Breaking News

छगन भुजबळ यांनी ठेवले मर्मावर बोट, …अनेक नेत्यांना आपण तोंडघशी पाडतो … शरद पवार आमचे विठ्ठल, बडव्यांनी (?) घेरलं

राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय सर्वेसर्वा शरद पवार यांच्या नेतृत्वाला रामराम करत राज्यातील शिंदे-फडणवीस सरकारसोबत जात अजित पवार यांच्यासह ९ आमदारांनी मंत्री पदाची शपथ घेतली. त्यानंतर अजित पवार यांच्यासोबत गेलेल्यांच्या विरोधात अपात्रतेचे पत्र विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांना दिले. तर अजित पवार यांच्या गटाने जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड यांच्यावर अपात्रतेची कारवाई कऱण्याचे पत्र विधानसभाध्यक्षांना दिले. यापार्श्वभूमीवर शरद पवार गट आणि अजित पवार गटाने आपपाल्या गटाच्या आमदार-कार्यकर्त्यांची बैठक आज बोलावली. अजित पवार गटाच्या आमदार, कार्यकर्त्यांची बैठक वांद्रे रेक्लमेशन येथील एमईटी संस्थेच्या मैदानावर बोलावण्यात आली. त्यावेळी बोलताना मंत्री छगन भुजबळ यांनी शरद पवार यांनी दिलेल्या सज्जड दमचा उल्लेख करत म्हणाले, शरद पवार आम्हाला सांगतात की, माझा फोटो बॅनर्सवर वापरु नका. पण पवार साहेब हे आमचे विठ्ठल आहे. या विठ्ठलाला बडव्यांनी घेरलं आहे. या बडब्यांना बाजूला करा, आम्ही सगळे तुमच्याकडे परत येऊ. आपण एकत्र सत्तेत बसू, असे मनसेप्रमुख राज ठाकरे स्टाईलमध्ये वक्तव्य केले.

यावेळी छगन भुजबळ यांनी आक्रमक शैलीत शरद पवार यांच्या राजकारणाचे आणि कार्यपद्धतीमधील दोष दाखवून दिले. तुम्ही वसंतदादा पाटील यांना सोडून बाहेर पडलात तेव्हा त्यांना देखील असेच वाईट वाटले असेल, हे वाक्य बोलून छगन भुजबळ यांनी शरद पवार यांना एकप्रकारे आरसा दाखवला.

पुढे शरद पवार यांना उद्देशून बोलताना छगन भुजबळ म्हणाले, साहेब आपण वसंतदादांना सोडलं तेव्हा त्यांनाही असंच वाईट वाटलं असेल. बाळासाहेब ठाकरे यांच्याशी मतभेद झाल्यानंतर मी शिवसेनेतून बाहेर पडल्यानंतर बाळासाहेब आणि माँसाहेबांनाही इतकंच वाईट वाटलं असेल. तुम्ही मला तेव्हा तिकडेच थांबा, असे सांगितले नाही. तुम्ही धनजंय मुंडे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये आणले तेव्हा गोपीनाथ मुंडे आणि पंकजा मुंडे यांच्या डोळ्यातही असेच अश्रू तरळले असतील, अशी आठवणही करून दिली.

छगन भुजबळ यांच्या भाषणातील ही मांडणी पाहता अजित पवार गटाने आता कोणत्याही परिस्थितीत नमते घ्यायचे नाही, अशी भूमिका घेतल्याचे दिसत आहे.

शरद पवार यांना आवाहन करताना छगन भुजबळ म्हणाले, साहेब अजूनही काही बिघडलेले नाही. तुम्ही तुमच्याभोवतीच्या बडव्यांना बाजूला करा आम्ही सगळे तुमच्याकडे परत येऊ. तुम्ही नागालँडमध्ये राष्ट्रवादीच्या आमदारांना भाजपासोबत सत्ता स्थापन करण्याची परवानगी दिली, त्यांचा सत्कार केला. मग आमचाही सत्कार करा, आपण एकत्र सत्तेत बसू, असे म्हटले.

छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात शरद पवार यांच्या कार्यपद्धतीवर आसूड ओढताना म्हणाले, आपण कोणासोबतही गेलो तरी विचारधारा कायम राहिली पाहिजे. धरसोड वृत्तीचे राजकारण करुन चालणार नाही. २०१९च्या निवडणुकी आधी किंवा नंतर काय बोलणी झाली होती. अजित पवार उगाच सकाळी उठून शपथ घेण्यासाठी गेले का? आपण वारंवार दिल्लीत चर्चा करायची आणि काही दिवस झाले की त्यामधून माघार घ्यायची. अशा राजकारणामुळे आपण अनेक नेत्यांना तोंडघशी पाडतो, हे देखील लक्षात कसे येत नाही. साहेबांनी राष्ट्रीय अध्यक्षपदाचा राजीनामा दिला, अजितदादा म्हणाले मला प्रदेशाध्यक्ष व्हायचंय. आम्हाला ना काका सांगत ना पुतण्या, निवडी जाहीर झाल्यावर समजतं, अशी खंतही यावेळी बोलून दाखवली.

छगन भुजबळ यांनी आपल्या भाषणात राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना लक्ष्य केले. राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेत तीन वर्षांनी निवडणुका झाल्या पाहिजे, असे म्हटले आहे. तुम्ही सांगता सगळ्या निवडणुका घ्या. अध्यक्षपदाची निवडणूक घ्या, फ्रंटल निवडणुका घ्या, तालुक्याच्या निवडणुका घ्या, पण प्रदेशाध्यक्षपदाची निवडणूक घेऊ नका. तुमची निवडणूक घेत नाही तर आमची निवडणूक कशाला घेता? पिरॅमिड खालून वर जाते ना. सगळ्यांना सांगता भाकऱ्या फिरवायच्या आहेत. पण मेन रोटला बसलाय तो फिरवला पाहिजे की नाही, असा सवाल विचारत छगन भुजबळ यांनी जयंत पाटील यांना लक्ष्य केले.

Check Also

माढा लोकसभा मतदारसंघातील निवडणूक आता एकांगी की चुरसीची ?

लोकसभा निवडणूकांची रणधुमाळी सुरु झालेली असतानाच काही लोकसभा मतदारसंघातील लढती या फारच रंजक होणार असल्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *