Breaking News
Drug Smuggling

Drug Smuggling : अरबी समुद्रातील ड्रग्ज तस्करीच्या मोठ्या कटाचा खुलासा रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनार्‍यांवरून सीमाशुल्क विभागानं २५० किलोहून अधिक ड्रग्सचे पॅकेट्स ताब्यात घेतले.

महाराष्ट्राच्या पश्चिम टोकाला समुद्रकिनारी कोट्यवधी रुपयांचे ड्रग्ज ( Drug Smuggling ) सापडल्यानं खळबळ उडाली आहे. हे ड्रग्स समुद्राच्या लाटांनी तरंगणार्‍या पॅकेट्सच्या स्वरूपात किनार्‍यावर आढळून आले. रत्नागिरी जिल्ह्यातील सात वेगवेगळ्या किनार्‍यांवरून सीमाशुल्क विभागानं २५० किलोहून अधिक ड्रग्सचे पॅकेट्स ताब्यात घेतले.

प्रशासनाकडून आधीच निर्बंध लादण्यात आलेल्या या ड्रग्सचे प्लास्टिकच्या पिशव्यांचे पॅकेट्स महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या किनार्‍यांवर वाहून आले. कर्डे , लाडघर , केळशी , कोलथरे , मुरुड, बुरुंडी, दाभोळ आणि बोर्या समुद्रकिनार्‍यांवर ही ड्रग्सची पाकिटं ( Drug Smuggling ) जप्त करण्यात आली आहेत.

महाराष्ट्रातील वेगवेगळ्या समुद्रकिनार्‍यांवर वाहून आलेली ड्रग्सची पाकिटं ( Drug Smuggling ) अफगाणिस्तान आणि पाकिस्तानमधून वाहून आली असावीत, असा सीमाशुल्क विभागाला संशय आहे. ही अंमली पदार्थांची पाकिटं एकतर समुद्रात पडली असतील किंवा अंमली पदार्थांच्या तस्करीच्या उद्देशानं परदेशी जहाजांमधून फेकण्यात आली असतील, असा संशयही सीमाशुल्क विभागाकडून व्यक्त केला जात आहे.

दरम्यान, स्वातंत्र्यदिनाच्या पूर्वसंध्येला सुरक्षा गस्तीदरम्यान, रत्नागिरीतील दापोली सीमाशुल्क विभागाच्या तटरक्षक दलाला कर्डे समुद्रकिनारी वाहून आलेले १० संशयास्पद पॅकेट्स (एकूण १२ किलो वजनाची) आढळून आली. तात्काळ ही ड्रग्सची पाकिटं सीमाशुल्क विभागानं ताब्यात घेतली आणि त्यांची तपासणी केली. तपासाअंती चरस (हशीश) असल्याचं निष्पन्न झालं.

त्यानंतर केळशी ते बोर्या परिसरात सीमाशुल्क विभागाकडून शोधमोहीम राबविण्यात आली. १५ ऑगस्ट रोजी कर्डे ते लाडघर समुद्रकिनारी सुमारे ३५ किलो चरस असलेली प्लास्टिकची पाकिटं आढळून आली. १६ ऑगस्ट रोजी केळशी समुद्रकिनार्‍यावरून २५ किलो आणि कोलथरे समुद्रकिनार्‍यावरून १३ किलो ड्रग्स जप्त करण्यात आले होते.

१७ ऑगस्ट रोजी मुरुड येथून १४ किलोंपेक्षा जास्त, बुरुंडी ते दाभोळ खाडीदरम्यान १०१ किलो, तर बोर्या येथून २२ किलो ड्रग्ज जप्त करण्यात आले. नंतर, कोलथरे समुद्रकिनार्‍याच्या खडकाळ भागातही मोठ्या प्रमाणावर चरस असलेली पाकिटं आढळून आली. दापोली सीमा शुल्क विभागाचे सहाय्यक आयुक्त श्रीकांत कुडाळकर यांनी यासंदर्भात माहिती देताना सांगितलं की, आमची शोध मोहीम सुरू आहे.

तरीही समुद्रकिनारी राहणार्‍या स्थानिक लोकांना अशी कोणतीही पाकिटं आढळल्यास आमच्याशी संपर्क साधावा, असं आवाहन आम्ही करत आहोत. बेकायदेशीर अंमली पदार्थ बाळगणार्‍यास १० वर्षांपर्यंतच्या तुरुंगवासाच्या शिक्षेची तरदूत असल्याचंही यावेळी त्यांनी सांगितलं. गेल्या वर्षी २०२२ मध्ये गुजरातमधील पोरबंदर आणि जुनागढ जिल्ह्यात समुद्र किनार्‍या लगतच्या भागातही ड्रग्जचे पॅकेट्स वाहून आल्याचं पाहायला मिळालं होतं. तब्बल ५९ प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये पॅक केलेले ड्रग्ज किनार्‍यावर आढळून आले होते.

प्रत्येक पॅकेटचं वजन सुमारे एक किलो होतं. जुनागडमधील मंगरोळ आणि पोरबंदरमधील माधवपूर येथून संशयित ड्रग्ज असलेली पाकिटं जप्त करण्यात आली होती.२०१९ मध्ये, सीमा सुरक्षा दलानं (ँएइ) गुजरातच्या कच्छ जिल्ह्यातील क्रीक भागांत समुद्र किनार्‍यावर ड्रग्सची दोन पाकिटं आढळून आली होती.

या दोन्ही पॅकेटचं वजन सुमारे दोन किलो असल्याचं अधिकार्‍यांनी सांगितलं होतं. बीएसएफ अधिकार्‍यांच्या म्हणण्यानुसार, ही दोन ड्रग पॅकेट्स पाकिस्तानी क्रूनं समुद्रात टाकलेल्या मोठ्या प्रतिबंधित ड्रग्सच्या कन्साइनमेंटचा भाग होती.दरम्यान, ड्रग्ज समुद्रात टाकण्याची घटना भारतीय तटरक्षक दलानं मे २०१९ मध्ये गुजरातच्या जाखाऊ किनारपट्टीवर ‘अल मदिना’ या पाकिस्तानी ड्रग्सनं भरलेल्या जहाजाचा पाठलाग करून पकडलं तेव्हा घडली होती.

Check Also

मुंबई उच्च न्यायालयाचे संभाजीनगर आणि धाराशिव नामांतरावर शिक्कामोर्तब

मुंबई उच्च न्यायालयाने बुधवारी महाराष्ट्र सरकारच्या औरंगाबाद शहर आणि महसूल क्षेत्राचे अधिकृतपणे छत्रपती संभाजीनगर आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *