Breaking News

राष्ट्रवादी धर्मनिरपेक्ष नाही मग पाठिंबा घेतला कशाला? शरद पवार यांचा आंबेडकरांना सवाल

मुंबई : प्रतिनिधी
राष्ट्रवादी काँग्रेस धर्मनिरपेक्ष नसता तर अकोल्यात झालेल्या निवडणुकीत दोन वेळा प्रकाश आंबेडकर यांनी राष्ट्रवादीचा पाठिंबा घेतला नसता, अशी टीका राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांनी शुक्रवारी केली.
भारिप-बहुजन महासंघाचे नेते प्रकाश आंबेडकर यांनी गुरूवारी एका पत्रकार परिषदेत राष्ट्रवादीबरोबर आघाडी न करण्याची घोषणा करताना राष्ट्रवादी जातीयवादी पक्ष असल्याचा आरोप केला होता. नेहरू सेंटर येथे स्वतःच्या चित्रांवर भरलेल्या प्रदर्शनाला भेट दिल्यानंतर प्रसिद्धीमाध्यमांशी ते बोलत होते. अकोल्यातील निवडणुकांच्या प्रचारात शरद पवार गेले नव्हते तर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते होते. ते धर्मनिरपेक्ष आहेत असे आम्हाला तेव्हा वाटत होते. उलट, आता तसे वाटत नाही, असेही ते म्हणाले.
मला साल आठवत नाही. पण, ईशान्य मुंबईत आमच्या उमेदवाराला पराभूत करण्यासाठी आंबेडकर यांच्या पक्षाने डॉ. नीलम गोऱ्हे यांना उभे केले होते. त्याचा लाभ भारतीय जनता पार्टीच्या प्रमोद महाजन यांना झाला होता. तेव्हा भाजपाला लाभ पोहोचवण्यासाठी उमेदवार उभे करण्याची ऐतिहासिक कामगिरी करणारे लोक इतरांना धर्मनिरपेक्षतेच्या गोष्टी सांगू नयेत, असेही पवार म्हणाले.
छत्तीसगडमध्ये बहुजन समाज पार्टीने काँग्रेसचे पूर्वीचे नेते अजित जोगी यांच्या पक्षाशी आघाडी केली आहे. त्यांच्यात यापूर्वीच बोलणे सुरू होते. काँग्रेसची तिथे इतर पक्षांबरोबर जाण्याची तयारी नव्हती. त्यामुळे त्यांना दुसर्‍या पक्षाबरोबर जाण्याचा निर्णय घ्यावा लागला असेल, असेही ते म्हणाले.
भागवतांचे विधान गंभीर
राम मंदिर बांधले नाही तर देशात महाभारत घडेल या राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे सरसंघचालक मोहन भागवत यांच्या विधानावर त्यांनी आक्षेप घेतला. या सरकारचे सल्लागार ते आहेत. देशात कायदा आणि सुव्यवस्था राखण्याची जबाबदारी ज्यांच्या हातात सत्ता असते त्यांची असते. ज्या प्रकारचे त्यांनी विधान केले आहे ते पाहता त्यातून त्यांना काही सूचित करायचे आहे हे नक्की. सरकारने ही बाब गांभीर्याने घेतली पाहिजे. देशाला आज रामायण, महाभारताची गरज नाही, असेही पवार यांनी सांगितले.
मुस्लिमांशिवाय हिंदुत्व अपुरे आहे, या भागवत यांच्या विधानावर बोलताना ते म्हणाले की, मुस्लिम, ख्रिश्चन हे या देशाचे घटक आहेत. मला जेवढा अधिकार आहे, तेवढाच अधिकार त्यांना आहे. ते देशाचे तेवढेच हिस्सेदार आहेत आणि हे कुणी सांगण्याची आवश्यकता नाही.

Check Also

पंतप्रधान मोदींच्या मुंबईतील दौऱ्यात महिला काँग्रेस काळे झेंडे दाखवणार

भाजपाचा मित्र पक्ष जेडीएसचा लोकसभा उमेदवार प्रज्वल रेवन्ना याने शेकडो महिलांना ब्लॅकमेल करून त्यांच्यावर लैंगिक …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *