Breaking News

अजित पवार म्हणाले, अल्पसंख्याकांच्या समस्यांकडे लक्ष, मुलींच्या शिक्षण…..

राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाच्यावतीने आयोजित राज्यस्तरीय अल्पसंख्याक विश्वास मेळावा आज नवी मुंबईतील वाशी इथं पार पडला. अल्पसंख्याक समाजाच्या शिक्षण, आरक्षण आणि संरक्षण या तीन प्रमुख मुद्द्यांवर या राज्यस्तरीय मेळाव्यात मंथन करण्यात आले. राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी राज्यभरातून आलेल्या अल्पसंख्याक विभागाच्या पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांना यावेळी संबोधित केले. जोपर्यंत मी इथे आहे तोपर्यंत कोणत्याच समाजावर अन्याय होऊ देणार नाही. माझ्यावरचा तुमचा विश्वास मी कधी ढळू देणार नाही असा शब्द यावेळी दिला.

पुढे बोलताना अजित पवार म्हणाले की, अल्पसंख्याक समाजाच्या समस्यांवर आपले लक्ष असून मुलींच्या शिक्षण, रोजगारासाठी आम्ही प्रयत्न करतोय. वक्फ बोर्डच्या समस्या सोडवण्यासाठी निर्देश देण्यात आले असून भविष्यात अल्पसंख्याक समाजाच्या विकासासाठी भरीव निधीची तरतूद करू असे आश्वासनही यावेळी दिले.

अजित पवार पुढे बोलताना म्हणाले की, छत्रपती शिवाजी महाराजांनी शिकवण दिल्याप्रमाणे अठरापगड जाती, बाराबलुतेदार आणि सर्व समाजघटकांना सोबत घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसची वाटचाल सुरू आहे. जाती-धर्मात तणाव निर्माण होणार नाही यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस काम करेल असा विश्वासही दिला.

तर पक्षाचे नेते प्रफुल पटेल म्हणाले की, देश ज्या गतीने पुढे जातोय त्याच गतीने अल्पसंख्याक समाजाला पुढे घेऊन जायचंय असे सांगत शिव – शाहू – फुले – आंबेडकरांच्या विचारधारेसह महापुरुषांचा आदर्श पुढे ठेवून आपल्याला वाटचाल करायची आहे. शिव -शाहु – फुले – आंबेडकरांचे विचार हीच आपली विचारधारा आहे. ती कधी बदलली नाही, कधीही बदलणार नाही असा शब्दही यावेळी दिला.

अजित पवार यांनी घेतलेल्या क्रांतिकारक निर्णयाला पाठिंबा देण्यासाठी राज्यभरातून अल्पसंख्याक समुदाय आज नवी मुंबईत जमल्याचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे म्हणाले.

अजित पवारांनी महायुतीत सहभागी होण्याचा निर्णय घेतल्यानंतर अनेकांनी शंका उपस्थित केल्या. पण आजची गर्दी आणि तुमचा पाठिंबा धर्मानिरपेक्ष विचार आणि विकासाचे राजकारण करणारा नेता आणि पक्षासोबत आपण उभे आहात हे दाखवून देत असल्याचेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

राष्ट्रवादी काँग्रेसची शिव – फुले – शाहू – आंबेडकरांची विचारधारा या अल्पसंख्याक मेळावाच्या माध्यमातून आणखी मजबूत होईल असा विश्वास राष्ट्रवादी महिला प्रदेशाध्यक्षा रुपाली चाकणकरांनी व्यक्त केला.

मुस्लिम समाजाला कुणी वाली आहे की नाही असे आम्हाला वाटत होते. पण अजित पवार मुस्लिम समाजाच्या पाठीशी खंबीरपणे उभे आहेत हे त्यांनी आपल्या निर्णयांतून दाखवून दिल्याचे आमदार बाबाजानी दुर्राणी म्हणाले. आपल्याला आता एकजूट होण्याची वेळ आलीय. ही एकजूट आपण मतपेटीतून दाखवून देऊ आणि राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करू असा निर्धार यावेळी पक्षाचे नेते बाबा सिद्दीकी यांनी व्यक्त केला.

स्वतःला सेक्युलर समजणाऱ्या राजकीय पक्षांनी आजवर अल्पसंख्याक समाजाचा केवळ मतांसाठी वापर केलाय. पण आज आमच्याकडे अजित पवारांसारखा न्याय देणारा नेता आहे आणि राज्यातला अल्पसंख्याक समाज दादांच्या पाठिशी ठामपणे उभा आहे असे प्रतिपादन राष्ट्रवादी काँग्रेस अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक नजीब मुल्ला यांनी केले. अजित पवारांनी अल्पसंख्याक समाजाला कायम आपलेपणा दिलाय. म्हणूनच त्यांना पाठिंबा देण्यासाठी महाराष्ट्रभरातून अल्पसंख्याक समाज मोठ्या संख्येने या मेळाव्याला आल्याचे नजीब मुल्ला म्हणाले.

अजित पवारांसारखा खंबीर नेता आज आपल्यासोबत आहे. त्यांनी नेहमीच अल्पसंख्याक समाजाला न्याय देण्याचा प्रयत्न केलाय. आता त्यांच्यासोबत उभे राहण्याची निर्णयाक वेळ आलीय असे आवाहन यावेळी अल्पसंख्याक विभागाचे राज्यप्रमुख इद्रिस नायकवडी यांनी केले. आगामी प्रत्येक निवडणुकीत राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचा जो उमेदवार विजयी होईल. त्याच्या विजयात सर्वात मोठे योगदान अल्पसंख्याक आणि मुस्लीम समाजाचे असेल असा निर्धार कार्याध्यक्ष वसीम बुऱ्हाण यांनी व्यक्त केला.

मौलाना आझाद अल्पसंख्याक महामंडळाची पतहमी ३० कोटींवरून ५०० कोटी केल्याबद्दल अजित पवार यांच्या अभिनंदनासह अल्पसंख्याक समुदायाशी संबंधित सामाजिक, शैक्षणिक, रोजगार आदी विषयांचे ९ ठराव या मेळाव्यात मांडण्यात आले. हे सर्व ठराव एकमताने मंजूर करण्यात आले. अल्पसंख्याक समाजाच्या उन्नतीसाठी मांडण्यात आलेल्या ठरावांवर बारकाईने लक्ष घालून त्याच्या मंजूरीसाठी प्रयत्न करणार असल्याचे आश्वासन यावेळी अजित पवार यांनी दिले.

अल्पसंख्याक समाजाच्या या राज्यस्तरीय महामेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसच्या अल्पसंख्याक विभागाचे राष्ट्रीय अध्यक्ष सय्यद जलालोद्दीन, पक्षाचे सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, माजी खासदार आणि ठाणे शहर जिल्हाध्यक्ष आनंद परांजपे यांच्यासह अल्पसंख्याक विभागाचे मान्यवर पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष, तालुकाध्यक्ष यासोबतच राज्यभरातून आलेले असंख्य पदाधिकारी आणि कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावरील अपघातातील मृतांना ५ लाखांची मदत जखमींवर मोफत उपचार- मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची माहिती

डोंबिवली (घेसरगाव) येथून खासगी बसने पंढरपूर येथे निघालेल्या वारकरी भक्तांच्या वाहनाला मुंबई-पुणे द्रुतगती महामार्गावर आज …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *