Breaking News

देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता आयएमडीचे महासंचालक डॉ. एम महापात्रा

मागील काही दिवसांपासून उन्हाळ्याची तीव्रता जाणवत असताना उन्हाचा तडाखा आणखी वाढणार असल्याचा इशारा काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने दिल्यानंतर आज पुन्हा आगामी मे महिन्यात सुर्य आग ओकणार असल्याचा इशारा देत येत्या काही दिवसात देशात तापमानाचा पारा ५० अंशावर जाण्याची शक्यता भारतीय हवामान विभागाकडून वर्तवण्यात आली आहे.

मे महिना हा वर्षातील सर्वात उष्ण महिना असल्याने, पश्चिम राजस्थानच्या काही भागात तापमानाचा पारा ५० अंश सेल्सिअसवर जाण्याची शक्यता आहे. विशेष म्हणजे यंदाचा एप्रिल महिना हा देशातील आतापर्यंतचा चौथा सर्वात उष्ण महिना ठरला आहे, अशी माहिती आयएमडीचे महासंचालक डॉ. एम महापात्रा यांनी दिली आहे.

राजस्थानमध्ये यापूर्वी १९५६ साली सर्वाधिक कमाल तापमानाची नोंद झाली होती. यावेळी तापमानाचा पारा ५२.६ अंशावर पोहोचला होता. यावर्षी देखील मे महिन्यात सूर्य आग ओकणार असून तापमानाचा पारा ५० अंश सेल्सिअसच्या वर जाण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. त्यामुळे हवामानतज्ज्ञाने नागरिकांना सतर्कतेचा इशारा दिला आहे.

पश्चिम-मध्य आणि वायव्य भारतातील बहुतेक भागात कमाल तापमान पारा सरासरी तापमानाच्या अधिक राहणार आहे. ईशान्य भारताच्या उत्तर भागात देखील सरासरीपेक्षा अधिक तापमानाची शक्यता असल्याचे सांगत ते पुढे म्हणाले की, एप्रिल महिन्यात वायव्य आणि मध्य भारतातील सरासरी कमाल तापमान ३५.९ अंश सेल्सिअस इतके नोंदले आहे. गेल्या १२२ वर्षांत याठिकाणी सर्वोच्च कमाल तापमान ३७.७८ इतकं नोंदलं होतं.

सध्या देशात अनेक ठिकाणी तापमानाचा पारा ४६ अंश सेल्सिअसच्या पुढे गेला आहे. उत्तर प्रदेशातील अलाहाबाद, झाशी आणि लखनऊमध्ये एप्रिल महिन्यात अनुक्रमे ४६.८ अंश सेल्सिअस, ४६.२ अंश सेल्सिअस आणि ४५.१ अंश सेल्सिअस कमाल तापमानाची नोंद झाली आहे. महाराष्ट्रात देखील तापमानाचा पारा चढा असून विदर्भातील चंद्रपूर याठिकाणी सर्वाधिक ४६.४ अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदविले गेले आहे.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *