Breaking News

उखाड्याने हैराण झालेल्या महाराष्ट्रात लवकरच मान्सून: फक्त पाच दिवस बाकी १५ जिल्ह्यांमध्ये होणार वादळी वाऱ्यासह पावसाच्या आगमनाची शक्यता

मागील काही दिवसात महाराष्ट्रासह उत्तर भारतात तापमानात वाढ झालेली असल्याने उन्हाच्या रखरखीने राज्यातील जनतेला चांगलेच हैराण करून सोडले. त्यातच राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये तापमान सातत्याने वाढतच असल्याचे दिसून येत आहे. यापार्श्वभूमीवर वातावरणात थोडासा गारवा निर्माण व्हावा यासाठी मान्सूनच्या सरी कधी कोसळतील याकडे सगळ्यांचेच लक्ष लागलेले असताना मान्सूनने अंदमानच्या बेटावर आपली हजेरी लावली असल्याची सुखद बातमी आली असून पुढील पाच दिवसात राज्यातील अनेक जिल्ह्यात मान्सून आपली हजेरी लावणार असल्याची दिलासादायक माहिती भारतीय हवामान खात्याने आज दिली.

दक्षिण भारतात नैऋत्य मोसमी वाऱ्यांचं आगमन होत आहे. अंदमाननंतर आता नैऋत्य मौसमी वारे बंगालच्या उपसागरापर्यंत पोहोचले आहेत. येत्या काही दिवसांत केरळ आणि त्यानंतर महाराष्ट्रातही मान्सून धडकणार आहे. दरम्यान, पुढील ५ दिवस महाराष्ट्रातील अनेक जिल्ह्यांत विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा ही हवामान खात्याने दिला आहे.

नैऋत्य मौसमी वाऱ्यांच्या हालचालीसाठी दक्षिण भारतात पोषक हवामान निर्माण झाले आहे. त्यामुळे संबंधित परिसरात बहुतांशी ठिकाणी पावसाची शक्यता आहे. तर काही ठिकाणी ढगाळ हवामानाची नोंद करण्यात आली आहे. अंदमान निकोबार बेटांवरील बहुतांशी ठिकाणी नैऋत्य मान्सूनचं आगमन झाल्यानंतर आता दक्षिण बंगालच्या उपसागरात देखील मान्सून धडकला आहे.

हवामान खात्याने आज पुण्यासह सातारा, कोल्हापूर, सांगली, सोलापूर, उस्मानाबाद, लातूर, बीड, परभणी, नांदेड, वाशिम, हिंगोली, नागपूर, चंद्रपूर, भंडारा गोंदिया, गडचिरोली या जिल्ह्यांना पावसाचा (येलो अलर्ट) इशारा दिला आहे. त्यामुशे येत्या काही तासांत याठिकाणी विजांच्या कडकडाटासह पावसाच्या सरी कोसळण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.

मात्र अकोला आणि अमरावती जिल्ह्यात उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा अंदाज असल्याने या जिल्ह्यातील नागरीकांनी काळजी घेण्याचे आवाहन केले आहे.  अकोला जिल्ह्यांत हवामान खात्याने उष्णतेच्या लाटेचा इशारा दिला आहे. उर्वरित महाराष्ट्रात मात्र उष्णतेची दाहकता काहीशा प्रमाणात कमी झाली असून तापमानाचा पारा किंचित घसरला आहे. पुढील पाच दिवस राज्यात कमी अधिक प्रमाणात हीच स्थिती कायम राहणार आहे.

परंतु अंदमान मध्ये मान्सूनचे आगमन झाल्याने काही दिवसांपूर्वी भारतीय हवामान खात्याने व्यक्त केलेल्या अंदाजानुसार २० ते २१ मे रोजी पर्यत मान्सूनचे आगमन होणार असल्याचा अंदाज खरा ठरण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *