Breaking News

प्रफुल पटेल यांचा दावा; आमच्यात फूट नाही मात्र, शरद पवारांची ती बैठक…. जयंत पाटील यांची नियुक्तीच बेकायदेशीर

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत नुकतीच राष्ट्रीय कार्यकारणीची बैठक झाली. त्या बैठकीत सुनिल तटकरे, प्रफुल पटेल यांच्यासह शपथ घेतलेल्या ९ आमदारांना पक्षातून निलंबित करण्याचा ठराव मंजूर करण्यात आला. त्यानंतर राज्यात अजित पवार गटाकडूनही आज पत्रकार परिषद घेत आपली बाजू मांडण्याचा प्रयत्न केला. यावेळी अजित पवार गटाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल पटेल म्हणाले, राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कोणत्याही प्रकारची फुट पडलेली नाही. फक्त सर्वाधिक आमदारांचा पाठिंबा हा अजित पवार यांना आहे. त्यामुळेच अजित पवार हे पक्षाचे अध्यक्ष असल्याचा दावा केला.

तसेच नवी दिल्लीत शरद पवार यांनी घेतलेल्या बैठकीबाबत विचारले असता प्रफुल पटेल म्हणाले, शरद पवार यांच्या नेतृत्वाखाली नवी दिल्लीत झालेली बैठक ही बेकायदेशीर आहे. तसेच त्यांनी केलेली कारवाई ही बेकायदेशीर आहे. वास्तविक पाहता यासंदर्भात आम्ही निवडणूक आयोगाकडे याचिका दाखल केली आहे. त्यावर निर्णय आल्यानंतर आमचीच राष्ट्रवादी खरी असल्याचे समजेल असा दावा करत पुढे ते बोलताना म्हणाले, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना त्या पदावर राहण्याचा कोणताही अधिकार नाही. तसेच त्यांच्या अपात्रतेसंदर्भातही याचिका दाखल करण्यात आली आहे. त्यामुळे ते बेकायदेशीर पध्दतीने काम करत आहेत.

पुढे बोलताना प्रफुल पटेल म्हणाले की, वास्तविक पाहता जोपर्यंत निवडणूक आयोगाकडून अंतिम निर्णय येत नाही तोपर्यंत कोणी कितीही कारवाई केल्या तरी त्याला अर्थ नाही असा दावाही केला.

यावेळी प्रफुल्ल पटेल म्हणाले की, ३० जूनला महत्वाची बैठक झाली. या बैठकीत अजित पवार यांची राष्ट्रीय अध्यक्ष म्हणून निवड करण्यात आली. तर, अजित पवार यांनी माझी कार्यकारी अध्यक्ष म्हणून निवड केली आहे. अनिल पाटील यांना विधानसभेचे आणि अमोल मिटकरी यांची विधानपरिषदेचे प्रतोद म्हणून नियुक्ती करण्यात आल्याचेही सांगितले.

शरद पवार यांचे फोटो वापरण्यास मनाई करण्यात आली आहे. मग, तुम्ही अधिकृत पक्ष सांगता, तर पक्षाचे नाव आणि चिन्ह वापरण्यावर शरद पवार गटाला बंदी घालणार का? पक्ष कार्यालयावर हक्क कधी सांगणार? असे विचारल्यावर प्रफुल्ल पटेल म्हणाले, पक्षाचे कार्यालय आमचं आहे, असं गृहित धरून रस्त्यावरील लढाई करण्यासाठी आम्ही उतरू इच्छित नाही. कारण, असं चुकीचं काम करून कोणालाही फायदा होणार नाही.

कायदेशीर बाजू मांडण्याचं काम आम्ही करू. अशोभनीय काम करण्याची इच्छा अजिबात नाही. नियमांप्रमाणे पुढील कारवाई करत होतो आणि करत राहणार, असं प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

नागालँडमधील आमदारांसह अन्य राज्यांतील सदस्यांचा तुम्हाला पाठिंबा आहे का? या प्रश्नावर प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं की, आम्ही याबाबत निवडणूक आयोगाकडे जे सांगायचे होतं. ते सांगितलं आहे. यावर निवडणूक आयोगासमोर सुनावणी होईल. तेव्हा सर्व स्पष्ट होणार आहे.
आमचे निर्णय अधिकृत आहेत. शरद पवार गटाचे निर्णय अधिकृत नाही असं प्रफुल्ल पटेल यांनी सांगितलं. तसंच आमच्या पक्षात अनेक वर्षे निवडणुका झालेल्या नाहीत. राष्ट्रवादीच्या पक्षिय बांधणीत नियमांची पायमल्ली झाली आहे. अजित पवार हेच आमचे नेते आहेत हे आम्ही विधानसभा अध्यक्षांनाही कळवलं आहे. नव्या नियुक्त्यांसाठी निवडणूक आयोगाकडे आम्ही अर्ज दिले आहेत. दिल्लीत पार पडलेली बैठक अधिकृत नाही असंही पटेल यांनी स्पष्ट केलं.

महाराष्ट्रात नऊ आमदारांचं निलंबन करण्यात आलं त्याला काही अर्थ नाही. राजकीय पक्ष कोण? हे निवडणूक आयोग ठरवू शकतो. आमच्या याचिकेवर निर्णय होईपर्यंत या कारवाईला काहीही अर्थ नाही असंही प्रफुल्ल पटेल यांनी म्हटलं आहे. तसंच मूळ राष्ट्रवादी पक्ष आम्हीच आहोत कारण आमच्याकडे आमदारांचं जास्त बळ आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट करत ३० तारखेला प्रतिज्ञापत्रासह सगळी प्रक्रिया आम्ही पूर्ण केली आहे. निवडणूक आयोग आता त्यावर निर्णय घेणार आहे असंही प्रफुल्ल पटेल यांनी स्पष्ट केलं.

Check Also

नवनीत राणा यांचे पुन्हा एकदा असदुद्दीन ओवेसी यांच्या विरोधात चिथावणी वक्तव्य

एआयएमआयएमचे प्रमुख असदुद्दीन ओवेसी यांना भाजपा नेत्या नवनीत राणा म्हणाल्या की “राम भक्त” (प्रभू रामाचे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *