Breaking News

इस्रायलवर हमासच्या हल्ल्यामुळे कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ भारतातही सणासुदीच्या काळात पेट्रोल-डिझेलच्या किमती वाढू शकतात

हमासच्या इस्रायलवरील हल्ल्यानंतर त्याचा पहिला परिणाम दिसून आला. सणासुदीच्या आधी सर्वसामान्यांच्या खिशावर भार पडणार आहे. इस्रायलवर हमासच्या हल्ल्यानंतर तीन दिवसांनी कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी उसळी पाहायला मिळाली. या किमती स्थिर न राहिल्यास पेट्रोल आणि डिझेलच्या दरात मोठी वाढ होणार आहे.

इस्रायलवर हमास दहशतवाद्यांनी केलेल्या हल्ल्याच्या तिसऱ्या दिवशी तेलाच्या किमती ५ टक्के वाढल्या आहेत. जागतिक बेंचमार्क ब्रेंट सोमवारी ४.५३ टक्के वाढून ८८.४१ डॉलर प्रति बॅरलवर व्यवहार करत होता. तर यूएस वेस्ट टेक्सास इंटरमीडिएट फ्युचर्स ४.६९ टक्के वाढून ८८.६७ डॉलर प्रति बॅरलवर पोहोचला. इस्रायल-हमास युद्ध पश्चिम आशियात पसरले तर कच्च्या तेलाच्या पुरवठ्यात आव्हान निर्माण होऊ शकते, असे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.

गेल्या तीन महिन्यांत (जुलै ते सप्टेंबर) क्रूडच्या किमतीत ३० टक्क्यांनी वाढ झाली आहे. या काळात कच्च्या तेलाच्या किमतीने गेल्या १३ महिन्यांचा विक्रम मोडला. सौदी अरेबिया आणि रशियाने तेल उत्पादनात कपात करण्याची घोषणा केली तेव्हा कच्च्या तेलाची किंमत प्रति बॅरल ७६ डॉलर होती, जी १०० डॉलरच्या जवळ वाढली. मात्र, नंतर रशियाने उत्पादन वाढविण्याची घोषणा केली. त्यामुळे किंमती घसरल्या. सध्या ब्रेंट क्रूडची किंमत प्रति बॅरल ८५ डॉलरच्या आसपास आहे.
दरम्यान, तेल विपणन कंपन्यांनीही आज सकाळी पेट्रोल आणि डिझेलचे दर जाहीर केले. इंडियन ऑइलच्या म्हणण्यानुसार, दिल्लीत पेट्रोल ९६.७२ प्रति लिटर आणि डिझेल ८९.६२ दराने विकले जात आहे. पाटणा, बिहारमध्ये आज एक लिटर पेट्रोलचा दर १०७.२४ रुपये आणि डिझेल ९४.०४ रुपये प्रति लिटर आहे. दुसरीकडे, राजस्थानच्या जयपूरमध्ये पेट्रोल १०८.४८ रुपये प्रति लिटर आणि डिझेल ९३.७२ रुपये दराने विकले जात आहे.

पॅलेस्टिनी गट हमासने शनिवारी इस्रायलमध्ये ५००० रॉकेट डागून नरसंहार केला. याला प्रत्युत्तर म्हणून इस्रायलकडून प्रत्युत्तर दिले जात असून या दोघांमध्ये सुरू असलेल्या या संघर्षात हजारो लोकांना आपला जीव गमवावा लागला असून सुमारे ४,००० लोक जखमी झाल्याचे सांगण्यात येत आहे. दुसरीकडे, अमेरिकेच्या नेतृत्वाखालील पाश्चात्य देशांनी हमासच्या हल्ल्याचा तीव्र निषेध केला असून इस्रायलला पाठिंबा देण्याचे आश्वासन दिले आहे.

Check Also

इलेक्ट्रिक वाहन धोरणाबाबत लवकरच मार्गदर्शक तत्वे केंद्र सरकारकडून सुतोवाच

येत्या काही दिवसांत सरकार नवीन इलेक्ट्रिक वाहन (EV) धोरणावर मार्गदर्शक तत्त्वे घेऊन येण्याची शक्यता आहे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *