Breaking News

येवल्यातील रेशीम शेती आणि त्यावर आधारित पूरक उद्योगांचा होणार विकास

राज्याचे अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांच्या विशेष प्रयत्नांतून शासनाच्या एकात्मिक व शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ -२८ अंतर्गत येवला शहरात शासकीय रेशीम कोष बाजार पेठ निर्माण करण्यास शासनाची मंजुरी मिळाली आहे. या बाजारपेठे मुळे येवल्यातील वस्त्रोउद्योगाला अधिक चालना मिळणार आहे.

रेशीम उद्योगामध्ये रोजगार निर्मितीला असणारा वाव विचारात घेता रेशीम उद्योगाला राज्याच्या अर्थव्यवस्थेत केंद्रस्थानी आणण्यासाठी व चालना मिळण्यासाठी तुती व टसर रेशीम कोष उत्पादकांकरिता शासकीय खुली कोषाची बाजारपेठ व कोषोत्तर प्रक्रियांतर्गत रिलींग उद्योजकांना सुत खरेदी विक्रीकरिता रेशीम सुत विनिमय बाजारपेठ स्थापन करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. रेशीम शेती व त्यावर आधारित पूरक उद्योगाचा सर्वकष विकास व्हावा म्हणून तुती व टसर रेशीम शेतकरी यांनी उत्पादित केलेल्या रेशीम कोषास शासकीय खुली कोष खरेदी विक्री बाजारपेठ व कोषोत्तर प्रक्रिया उद्योगातील रिलींग उद्योजक यांना येवला येथे शासकीय रेशीम कोष बाजारपेठेची स्थापन करण्यास मान्यता देण्यात आली आहे.

येवला शहर हे पर्यटन दृष्ट्या व पैठणीसाठी अतिशय महत्वाचे शहर असून पैठणी उद्योगाला अधिक चालना मिळण्याच्या दृष्टीने मंत्री छगन भुजबळ यांच्या माध्यमातून एरंडगाव येथे रेशीम पार्क उभा करण्यासाठी जागा राखीव करण्यात आलेली आहे. या जागेत रेशीम पार्क उभा करण्यासाठी मंत्री छगन भुजबळ यांच्या अध्यक्षतेखाली मे २०२३ मध्ये प्रादेशिक रेशीम कार्यालय पुणेच्या सहायक संचालक डॉ.कविता देशपांडे, नाशिकचे रेशीम विकास अधिकारी इंगळे, सारंग सोरटे यांच्या उपस्थितीत नाशिक येथे बैठक पार पडली होती. या बैठकीत मंत्री छगन भुजबळ यांनी येवला येथे रेशीम पार्क उभा करण्याच्या दृष्टीने प्रकल्प अहवाल सादर करण्याचा सूचना संबंधित अधिकाऱ्यांना दिल्या होत्या.

येवला येथील पैठणी उद्योगाला चालना देण्यासाठी या ठिकाणी तुतीच्या शेतीला प्रोत्साहन देवून रेशीम उत्पादनासाठी रेशीम पार्क उभारण्याची गरज आहे. येवला हे पैठणीचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. या परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात पैठणी उद्योग व वस्त्रोद्योग आहेत. स्थानिक कारागीर घरोघरी पैठणी तयार करत असतात. मात्र पैठणी तयार करण्यासाठी लागणारा रेशीमधागा परराज्यातून आयात करावा लागतो. या उद्योगासाठी लागणाऱ्या कच्च्या मालाचे (रॉ सिल्क) उत्पादन स्थानिक पातळीवर व्हावे यासाठी येवला येथे रेशीम पार्कची नितांत आहे.

त्यानुसार राज्याच्या एकात्मिक व शास्वत वस्त्रोद्योग धोरण २०२३ -२८ अंतर्गत रेशीम शेती व त्यावर आधारित पूरक उद्योगांचा विकास करण्यासाठी तुती व टसर कोश, सुत खरेदी विक्रीसाठी खुली शासकीय बाजार व कच्च्या रेशीम एक्सचेंज स्थापन करण्याबाबत शासन निर्णय निर्गमित करण्यात आला आहे. त्यानुसार येवला येथे शासकीय कोषाची खुली बाजारपेठ निर्माण करण्यास शासनाने मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे येवल्यातील वस्त्रोद्योगाला अधिक चालना मिळणार आहे. तसेच तुती व टसर रेशीम उत्पादन करणाऱ्या शेतकऱ्यांच्या शेतमालाला हक्काची बाजारपेठ निर्माण होऊन शेतकऱ्यांना अधिक फायदा होणार आहे.

Check Also

मुख्यमंत्री शिंदे यांचा दावा, तीन लाख दहा हजार कोटी गुंतवणूक महाराष्ट्रात आणणार…

स्वित्झर्लंडमधील दावोस येथे होणाऱ्या जागतिक आर्थिक परिषदेच्या बैठकीसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे मंगळवारी १६ जानेवारी …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *