काही दिवसांपूर्वी दर्शना पवार या एमपीएससी उत्तीर्ण झालेल्या तरुणीची राजगडाच्या पायथ्याशी हत्येच्या घटनेनं संपूर्ण महाराष्ट्र हादरला होता. ही घटना काही दिवस उलटत नाही तोच पुण्यात अजून एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. शहरातील सदाशिव पेठ भागात भरदिवसा एका तरुणीवर कोयत्याने वार करण्यात आले. तरुणीवर वार करत असताना तिथं उपस्थित असलेल्या दोन युवकांनी मध्यस्थी केल्याने तरुणीचा जीव वाचला आहे.
यादरम्यान, तरुणाने आपल्यावर हल्ला का केला? आज नेमकं काय झालं? असं विचारलं असता पीडित तरुणीने आपली प्रतिक्रिया समाज माध्यमांना देताना म्हणाली, मी कॉलेजला चालली होती. तो मला पाच मिनिट बोल…बोल, असं म्हणत होता. पण मी नकार दिल्याने त्याने माझ्यावर कोयत्याने वार केलेत. तो माझ्यामागे कोयता घेऊन पळायला लागला, त्याला लोकांनी पकडलं. त्याला मारहाण केली. कॉलेजमध्ये आम्ही मित्र होतो. मी त्याच्याशी बोलणं बंद केलं म्हणून त्याने धमक्या दिल्या, असं पीडितेनं यावेळी सांगितलं.
पीडित तरुणी म्हणाली की, तो माझा मित्र होता. त्याने मला प्रपोज केला असता, त्याला मी नकार दिला. त्यानंतर तो मला जीवे मारायच्या धमक्या देऊ लागला. माझ्या कॉलेजवळ येऊन मला फोन करायचा, मला मारहाण करायचा. त्याला नकार दिल्यावर देखील तो माझा सतत पाठलाग करायचा. त्यानंतर मी त्याची तक्रार त्याच्या घरच्यांकडे केली, पण त्यांनी काहीच अॅक्शन घेतली नाही. मी त्याच्या घरी तक्रार केली म्हणून त्याने आज माझ्यावर वार केलेत. त्यामुळे माझ्या हाताला लागलंय आणि डोक्याला देखील टाके पडलेत. माझा काही दोष नसताना त्याने मला मारण्याच्या धमक्या दिल्या, मला मारहाण केली. कॉलेजवळ येऊन कोयत्याने वार केले.
या परिसरात असलेल्या स्थानिक तरुणांनी वेळीच धाव घेत आरोपी शंतनू जाधव याच्या हातून कोयता हिसकावून घेत मुलीचा जीव वाचवला. त्यानंतर त्याला चोप देत पोलीस ठाण्यात नेऊन पोलिसांच्या ताब्यात दिलं. या घटनेत दोघेही तरुण तसेच तरुणी जखमी झाले असून त्यांना उपचारासाठी दवाखान्यात दाखल करण्यात आले आहे. पुढील तपास विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी करत आहेत.
राज्यात गुन्ह्यांचा आलेख रोज वाढतोय… महिला आणि मुली सुरक्षित नाहीत.. खून होतायेत… दरोडे पडतायेत… एकूणच राज्याची 'कायदा आणि सुव्यवस्था' ही केवळ सत्ताधारी आमदारांची दासी झाली की काय, असा प्रश्न पडलाय. आपण पुरोगामी महाराष्ट्राचा वारसा सांगणाऱ्या राज्याचं सरकार चालवतो, याचं तरी… pic.twitter.com/HbNk8KqCSc
— Rohit Pawar (@RRPSpeaks) June 27, 2023