Breaking News

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान इम्रान खान तुरूंगात कसे राहतात? वाचा ना पेपर ना पुस्तक फक्त अरूंद खोली

पाकिस्तानचे माजी पंतप्रधान व सध्या तोशखाना भ्रष्टाचार प्रकरणात कारावास भोगत असणाऱ्या इम्रान खान यांच्याबाबत त्यांचे सहकारी सलमान हैदर यांनी मोठा दावा केला आहे. कारागृहात इम्रान खान यांना वाईट परिस्थितीत ठेवलं जात असल्याचा गावा हैदर यांनी केला आहे.

एका वृत्तवाहिनीने यासंदर्भात वृत्त दिलं आहे. तोशखाना प्रकरणात इम्रान खान यांना तीन वर्षांच्या कारावासाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे. या शिक्षेदरम्यान त्यांना एकांतवासात ठेवण्याचे निर्देश न्यायालयाने दिले आहेत. मात्र, तुरुंगात इम्रान खान यांना वाईट वागणूक दिली जात असल्याचा आरोप हैदर यांनी केला.

इम्रान खान यांना अटक येथील तुरुंगात ठेवण्यात आलं आहे. मात्र, त्यांना अशा खोलीत ठेवलंय जिथे त्यांच्याव्यतिरिक्त साधी एक बॅगही जाऊ शकत नाही, असं हैदर यांचं म्हणणं आहे. तसेच, त्यांना पूर्ण दिवसभरात आंघोळीसाठी व इतर वापरासाठी फक्त एक बादली पाणी दिलं जातं, असाही दावा हैदर यांनी केला.

इम्रान खान यांना अटक तुरुंगातील ज्या कोठडीत ठेवलंय, तिथे कोणताही पोलीस कर्मचारी किंवा तुरुंगातील कर्मचारी नाही. त्यामुळे त्यांना कुणाशीही बोलता येत नाही. त्यांना इतर कोणत्याही सुविधा पुरवल्या जात नाहीत. विशेष म्हणजे इस्लामाबाद कोर्टाने यासंदर्भात स्पष्ट निर्देश दिलेले असूनही त्यांना या सुविधा पुरवल्या जात नसल्याचा दावा हैदर यांनी केला आहे. साधं वर्तमानपत्र व पुस्तकेही त्यांना वाचण्यासाठी दिली जात नाहीत, असं सांगितले.

इम्रान खान यांना शिक्षा सुनावताना इस्लामाबाद उच्च न्यायालयाने दिलेल्या निर्देशांचं अटक तुरुंगात उल्लंघन होत असल्याचा दावा हैदर यांनी केला. इम्रान खान यांना त्यांच्या वकिलालाही भेटू दिलं जात नाही. हे पाकिस्तानच्या राज्यघटनेचं व कायद्याचं उल्लंघन आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय समुदायानं यावर शांत न राहाता आवाज उठवायला हवा, असं आवाहन हैदर यांनी केलं.

इम्रान खान यांच्यावर तुरुंगात विषप्रयोग केला जात असल्याचा आरोप त्यांचा पक्ष पीटीआयच्या नेत्यांनी केला आहे. त्यांना तातडीने घरचं जेवण देण्याची व्यवस्था केली जावी, अशी मागणी पीटीआय पक्षाकडून करण्यात आली.

Check Also

पंतप्रधान मोदी यांची स्पष्टोक्ती, २५ वर्षात एका पैशाच्या घोटाळ्याचाही आरोप नाही

जिथे सरकारे भ्रष्ट असतात तिथे निधीची कितीही तरतूद केली तरी विकास शक्य नाही, म्हणूनच आम्ही …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *