सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी पथके तैनात राज्य आपत्कालीन कार्य केंद्राची माहिती

भारतीय हवामान विभाग आणि राष्ट्रीय रिमोट सेन्सिंग केंद्राकडून मिळणाऱ्या पावसाच्या अनुमानानुसार राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत धरण विसर्ग, नद्यांची पाणी पातळी आणि  पूरस्थितीवर सतत लक्ष ठेवले जात आहे. धरणातून सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे नद्यांच्या पाणी पातळीतील वाढ लक्षात घेऊन सोलापूर, परभणी, नांदेड, गडचिरोली जिल्ह्यात मदत व बचाव कार्यासाठी आवश्यक पथके तैनात करण्यात आली आहेत. तसेच भारतीय हवामान विभागासोबत सतत संपर्क साधून पुढील हवामानाच्या अंदाजाची माहिती सर्व जिल्ह्यांना दिली जात असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

राज्य आपत्कालीन कार्य केंद्रामार्फत छत्रपती संभाजीनगर, अहिल्यानगर, जालना, बीड आणि परभणी या जिल्ह्यामध्ये  धरणातून सोडण्यात येणारा विसर्ग, नदीची पाणी पातळी याबाबत जलसंपदा विभाग, गोदावरी पाटबंधारे विकास महामंडळासोबत समन्वय साधून  बचाव पथकांचे संचालन व पूर्व तैनात आणि हवाई मदत करण्यात आली आहे.

सोलापूर जिल्ह्यात सीना नदी वडकबाळ येथे धोका पातळीच्यावर वाहत आहे. तसेच उजनी आणि वीर धरणातून अधिकचा विसर्ग झाल्याने भीमा नदी टाकळी येथे इशारा पातळीच्यावर वाहत असल्याने पंढरपूर येथे स्थानिक पथके तैनात करण्यात आली आहेत.

परभणी जिल्ह्यात गोदावरी नदी धालेगाव येथे धोका पातळीच्यावर वाहत असल्याने लष्कराचे एक पथक तैनात करण्यात आले आहे.

नांदेड जिल्ह्यात गोदावरी नदी नांदेड जुना पूल येथे इशारा पातळीच्यावर वाहत असल्याने राज्य  आपत्ती प्रतिसाद दलाचे एक पथक आणि स्थानिक शोध व बचाव पथके या ठिकाणी  तैनात करण्यात आली  आहेत.

गडचिरोली जिल्ह्यात सिरोंचा तालुक्यामध्ये गोदावरी नदीपात्रात तेलंगणा राज्यात झालेल्या पावसामुळे सोडण्यात येणाऱ्या विसर्गामुळे लक्ष्मी बॅरेज (मेडीगड्डा) येथे गोदावरी नदी इशारा पातळीपेक्षा वर वाहत असल्याने भामरागड आणि सिरोंचा तालुक्यामध्ये राज्य आपत्ती प्रतिसाद दलाचे  एक  पथक तैनात करण्यात आले आहे. तसेच या ठिकाणी शोध व बचाव कार्यासाठी स्थानिक पथकेही तैनात करण्यात आली आहेत.

राज्यात मागील २४ तासात पालघर जिल्ह्यात २१ मि.मी., मुंबई शहर १७ मि.मी., रत्नागिरी १६ मि.मी., सिंधुदुर्ग १२ मि.मी. आणि रायगड जिल्ह्यात १२ मि.मी. इतक्या सर्वाधिक पावसाची नोंद झाली आहे. तर गेल्या २४ तासात पुरात वाहून आणि भिंत पडून नाशिक, छत्रपती संभाजीनगर, लातूर आणि पालघर जिल्ह्यात प्रत्येकी एक व्यक्तीचा मृत्यू झाला असून नाशिक व पालघर जिल्ह्यात प्रत्येकी एक व्यक्ती जखमी झाली आहे. तसेच वीज पडून व पुरात वाहून धुळे जिल्ह्यात दोन, नांदेड जिल्ह्यात सात, छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यात सहा आणि लातूर जिल्ह्यात चार प्राण्यांचा मृत्यू झाला आहे. तसेच सातारा जिल्ह्यात ३० सप्टेंबर २०२५ रोजी रात्री १२.०९ वा. कोयनानगर परिसरात ३.४ रिश्टर स्केल भूकंपाची नोंद झाली असल्याचे राज्य आपत्कालीन कार्य केंद्राकडून कळविण्यात आले आहे.

About Editor

Check Also

हवामान विभागाचा ठाणे जिल्ह्याला दिला रेड, ऑरेंज आणि येलो अलर्ट २८ सप्टेंबरला रेड, २९ ला ऑरेंज तर ३० सप्टेंबर रोजी येलो अलर्ट चा इशारा

प्रादेशिक हवामान विभागाने दिलेल्या अंदाजानुसार, ठाणे जिल्ह्यात २८ सप्टेंबर २०२५ रोजी ‘रेड अलर्ट’ (Red Alert) …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *