राष्ट्रवादी काँग्रेसची मुलुखमैदान तोफ म्हणून ओळखले जाणारे माजी मंत्री नवाबभाई मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्यानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने आनंदोत्सव साजरा करण्यात आला.
राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यालयाबाहेर फटाके फोडून आणि पेढे वाटून राष्ट्रवादीच्या पदाधिकाऱ्यांनी व कार्यकर्त्यांनी आनंद साजरा केला. यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे आणि पदाधिकारी व कार्यकर्ते मोठया संख्येने उपस्थित होते.
माजी मंत्री नवाब मलिक यांना न्यायव्यवस्थेने दिलासा दिला त्याचा आनंद सुनिल तटकरे
दिर्घ प्रतिक्षेनंतर माजी मंत्री नवाब मलिक यांना आज न्यायव्यवस्थेने दिलासा दिला त्याचा आनंद आम्हाला आहे अशा शब्दात प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी माध्यमांशी बोलताना समाधान व्यक्त केले.
न्यायव्यवस्थेचा आम्ही नेहमीच आदर करत आलो आहोत. त्यामुळे दिलेल्या निर्णयावर आम्ही समाधानी आहोत असेही सुनिल तटकरे म्हणाले.
न्याय व्यवस्थेवर विश्वास
गेली ३० वर्षे मुंबई शहरात आपल्या कार्यप्रणालीने एक वेगळा ठसा नवाब मलिक यांनी निर्माण केला आहे, होता आणि तो कायम राहिल असा विश्वासही सुनिल तटकरे यांनी बोलताना व्यक्त केला.
सुप्रीम कोर्टाला धन्यवाद;न्यायदेवतेवरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला प्रवक्ते संजय तटकरे यांचा विश्वास
आमचे नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे ज्येष्ठ नेते व माजी मंत्री नवाब मलिक यांना आज सुप्रीम कोर्टाने जामीन मंजूर केल्याबद्दल सुप्रीम कोर्टाला धन्यवाद देत न्यायदेवतेवरील आमचा विश्वास आणखी दृढ झाला असल्याची प्रतिक्रिया राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे यांनी दिली आहे.
नवाब मलिक यांचा पक्षाच्या ध्येय धोरणांमध्ये आणि पक्षाच्या वाटचालीत सिंहाचा वाटा राहिला आहे. २००९ – १० पासून नवाब मलिक यांचा आणि माझा जवळचा संबंध आला. त्यावेळी नवाब मलिक हे पक्षाचे मुख्य प्रवक्ते म्हणून काम पहात होते. पक्षासाठी त्यांनी जो लढा दिला आहे तो निश्चितच वाखाणण्याजोगा आहे. नवाब मलिक ज्या अडचणीतून गेले त्यावर मात करून ते लवकरच कार्यरत होतील अशी खात्री संजय तटकरे यांनी व्यक्त केली आहे.
आम्ही नवाब मलिक यांची आतुरतेने वाट बघत आहोत. राष्ट्रवादी काँग्रेसच्या मिडिया सेलला त्यांच्या येण्याने नक्की उभारी मिळेल असा विश्वासही संजय तटकरे यांनी व्यक्त केला.
https://twitter.com/NCPSpeaks1/status/1689979401877016576?s=20