एकनाथ शिंदे यांच्या भाडेवाढ रद्दच्या निर्णयाची प्रताप सरनाईक यांच्याकडून अंमलबजावणी एसटीची १० टक्के भाडेवाड रद्द करण्याच्या निर्णयाची अंमलात

राज्यातील पूर परिस्थिती लक्षात घेता महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाने केलेली १० टक्के बस भाडे दरवाढ रद्द करण्याचे निर्देश परिवहन मंत्री यांना दिल्याची माहिती उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आज येथे जाहीर केले.

पुढे बोलताना एकनाथ शिंदे म्हणाले की, एस टी महामंडळ दरवर्षी दिवाळीच्या काळात दहा टक्के भाडेवाढ करीत असते. यातून साधारणपणे महामंडळाला ३० कोटी रुपयांचा महसूल मिळतो. मात्र यंदा राज्यात निर्माण झालेली पूरपरिस्थिती लक्षात घेवून अपवाद म्हणून महामंडळाने जाहीर केलेली १० टक्के भाडेवाढ रद्द करण्याबाबत परिवहन मंत्री प्रताप सरनाईक यांना निर्णय घेण्याचे निर्देश दिल्याचे यावेळी सांगितले.

या पार्श्वभूमीवर प्रताप सरनाईक यांनी एक प्रसिद्धी पत्रक जारी केले आहे. त्यानुसार परतीच्या पावसामुळे राज्यभर निर्माण झालेल्या पूर परिस्थितीमुळे सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले आहेत. अशा परिस्थितीमध्ये दिवाळी दरम्यान एसटीने केलेली १०% हंगामी भाडेवाढ रद्द करावी, असे निर्देश उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिले आहेत. त्यानुसार ही हंगामी दरवाढ रद्द करण्यात येत आहे, अशी घोषणा परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांनी केली.

पुढे बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, दरवर्षीप्रमाणे यंदाही दिवाळी हंगामात (१५ आक्टोबर ते ५ नोव्हेंबर दरम्यान) महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाकडून  (एसटी)  १० टक्क्यांची हंगामी भाडेवाढ करण्यात आली होती.  परंतु परतीच्या पावसामुळे आलेल्या पूर परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर सर्व सामान्य जनतेला सोसावा लागणाऱ्या आर्थिक भाराचा विचार करून उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सदर भाडेवाढ रद्द करावी अशी सुचना परिवहन मंत्री तथा एसटी महामंडळाचे अध्यक्ष प्रताप सरनाईक यांना केली. त्यानुसार मंत्री सरनाईक यांनी महामंडळाला दिलेल्या निर्देशानुसार महामंडळाने भाडेवाढ रद्द करण्याचा निर्णय घेतला आहे.

प्रताप सरनाईक म्हणाले की, यापूर्वी जाहीर केल्यानुसार १५ ऑक्टोबर ते ५ नोव्हेंबर या कालावधीत साधी, निमआराम (हिरकणी), शयन आसनी, वातानुकूलित शिवशाही आणि जनशिवनेरी अशा सर्व बसगाड्यांमध्ये १० टक्के भाडेवाढ लागू होणार होती. परंतु, आता प्रवाशांना अतिरिक्त भाडे मोजावे लागणार नाही. त्यामुळे नेहमीच्या दरानुसार दिवाळीत देखील प्रवाशांना एसटीचे तिकीट काढून प्रवास करता येणे शक्य होणार असल्याचे सांगितले.

शेवटी बोलताना प्रताप सरनाईक म्हणाले की, सणासुदीच्या काळात राज्य परिवहन प्राधिकरणाने महामंडळाला ३० टक्क्यांपर्यंत दरवाढ करण्याची मुभा दिली होती. त्यानुसार १० टक्के दरवाढीचा निर्णय महामंडळाने घेतला  होता. पण  राज्यातील पूरपरिस्थिच्या पार्श्वभूमीवर सर्वसामान्यांवर होणारा परिणाम लक्षात घेता हंगामी भाडेवाढ मागे घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. या निर्णयामुळे दिवाळी सणात एसटीने प्रवास करणाऱ्या कोट्यवधी प्रवाशांना दिलासा मिळाला असल्याचे सांगितले.

About Editor

Check Also

हर्षवर्धन सपकाळ यांची टीका, विधानभवनात बॉम्बची अफवा ही ढासळलेल्या कायदा सुव्यवस्थेचा परिणाम विधानभवनही सुरक्षित नाही तर जनतेच्या सुरक्षेचे काय

इराणच्या विरोधात अमेरिका आणि इस्रायलने पुकारलेल्या युद्धामुळे देशभरात एलपीजी गॅस सिलेंडरचा प्रचंड तुटवडा आहे त्याला …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *