Breaking News

बीजेपी-शिवसेनेच्या रूपाने राज्याला बोंडअळी आणि तुडतुड्याची लागण विरोधी पक्षांची राज्य सरकारवर टीका

नागपूर : प्रतिनिधी

राज्यात भाजप, शिवसेनेचे सरकार येवून तीन वर्षे झाली. मात्र या तीन वर्षात सरकारने महाराष्ट्राला उध्दवस्त करण्याचे काम केले असून या सरकारचे लाभार्थी हेच आहेत. सरकारच्या रूपाने महाराष्ट्राला बोंडअळी अन् तुडतुड्याची लागण झाली आहे. ‘बी फॉर बोंडअळी अन् बी फॉर बीजेपी’… ‘टी फॉर तुडतुडा अन् टी फॉर ठाकरे’ अशी टीका विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

हिवाळी अधिवेशनाच्या पूर्वसंध्येला आयोजित विरोधी पक्षांच्या बैठकीनंतर आयोजित करण्यात आलेल्या संयुक्त पत्रकार परिषदेत बोलताना त्यांनी टीका केली.

दिवाळीच्या आदल्या दिवशी १८ ऑक्टोबरला मुंबईत मुख्यमंत्र्यांनी आणि जिल्ह्याजिल्ह्यात पालकमंत्र्यांनी कर्जमाफीची प्रमाणपत्रे वाटली. त्या सर्व शेतकऱ्यांनाही अजून कर्जमाफी मिळालेली नाही. त्यामुळे अधिवेशनापूर्वी थोडी फार तरी कर्जमाफी करण्यासाठी सरकारकडून बॅंकांवर दबाव आणला जात असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी केला.

आठवडाभरापूर्वी भारतीय जनता पक्षाच्या ट्वीटर हॅंडलवरून राज्य सरकार ‘मेक इन महाराष्ट्र’ करतेय की,‘फूल इन महाराष्ट्र’ करतेय, असा प्रश्न विचारून स्वतःच्याच कारभाराची लक्तरेवेशीवर टांगली. या ट्वीटच्या माध्यमातून भाजपने पहिल्यांदाच लोकांच्या ‘मन कि बात’ केली. मी त्यावेळी ट्वीट केले होते की, भारतीय जनता पक्षाने जे ट्वीट केले, तीच आज महाराष्ट्राची वस्तुस्थिती आहे. त्याची जाणीव आता भाजपलाही झालेली असल्याने ‘मनी वसे ते ट्वीटी दिसे’…अशी उपरोधिक टीकाही त्यांनी केली.

मला उद्धव ठाकरेंचे अभिनंदन करायचे आहे. लवकरच ते सत्ता सोडण्याच्या इशाऱ्यांचे शतक पूर्ण करणार आहेत. माझ्या माहितीप्रमाणे त्यांनी आतापर्यंत ९३ वेळा सत्ता सोडण्याचा इशारा दिला असल्याचा उपरोधिक टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

सरकारची तीन वर्षांतील वाटचाल शेतकरी, कष्टकरी, मागासवर्गीय, आदिवासी, अल्पसंख्याक, महिला, युवक, विद्यार्थी अशा सर्वच समाजघटकांवर अन्याय करणारी राहिली आहे. कर्जमाफी जाहिर झाल्यापासुन १५०० शेतकरी आत्महत्या झाल्या. तर कर्जमाफीच्या ऑनलाईन कामाचे कंत्राट इनोव्हेव कंपनीला मिळणं हा सुद्धा मोठा भ्रष्टाचार आहे. वाशीम जिल्ह्याच्या मानोरा तालुक्यातील सोयजना येथील शेतकरी ज्ञानेश्‍वर नारायण मिसाळ यांनी मंत्र्यांची भेट घेऊन, समस्या सांगूनही दिलासा न मिळाल्याने ६ डिसेंबर रोजी यवतमाळला आत्महत्या केली. यातून सरकारचा जनतेवर विश्वास राहिला नसल्याचे सिद्ध होत असल्याचा आरोप विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे केला.

यावेळी बोंडअळी आणि तुडतुड्याची लागण झालेल्या शेतकऱ्यांना २५ हजार रूपयांची नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी मुंडे यांनी केली.

Check Also

नाना पटोले यांचा सवाल महागाई, बेरोजगारीसारख्या प्रश्नावर भाजपा गप्प का?

लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यातील प्रचाराच्या शेवटच्या दिवशीही काँग्रेस नेत्यांनी प्रचाराचा धडाका लावला. लोकसभेची निवडणूक जनतेने …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *