मुंबईः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर पावसाळी अधिवेशन ज्या पध्दतीने घेण्यात आले. त्याच पध्दतीने हिवाळी अधिवेशन घेण्याचा निर्णय विधिमंडळ सल्लागार समितीच्या बैठकीत घेण्यात आला असून हे अधिवेशन १४ आणि १५ डिसेंबर असे दोनच दिवस चालणार असल्याची माहिती सांसदीय कार्यमंत्री अनिल परब यांनी दिली.
या बैठकीला विधानसभाध्यक्ष नाना पटोले, विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर, मुख्यमंत्री उध्दव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, विधान परिषद विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांच्यासह विविध पक्षांचे गटनेते उपस्थित होते.
या दोन दिवसीय अधिवेशनाही प्रत्येक आमदाराला कोविड-१९ ची चाचणी करावी लागणार आहे. तसेच ज्या आमदाराची चाचणी नकारात्मक येईल त्यांनाच विधिमंडळात प्रवेश देण्यात येणार आहे.
मात्र सत्ताधाऱ्यांच्या या प्रस्तावाला विधानसभा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रविण दरेकर यांनी विरोध दर्शविला. गेल्यावेळीही पावसाळी अधिवेशन ७ आणि ८ सप्टेंबर हे दोनच दिवस अधिवेशन घेण्यात आले होते. आता पुन्हा दोन दिवसच हे अधिवेशन घेण्यात येणार असल्याने या दोन दिवसांत सरकार काय चर्चा करणार असा सवाल विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी बैठकीनंतर पत्रकारांशी बोलताना व्यक्त केला.
