Breaking News

रोहित पवार यांची ईडीकडून अद्यापही चौकशी सुरुच, कार्यकर्त्यांकडून घोषणाबाजी

देशासह राज्यात लोकसभा आणि विधानसभेच्या मध्यावधी निवडणूकांचे वारे वाहू लागले आहेत. त्यातच गेल्या काही महिन्यापासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांच्या बारामती अॅग्रो कंपनीवर आर्थिक गैरव्यवहार प्रकरणी ईडीने धाडसत्र राबविले. त्यानंतर ईडी अर्थात सक्तवसुली संचानालयाकडून आज चौकशीसाठी समन्स बजाविण्यात आले. त्यानुसार कर्जत जामखेडचे आमदार तथा शरद पवार गटाचे आमदार रोहित पवार यांनी ईडीला चौकशी दरम्यान पूर्ण सहकार्य करणार असल्याचे सांगत ईडी कार्यालयात सकाळी १० वाजण्याच्या सुमारास हजर झाले. त्यानंतर संध्याकाळपर्यंत चौकशी सुरु राहिली.

तत्पूर्वी रोहित पवार यांना धीर देण्यासाठी रोहित पवार यांच्या आत्या तथा शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे या रोहित पवार यांच्यासोबत ईडीच्या कार्यालयापर्यंत सोबत गेल्या. दुपारनंतर रोहित पवार यांची चौकशी अद्याप सुरु असल्याने आणि ती चौकशी आणखी किती काळ चालणार याचा अंदाज बांधता येणे अवघड बनत चालल्याने शरद पवार गटाचे असंख्य कार्यकर्त्ये आणि रोहित पवार यांच्या कार्यकर्त्यांनी हळूहळू ईडीच्या कार्यालयाबाहेर जमा होत रोहित पवार यांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी सुरु केली.

मात्र वाढती गर्दी आणि कार्यकर्त्यांकडून करण्यात येत असलेल्या घोषणाबाजीला शांत करण्यासाठी सुप्रिया सुळे यांनी कार्यकर्त्यांना समजून सांगत शांत करण्याचा प्रयत्न केला.

याशिवाय ईडी कार्यालयाच्या परिसरात रोहित पवार समर्थक कार्यकर्त्यांनी घुसखोरी करू नये या उद्देशाने ईडी कार्यालयाकडे येणाऱ्या रस्त्यांवर पोलिसांकडून मोठ्या प्रमाणावर बँरिकॅड्स लावण्यात आलेले आहेत. तसेच ठिकठिकाणी पोलिसांचा चोख बंदोबस्तही ठेवण्यात आलेला आहे. तत्पूर्वी रोहित पवार यांनी शरद पवार यांचे आशिर्वाद घेतले. त्यानंतर विधान भवन परिसरातील शिवछत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांसमोर नतमस्तक झाले. यावेळी सुप्रिया सुळे यांनी भारतीय राज्यघटनेची प्रत रोहित पवार यांच्या हाती सुपुर्द केली.

दरम्यान, तीन महिन्यापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मध्य प्रदेश येथील भाजपा कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ही भ्रष्ट पार्टी असल्याचे सांगत ७० हजार कोटी रूपयांच्या भ्रष्टाचाराचे आरोप केले. तसेच या पक्षाला मत देऊ नका असे आवाहनही केले. त्यानंतर काही तासांचा अवधी उलटत नाही तोच अजित पवार यांच्यासह काही आमदार आणि खासदारांनी वेगळी चूल मांडत महाराष्ट्रातील भाजपाच्या नेतृत्वाखालील सरकारमध्ये सहभागी होत मुळ राष्ट्रवादीशी फारकत घेतली. त्यानंतर भाजपाच्या काही नेत्यांनी आणि कर्जत जामखेडचे आमदार रोहित पवार यांची मालकी असलेल्या बारामती अॅग्रो कंपनीच्या विरोधात आर्थिक गैरव्यवहार करण्यात येत असल्याचे आरोप करत रोहित पवार यांना खिडींत गाठण्याचे प्रयत्न सुरु करण्यात आले.

तसेच या मधल्या कालावधीत अजित पवार आणि रोहित पवार यांच्यात शाब्दीक चकमकही उडाली. मात्र रोहित पवार यांनी अजित पवार यांच्यासह भाजपाच्या दबावतंत्रांवर चौफेर हल्ला चढविला. त्यामुळे रोहित पवार यांना राजकियदृष्ट्या शांत करण्यासाठीच भाजपाकडून ईडीच्या माध्यमातून धाडसत्र आणि चौकशी सत्राचे काम सुरु करण्यात आल्याचा आरोप विरोधकांनी सुरु केला.

Check Also

मुंबई उपनगरात २६ एप्रिलपासून लोकसभा उमेदवारी अर्ज भरण्यास सुरुवात

मुंबई उपनगर जिल्ह्यातील चारही लोकसभा मतदारसंघातील निवडणुकीसाठीची अधिसूचना २६ एप्रिल रोजी जारी होणार आहे. या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *