Breaking News

राज्यात एरव्ही कडक निर्बंध तर शनिवार- रविवारला लॉकडाऊन अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील वाढत्या कोरोनाच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात कडक लॉकडाऊन करण्यासंदर्भात आज राज्य मंत्रिमंडळाची तातडीने बैठक घेण्यात आली. पंरतु कडक लॉकडाऊन लागू करण्याऐवजी आज रात्रीपासून कडक निर्बंध लागू करण्यावर एकमत झाले असून वीकएंडला अर्थात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजे पर्यंत पूर्ण लॉकडाऊन लागू करण्यास राज्य मंत्रिमंडळाने मान्यता दिल्याची माहिती राज्याचे अल्पसंख्याक मंत्री नवाब मलिक यांनी मंत्रिमंडळ बैठकीनंतर प्रसार माध्यमांशी बोलताना दिली.

राज्यात काल जवळपास ५० हजार बाधित रूग्ण आढळून आले. तसेच मुंबईतही ९ हजाराहून अधिक रूग्णांची नोंद झाली. त्यामुळे परिस्थिती आणखी गंभीर होवू नये यासाठी लॉकडाऊनबाबत चर्चा करण्यासाठी राज्य मंत्रिमंडळाची तातडीने बैठक बोलविण्यात आली. या बैठकीला जवळपास सर्वच मंत्र्यांनी ऑनलाईन पध्दतीने सहभागी झाले.

संपूर्ण कडक लॉकडाऊन लागू करण्याबाबत यावेळी चर्चा झाली. परंतु लॉकडाऊन लागू केल्यास त्याचे विपरीत परिणाम होण्याची शक्यता आहे. त्यामुळे कडक निर्बंध लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला. त्यासंदर्भातील नियमावली आज संध्याकाळी ते रात्री पर्यंत जाहिर करण्यात येणार आहेत. मात्र वीकएंडला अर्थात शुक्रवारी रात्री ८ वाजल्यापासून ते सोमवारी सकाळी ७ वाजेपर्यत कडक लॉकडाऊन राज्यात लागू करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

या काळात सर्व मॉल, हॉटेल, रेस्टॉरंट या गोष्टी बंद राहणार आहेत. तसेच चित्रपटगृह, नाट्यगृह ही बंद राहणार आहेत. शासकिय कार्यालयाबरोबरच खाजगी कार्यालयात ५० टक्के उपस्थिती बंधनकारक करण्यात आले आहे. तसेच कामगारांना त्यांच्या कारखान्याच्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था करावी असे निर्देश देण्यात आले असून एखाद्या ठिकाणी कामगार कोरोना पॉझिटीव्ह आले असेल त्याची काळजी घेवून त्याच्या कुटुंबियांची सदर उद्योजकांनी काळजी घेण्याचे निर्देशही देण्यात आले आहेत. त्याचबरोबर कामगारांवर कोणतेही निर्बंध राहणार नसल्याचे त्यांनी सांगितले.

याकालावधीत कोणत्याही स्वरूपात रेल्वे, बस, एसटी, रिक्षा, टॅक्सी या सेवा बंद राहणार नाहीत. त्यामुळे या सर्व सेवा सुरुच ठेवण्यात येणार आहे. तसेच यापुढील काळात कोणत्याही स्वरूपाचे राजकिय कार्यक्रम करण्यास बंदी राहणार आहे. तसेच धार्मिकस्थळानाही पूर्वीप्रमाणे नियम लागू राहणार असल्याचे त्यांनी शेवटी सांगितले.

राज्यात रूग्णांना रेमिडेस्विर इंजेक्शन उपलब्ध होण्याबाबत चर्चा झाली. हे इंजेक्शन रूग्णांना सहजरित्या उपलब्ध होण्याकरीता मंत्री डॉ. राजेंद्र शिंगणे हे पुढील नियोजन करत असल्याचे ते म्हणाले.

Check Also

राज्यात गेल्या वेळच्या तुलनेत २ हजार ६४१ मतदान केंद्रे वाढली

येत्या लोकसभा निवडणुकीसाठी राज्यात २ हजार ६४१ नवीन मतदान केंद्रे वाढली आहेत. यावेळी राज्यात ९८ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *