Breaking News

या चार राज्यांमध्ये डिझेल १०० पार, सलग दुसऱ्या दिवशी डिझेल महागले महाराष्ट्रात १०० च्या जवळ

मुंबईः प्रतिनिधी
देशात सलग दुसऱ्या दिवशी डिझेलचे दर वाढले आहेत. सोमवारी डिझेलच्या दरात २५ पैशांनी वाढ झाली आहे. पेट्रोलच्या किंमतीत मात्र कोणताही बदल झालेला नाही.
दरवाढीनंतर मुंबईत डिझेलचा दर प्रती लिटरला ९६.९४ रुपये झाला आहे. तर दिल्लीत डिझेल भाव ८९.३२ रुपयांवर पोहोचला आहे. यापूर्वी रविवारीही डिझेलच्या किमतीत २५ पैशांनी वाढ झाली होती. दोन्ही दिवस पेट्रोलच्या किंमतीत कोणताही बदल झालेला नाही. मुंबईत सध्या पेट्रोलचा दर १०७.२६ रुपये आहे.
यावर्षी आतापर्यंत पेट्रोल १७.२२ रुपयांनी आणि डिझेल १५.२० रुपयांनी महाग झाले आहे. दिल्लीत १ जानेवारीला पेट्रोल ८३.९७ रुपये आणि डिझेल ७४.१२ रुपये प्रति लीटर होते. आता ते १०१.१९ रुपये आणि ८९.३२ रुपये प्रति लीटर आहे. म्हणजेच ९ महिन्यांपेक्षा कमी कालावधीत पेट्रोल १७.२२ रुपयांनी आणि डिझेल १५.२० रुपयांनी महाग झाले.
कच्च्या तेलाच्या किंमती पुन्हा एकदा वाढू लागल्या आहेत. याचा परिणाम म्हणून, ब्रेंट क्रूड, कच्च्या तेलाचा बेंचमार्क शनिवारी ७८ डॉलर प्रति बॅरलची पातळी ओलांडून ७८.२० डॉलरवर पोहोचला. कच्चे तेल ३ वर्षांच्या विक्रमी उच्चांकावर पोहोचले आहे. यापूर्वी ऑक्टोबर २०१८ मध्ये ते ७८.२४ वर पोहोचले होते. कच्च्या तेलाच्या किंमतीत वाढ झाल्यामुळे आगामी काळात पेट्रोल आणि डिझेलच्या किंमती आणखी वाढू शकतात.
२० राज्यांमध्ये पेट्रोल आणि ४ राज्यांमध्ये डिझेल आता १०० च्या पुढे गेले आहे. मध्य प्रदेश, आंध्र प्रदेश, बिहार, महाराष्ट्र, कर्नाटक, मणिपूर, तेलंगणा, पंजाब, सिक्कीम, ओरिसा, केरळ, दिल्ली, तामिळनाडू आणि राजस्थानच्या सर्व जिल्ह्यांमध्ये पेट्रोलचा भाव १०० रुपयांपेक्षा जास्त आहे.
त्याचबरोबर जम्मू -काश्मीर, पश्चिम बंगाल, उत्तर प्रदेश, त्रिपुरा, नागालँड आणि छत्तीसगडमध्ये अनेक ठिकाणी पेट्रोलचा दर १०० रुपयांच्या पुढे आहे. डिझेलचा दर ओरिसा, मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये अनेक ठिकाणी १०० रुपये प्रति लिटरच्या वर आहे.
पश्चिम बंगाल, केरळ, आसाम आणि तामिळनाडू राज्यात झालेल्या निवडणुकांनंतर पेट्रोल आणि डिझेलच्या दरात सातत्याने वाढ होत आहे. देशात दररोज पेट्रोल, डिझेलच्या किंमती या क्रूड तेलाच्या किंमती आणि परकीय चलन दरानुसार बदलत असतात. नवे दर देशातील प्रत्येक पेट्रोल पंपावर दररोज सकाळी ६ वाजल्यापासून लागू होतात.

देशातील प्रमुख शहरांमधील इंधनांचे दर

शहर

पेट्रोल (रुपए/लीटर)

डिझेल (रुपए/लीटर)

श्रीगंगानगर

113.07

103.07

अनूपपुर

112.45

100.72

परभणी

109.83

97.94

भोपाल

109.63

98.19

जयपुर

108.13

98.53

मुंबई

107.26

96.94

दिल्ली

101.19

89.32

Check Also

एसबीआयमध्ये १२ हजार फ्रेशर्सना संधी ८५ टक्के आयटी क्षेत्रातील नवतरूणांना प्रोबेशनरी ऑफिसर्स म्हणून नियुक्त्या

एसबीआय SBI, देशातील सर्वात मोठी असलेल्या बँकेत, FY25 मध्ये प्रोबेशनरी ऑफिसर आणि सहयोगी म्हणून १२,००० …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *