Breaking News

महिलावरील अत्याचार रोखण्यासाठी विशेष पथकांची स्थापना करणार गृह राज्यमंत्री दीपक केसरकर यांची माहीती

नागपूर:प्रतिनिधी

“राज्यात घडणाऱ्या महिलावरील अत्याचाराच्या आणि छेडछाडीच्या घटनांवर देखरेख ठेवण्यासाठी चार पोलीस अधिकाऱ्यांचे विशेष पथक राज्यातील प्रत्येक जिल्ह्यात नियुक्त करणार असल्याची माहीती राज्याचे गृह राज्यमंत्री दिपक केसरकर यांनी दिली.

यासंदर्भात विधान परिषदेत शिवसेनेच्या नीलम गोऱ्हे यांनी अल्पकालीन सूचनेच्या माध्यमातून उपस्थित केला. त्यावर काँग्रेसच्या अॅड हुस्नबानू खलीफे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या विद्या चव्हाण आणि भाजपच्या स्मिता वाघ यांनी चर्चेत भाग घेत उपप्रश्न उपस्थित केले. प्रश्नावर उत्तर देताना केसरकर यांनी वरील घोषणा केली.

महिलांवरील अत्याचाराच्या आणि छेडछाडीचे गुन्ह्यांच्या घटनांमध्ये मोठ्या प्रमाणावर वाढ होत आहे. या घटनांना रोखण्यासाठी पोलीस उप अधीक्षक (आर्थिक गुन्हे) यांच्या नेतृत्वाखाली पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षक आणि सहायक निरीक्षकांचे एक पथक स्थापन करण्यात येणार आहे. तसेच १० पोलिस कर्मचाऱ्यांचा समावेशही यामध्ये करण्यात येणार असल्याचे केसरकर यांनी सांगितले.

पिंपरी चिंचवड पोलीस आयुक्तालयाच्या निर्मितीची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केली होती. त्याची प्रक्रिया सुरु झाली असून लवकरच त्याची निर्मिती करण्यात येणार आहे. मुंबई उपनगरीय रेल्वेने प्रवास करणाऱ्या महिलांच्या सुरक्षेसाठी ३००० कर्मचाऱ्यांची भरती करण्याबाबतचा प्रस्ताव रेल्वेला देण्यात आल्याचे त्यांनी सांगितले.

महिलांच्या गुन्ह्यांची माहिती देताना त्यांनी राष्ट्रीय पातळीवर प्रसिद्ध झालेल्या आकडेवारीचा दाखला दिला. अल्पवयीन मुलींवर शेजारी, नातेवाईक, परिचित, वडील, आजोबासारख्या व्यक्तींनी अत्याचार करण्याचे प्रमाण अत्यंत भयानक आहे. महिलांना पोलीस स्टेशनमध्ये योग्य ती वागणूक देण्याची व त्यांच्या केसबाबत संवेदनशीलता ठेवून काम करण्याची गरज यावेळी त्यांनी अधोरेखित केली. उपनगरीय रेल्वेत महिलांकरिता आरक्षित असलेला डबा केवळ पोलिसांची संख्या कमी असल्याने रदद करण्याचा प्रस्ताव रेल्वे सुरक्षा बलाणे दिल्याचा उल्लेख करून मुंबईतील महिला प्रवाशांकरिता हा डबा कायम ठेवण्याची मागणी यावेळी गोऱ्हे यांनी केली.

त्यास उत्तर देताना मंत्री केसरकर म्हणाले की, आमदार नीलम गोऱ्हे व सभागृहातील महिला आमदारांनी मांडलेली भावना विचारात घेऊन केवळ घोषणा न करता अंमलबजावणी करण्याची शासनाची भूमिका आहे. सर्व जिल्ह्यात सीसीटीव्ही कॅमेरे असलेल्या व्हॅनची गस्त शाळा परिसरात जाण्या-येण्याच्या मार्गावर  ठेवण्यात येणार आहे. यासाठी आवश्यक ते प्रशिक्षण देण्याची व्यवस्था पथकाला उपलब्ध करण्यात येईल. तसेच यासाठी स्वयंसेवी संस्थाची मदत घेण्यात येणार असून विशेष जनजागृती मोहीमही राबविण्यात येणार आहे. शहरी भागा सोबत  व ग्रामीण, दुर्गम भागातही दामिनी पथके कार्यरत करण्यात येतील.

 

Check Also

बिल्कीस बानोप्रकरण सर्वोच्च न्यायालयः आधी शरण या मुदतवाढ नाही

गुजरातमधील गोध्रा दंगली दरम्यान तथाकथित हिंदूत्वावादी विचाराच्या लोकांनी बिल्कीस बानो या महिलेवर अत्याचर करत तिच्या …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *