Breaking News

मंत्री छगन भुजबळ यांचा सवाल, मराठा समाज सामाजिक दृष्ट्या मागास कसा

मराठा समाजाला स्वतंत्र आरक्षण देण्यासाठी आपलं कुठलाही विरोध नाही. किंबहुना पाठींबाच आहे. मात्र खऱ्या अर्थाने ओबीसी आरक्षणाला धक्का लागणार नाही असं आरक्षण मराठा समाजाला द्यावे अशी प्रतिक्रिया राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी दिली.

मराठा आरक्षणाबाबत शुक्रे समितीने आज शासनास अहवाल सादर केला. त्यांनंतर मंत्री छगन भुजबळ यांनी आज नाशिक येथील कार्यालयात पत्रकारांशी संवाद साधला. त्यावेळी ते बोलत होते.

छगन भुजबळ पुढे बोलताना म्हणाले की, शुक्रे समितीने आज शासनास अहवाल सादर केला आहे. त्या अहवालात काय आहे ते अद्याप समजले नाही. त्यामुळे संपूर्ण अहवाल वाचल्यानंतर त्यावर सविस्तर बोलता येईल. शुक्रे समितीने १५ दिवसांच्या अतिशय विक्रमी वेळेत सुमारे दीड कोटी लोकांचे सर्वेक्षण केले आहे. ही अतिशय महत्वाची बाब आहे. जर इतक्या कमी वेळात सर्वेक्षण होणार असेल तर अजून थोडा वेळ वाढवून जातनिहाय जनगणनेचे सर्वेक्षण देखील पूर्ण करून घेण्यात यावे अशी मागणी केली.

पुढे बोलताना छगन भुजबळ म्हणाले की, शासनाने नेमेलेल्या मागासवर्ग आयोगातील सदस्य एक एक कमी होत गेले. पुढे न्यामूर्ती मेश्राम यांना देखील समितीतून शासनाने काढले. याबाबत समाजात चर्चा आहे. मराठा समाजाला वेगळं आरक्षण द्या ही सर्वांची मागणी आहे. माजी पृथ्वीराज चव्हाण मुख्यमंत्री असतांना कायदा केला तो टिकला नाही. पुढे देवेंद्र फडणवीस यांच्या काळात कायदा झाला. हा कायदा उच्च न्यायालयात टिकला मात्र सर्वोच्च न्यायालयात टिकला नाही. त्यावेळी मराठा समाजाला १२ टक्के आरक्षण देण्यात आले होते. आता ओबीसीमध्ये १७ टक्क्यात ३७० हून अधिक जाती असताना खोट्या नोंदी करून कुणबी दाखले दिले जात आहे. सरकारने हे कुणबीकरण थांबविले पाहिजे. तसेच ओबीसी समाजात आलेल्या सर्व कुणबीना स्वतंत्र मराठा आरक्षण देण्यात यावे असे सांगितले.

छगन भुजबळ शेवटी म्हणाले की, समितीने दाखल केलेल्या अहवालात मराठा समाज हा सामाजिक आणि शैक्षणिक दृष्ट्या मागास असल्याचे म्हटले आहे. आजही महाराष्ट्रात सर्वच क्षेत्रात मराठा समाज हा प्रथम स्थानावर आहे मग सामाजिक दृष्ट्या मागास कसा असा सवाल निर्माण होतो आहे. ओबीसी आरक्षणाला धक्का लागला तर ओबीसी समाजात मोठी अशांतता पसरेल अशा वेळी त्यांना कुठल्याही नेत्याची सुद्धा गरज राहणार नाही. आज लाखोंच्या संख्येने हरकती नोंदवल्या जात आहेत लोकांमध्ये जागृती आहे. हे सर्व राजकारण्यांनी लक्षात घ्यावे. त्यामुळे माझ्या मनातलं भय मी बोलून दाखवत असल्याचे सांगितले.

Check Also

ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील तरूणाईशी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी साधला संवाद

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी देशातील अव्वल ऑनलाईन गेमिंग क्षेत्रातील गेमरशी संवाद साधला. मात्र यागेमर्सनी पंतप्रधान …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *