काही दिवसांपूर्वी शिवसेना उबाठा, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या महाविकास आघाडीची पुण्यात जाहिर सभा पार पडली. त्या सभेत आणि इंदापूर येथील शेतकरी मेळाव्यात शिवसेना उबाठा गटाचे नेते संजय राऊत आणि राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे प्रमुख शरद पवार यांनी महाविकास आघाडीची बारामतीतील उमेदवार या सुप्रिया सुळे असतील अशी घोषणा केली होती. त्यामुळे सुप्रिया सुळे यांची उमेदवारी यापूर्वीच जाहिर झाल्याने बारामतीत प्रचाराला सुरुवात केली.
तर आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी उर्वरित जागांवरील उमेदवार जाहिर केले. यावेळी जयंत पाटील यांनी महाविकास आघाडीच्या आणि राष्ट्रवादीच्या उमेदवार सुप्रिया सुळे यांना उमेदवारी जाहिर करण्यात येत असल्याची औपचारिक घोषणा केली. त्यानंतर वर्ध्याचे काँग्रेसचे आमदार अमर काळे यांना जागांच्या अदलाबदलीत अमर काळे यांना राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाकडून उमेदवारी जाहिर केली.
दिडोंरीतून भास्कर भगरे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली. तर दक्षिण अहमदनगर अर्थात अहिल्यानगर येथून अजित पवार गटाचे समर्थक आमदार निलेश लंके यांनी शरद पवार यांच्या उपस्थितीत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला होता. त्यामुळे निलेश लंके हे शरद पवार गटाकडून अहमदनगर अर्थात अहिल्यानगरमधून लोकसभा निवडणूक लढविणार आहेत.
तर शिरूर लोकसभा मतदारसंघातून विद्यमान खासदार डॉ अमोल कोल्हे यांना यंदाही उमेदवारी शरद पवार गटाने दिली आहे. मात्र अजित पवार यांनी डॉ अमोल कोल्हे यांना शिरूर मतदारसंघातून पाडणार असल्याचे आव्हान दिले होते. यापार्श्वभूमीवर आता अधिकृतरित्या डॉ अमोल कोल्हे यांना उमेदवारी जाहिर करण्यात आली आहे. त्यामुळे डॉ अमोल कोल्हे यांना पराभूत करण्यात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि त्यांच्या गटाचे उमेदवार शिवाजीराव आढळराव पाटील हे यशस्वी ठरणार का अशी उत्सुकता राज्यातील जनतेमध्ये निर्माण झाली आहे.
विजयाचा निर्धार पक्का करून 'राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी – शरदचंद्र पवार' पक्षाच्या केंद्रीय संसदीय मंडळाने लोकसभा निवडणूक २०२४ ची पहिली उमेदवार यादी जाहीर केली आहे. आदरणीय खा. शरदचंद्र पवार साहेबांच्या साथीने दिल्लीच्या तख्तासमोर रणशिंग फुंकण्यासाठी तुतारी सज्ज आहे!… pic.twitter.com/oiXVgTvXP1
— Nationalist Congress Party – Sharadchandra Pawar (@NCPspeaks) March 30, 2024