मुंबई: प्रतिनिधी
मागील काही दिवसांपासून बॉलीवूड अभिनेता स्व. सुशांतसिंग राजपूत यांच्या आत्महत्येच्या तपासावरून सुरु झालेल्या राजकिय आरोप-प्रत्यारोपाचा सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालामुळे अखेर शेवट झाला. न्यायालयाने मुंबई पोलिसांच्या तपासावर कोणताही दोषारोप न ठेवता मुंबई पोलिसांकडे असलेला हा तपास राजपूतच्या कुटुंबिय आणि बिहार सरकारच्या मागणीनुसार सीबीआयकडे वर्ग करण्याचा निर्णय दिला. हा तपास देताना मुंबई पोलिसांवर कोणताही दोषारोप ठेवला नाही ही अभिमानाची बाब असल्याची माहिती राज्याचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी दिली.
सुशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्याप्रकरणाचा तपास सीबीआयकडे वर्ग करण्यासंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालाचे आम्ही स्वागत करत असून सीबीआयला सर्वोतोपरी मदत मुंबई पोलिस करतील. बिहारच्या निवडणूका नजरेसमोर ठेवून काही राजकिय पक्षांच्या नेत्यांनी या प्रकरणाचे राजकिय भांडवल केल्याचा आरोप भाजपाचे नाव न घेता त्यांनी केला.
मात्र या निकालाच्या माध्यमातून राज्य सरकार, केंद्र सरकार यांच्यातील अधिकारांसंदर्भात नव्याने चर्चा करण्याची निर्माण झाली असून घटना तज्ञांकडून यावर प्रकाशझोताची आवश्यकता आहे. न्यायालयाच्या आदेशानुसार तपास सीबीआयकडे हस्तांतरीत करण्याबरोबरच तपासात सहकार्य करणार असल्याचे त्यांनी सांगितले.