आजपासून म्हणजेच ११ सप्टेंबरपासून स्वस्त सोने खरेदी संधी आरबीआयने उपलब्ध करून दिली आहे. सार्वभौम सुवर्ण बाँड योजना २०२३-२४ ची दुसरी मालिका सोमवारपासून म्हणजेच ११ सप्टेंबरपासून सुरू होत आहे. यामध्ये तुम्ही १५ सप्टेंबरपर्यंत गुंतवणूक करू शकता. यावेळी सोन्याचा भाव प्रति १ ग्रॅम ५,९२३ रुपये निश्चित करण्यात आला आहे. यामध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन दोन्ही प्रकारे गुंतवणूक करता येते.
सार्वभौम गोल्ड बाँडमध्ये, गुंतवणूकदार २४ कॅरेट शुद्धतेच्या सोन्यात गुंतवणूक करतात. म्हणजेच ९९.९ टक्के शुद्ध सोन्यात गुंतवणूक करता येते. रिझर्व्ह बँकेने सार्वभौम गोल्ड बाँड योजनेच्या दुसऱ्या मालिकेसाठी किंमत ५,९२३ रुपये प्रति ग्रॅम ठेवली आहे. प्रत्यक्ष किंवा ऑनलाइन ९९.९ टक्के शुद्ध सोने खरेदी करू शकता. ऑनलाइन खरेदी केल्यास ५० रुपये प्रति ग्रॅमची सूट दिली जाईल. या योजनेंतर्गत सहामाही आधारावर २.५० टक्के व्याज दिले जाते. गोल्ड बाँडचा परिपक्वता कालावधी ८ वर्षांचा आहे. पाच वर्षांनंतर ग्राहकांना निवड रद्द करण्याचा पर्याय असेल.
सार्वभौम सुवर्ण रोखे व्यापारी बँका, स्टॉक होल्डिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (SHCIL), क्लियरिंग कॉर्पोरेशन ऑफ इंडिया लिमिटेड (CCIL), नियुक्त पोस्ट ऑफिस आणि नॅशनल स्टॉक एक्सचेंज ऑफ इंडिया लिमिटेड आणि बॉम्बे स्टॉक एक्सचेंज लिमिटेड यांच्यामार्फत विकले जातील. एखादी व्यक्ती एका आर्थिक वर्षात किमान एक ग्रॅम आणि जास्तीत जास्त चार किलो सोने खरेदी करू शकते. संयुक्त होल्डिंगच्या बाबतीत, ४ किलोची गुंतवणूक मर्यादा फक्त पहिल्या अर्जदारावर लागू होईल. तर कोणत्याही ट्रस्टसाठी खरेदीची कमाल मर्यादा २० किलो आहे.
योजनेत भारतीय रहिवासी, हिंदू अविभक्त कुटुंबे (HUF), ट्रस्ट, विद्यापीठे आणि धर्मादाय संस्था गुंतवणूक करू शकतात. एका व्यक्तीला एका वर्षात जास्तीत जास्त ४ किलो सोने खरेदी करण्याची परवानगी आहे. तर ट्रस्ट आणि संस्था एका वर्षात २० किलो सोने खरेदी करू शकतात.
या सरकारी योजनेला आतापर्यंत लोकांचा मोठा प्रतिसाद मिळाला आहे. या वर्षासाठी उघडलेली पहिली मालिका १९ जून २०२३ रोजी उघडण्यात आली होती. ही योजना २३ जूनला बंद झाली.