Breaking News

राज्य सरकारने केल्या २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्याः नव्या गृहसचिव सुजाता सौनिक तर तुकाराम मुंडे मराठी भाषा विभागाच्या सचिव पदी

मागील काही दिवस राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था आणि लोकसभा निवडणूकांच्या अनुषंगाने सर्वच राजकिय पक्षांकडून तयारी करण्यात येत आहे. मात्र सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालानंतर राज्य सरकारने सावध पावले टाकण्यास सुरुवात केली असून आज राज्यात एकाचवेळी २० आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या केल्या आहेत. यामध्ये मागील तीनवर्षाहून अधिक काळ सामान्य प्रशासन विभागाच्या अप्पर मुख्य सचिव म्हणून राहिलेल्या सुजाता सौनिक यांचे पती मनोजकुमार सौनिक हे राज्याचे मुख्य सचिव म्हणून काम पहात आहेत. त्यामुळे सुजाता सौनिक यांच्याकडे राज्याच्या महत्वपूर्ण अशा गृहविभागाच्या अप्पर मुख्य सचिव पदी नियुक्ती करण्यात आल्याची चर्चा मंत्रालयात सुरु झाली आहे.
तर आपल्या वक्तशीरपणा आणि दबावाला भीक न घालणारे आयएएस अधिकारी तुकाराम मुंडे यांची महिना भरात पदुम या विभागातून मराठी भाषा विभागाच्या सचिव म्हणून नियुक्ती करण्यात आलेली आहे. विशेष म्हणजे पदुमचा पदभारही मुंडे यांनी घेतला नव्हता.

पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे प्रधान सचिव संजय जयस्वाल यांची नियुक्ती म्हाडाचे मुख्य कार्यकारी अधिकारी तथा उपाध्यक्ष म्हणून करण्यात आली आहे. एमएमआरडीचे मुख्य आयुक्त तथा धारावी पुर्नवसन प्रकल्पाचे मुख्याधिकारी म्हणून कार्यरत असलेले ई.व्ही.एस. श्रीनिवासन यांच्याकडील एमएमआरडीएचा पदभार काढून घेण्यात आला असून त्यांच्याकडे फक्त धारावी पुनर्विकास प्रकल्पाचा पदभार सोपविण्यात आला आहे.

तसेच बेस्टचे महाव्यवस्थापक लोकेश चंद्रा यांची नियुक्ती महावितरणचे महाव्यवस्थापकीय संचालकपदी करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी महावितरणचे महाव्यवस्थापकीय संचालक विजय सिंघल यांची नियुक्ती करण्यात आली आहे. राधिका रस्तोगी यांची नियुक्ती मंत्रालयात नियोजन विभागाच्या प्रधान सचिव तथा विकास आयुक्तपदी करण्यात आली आहे.

महिला व बालविकास विभागाच्या प्रधान सचिव आय.ए.कुंदन यांची नियुक्ती अल्पसंख्यांक विभागाच्या प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. मुंबई महानगरपालिकेचे अतिरिक्त मुख्य आयुक्त असेश शर्मा यांची नियुक्ती मंत्रालयात नगरविकास विभागाचे प्रधान सचिव ( २ ) म्हणून करण्यात आली आहे.

महाराष्ट्र राज्य खादी ग्रामोद्योग मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी अंशू सिन्हा यांची नियुक्ती मंत्रालयात ओबीसी बहुजन कल्याण विभागाच्या सचिव म्हणून करण्यात आली आहे.

अल्पसंख्यांक विभागाचे सचिव अनुप यादव यांची नेमणूक महिला व बालविकास विभागाचे प्रधान सचिव म्हणून करण्यात आली आहे. महाराष्ट्र मेरीटाईम मंडळाचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॅा. अमित सैनी यांची नियुक्ती जय जीवन अभियानचे संचालक म्हणून करण्यात आली आहे. तर त्यांच्या जागी उद्योग विभागाचे अतिरिक्त विकास आयुक्त माणिक गुरसाल यांची नेमणूक करण्यात आली आहे.

नाशिक महानगरपालिकेचे आयुक्त चंद्रकांत पुलकुंडवार यांची नियुक्ती पुणे येथे साखर आयुक्त म्हणून करण्यात आली आहे. कोल्हापूर महानगरपालिकेच्या आयुक्त कादंबरी बलकवडे यांची नियुक्ती पुण्यात महाराष्ट्र ऊर्जा विकास अभिकरणच्या महासंचालकपदी करण्यात आली आहे. स्वच्छ भारत अभियानचे ( ग्रामीण) आणि पाणीपुरवठा आणि स्वच्छता विभागाचे विभागाचे सह सचिव तथा संचालक प्रदिप कुमार यांची नियुक्ती नागपूर येथे रेशीम विभागाचे संचालक म्हणून करण्यात आली आहे.

नागपूरचे मनरेगाचे आयुक्त शंतनु गोयल यांची नियुक्ती नवी मुंबई येथे सिडकोचे सह व्यवस्थापकीय संचालक म्हणून करण्यात आली आहे. लातूरचे जिल्हाधिकारी पृथ्वीराज बी.पी यांची नेमणूक माहिती आणि तंत्रज्ञानचे संचालक म्हणून करण्यात आली आहे. राष्ट्रीय ग्रामीण जीवनोन्नती अभियान, मुंबईचे मुख्य कार्यकारी अधिकारी हेमंत वासेकर यांची नियुक्ती पुणे येथे पशुसंवर्धन आयुक्तपदी करण्यात आली आहे. तर मुंबई पालिकेच्या अतिरिक्त आयुक्तपदी सुधाकर शिंदे यांची नियुक्ती करण्यात आली आहे.

Check Also

संध्या सव्वालाखे यांचा आरोप, महिला आयोगाच्या कार्यालयाचा राष्ट्रवादी काँग्रेसकडून गैरवापर

महिलांवर होणार्‍या अन्याय अत्याचाराला वाचा फोडण्यासाठी तसेच महिलांच्या हक्कासाठी महिला आयोग काम करत असते. परंतु …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *