला पश्चिम बंगालमधून अटक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *