Breaking News

उत्तर भारतासह विदर्भात उष्णतेची लाट आणखी दोन दिवस आणखी राहणार असल्याचा हवामान खात्याचा अंदाज

नैर्ऋत्य मोसमी पावसाचा प्रवास सुरू असतानाच देशात सध्या पाऊस आणि तापमानवाढीचे परस्परविरोधी वातावरण आहे. जम्मू ते विदर्भापर्यंत उष्णतेची लाट आली असताना पूर्वोत्तर भागातील राज्ये आणि दक्षिणेकडील भागात सध्या मोसमी पाऊस पावसाने जोर धरला आहे. उत्तर भारतासह विदर्भातील उष्णतेच्या लाटेची स्थिती आणखी दोन दिवस कायम राहणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने व्यक्त केला.

मात्र अरबी समुद्राच्या बाजूने २९ मे रोजी केरळात आणि त्यानंतर ३१ मे रोजी कर्नाटकात प्रगती करून कारवारपर्यंत दाखल झालेल्या मोसमी पावसाचा प्रवास सध्या संथ गतीने सुरू आहे. गोव्याच्या जवळ तो पोहोचला असला, तरी पोषक वातावरण नसल्याने त्याची पुढे प्रगती थांबली आहे. अरबी समुद्रातील शाखेने गेल्या चार दिवसांपासून आगेकूच केली नाही. बंगालच्या उपसागरातील मोसमी पावसाच्या शाखेने ३ जूनला मोठी प्रगती करीत पूर्वोत्तर राज्यांसह हिमालयाच्या पायथ्यापर्यंत प्रगती केली. मात्र, शनिवारी ४ जून याही भागातून मोसमी पावसाची प्रगती थांबली होती.

उत्तरेकडून कोरडे आणि उष्ण वाऱ्यांचे प्रवाह तीव्र झाल्यामुळे उत्तर आणि मध्य भारतामध्ये गेल्या दोन दिवसांपासून तापमानात मोठी वाढ झाली आहे. जम्मू विभागापासून राजस्थान, हिमाचल प्रदेश, उत्तराखंड, पंजाब, हरियाणाचा दक्षिण भाग, दिल्ली, उत्तर मध्य प्रदेश, उत्तर प्रदेश, झारखंड, ओडिसा, छत्तीसगडसह विदर्भात सध्या उष्णतेची लाट आहे. विदर्भात गेल्या सलग दोन दिवसांपासून चंद्रपूरमध्ये ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे आणि देशातील उच्चांकी तापमानाची नोंद होत आहे.

पारा चांगलाच वाढल्याने विदर्भातील सर्वच भागांत लाहीलाही होत आहे. मध्य महाराष्ट्र आणि मराठवाड्यातही काही भागात पारा ४० ते ४२ अंश सेल्सिअसच्या पुढे गेल्याने उन्हाचा चटका तीव्र झाला आहे. अशा स्थितीत आता पावसामुळे मिळणाऱ्या थंडाव्याची प्रतीक्षा करण्यात येत आहे.

निम्म्या भारतामध्ये उष्णतेच्या लाटेची स्थिती असतानाच मोसमी पाऊस सक्रिय झालेल्या भागात आणि जवळच्या परिसरात सध्या जोरदार पाऊस होत आहे. मेघालयमध्ये पावसाचा जोर सर्वाधिक आहे. काही विभागांत २०० मिलिमीटरहून अधिक पावसाची नोंद होत आहे. आसाम, अरुणाचल प्रदेश, पश्चिम बंगाल आणि हिमालयाच्या उपविभागात पाऊस होत आहे. केरळ आणि दक्षिण कर्नाटकमध्येही पावसाने जोर धरला आहे.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *