Marathi e-Batmya

हवामान खात्याचा इशारा ‘या’ जिल्ह्यात मुसळधार पावसाची शक्यता

पुढील २४ तासांत मुंबई, पुणे कोकणासह राज्याच्या काही भागांत पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, कोकण, गोवा, उत्तर कर्नाटकच्या काही भागात आज पाऊस पडण्याचा अंदाज आहे. येणाऱ्या काही ठिकाणी मेघगर्जनेसह जोरदार पाऊस पडणार असून काही ठिकाणी ढगाळ वातावरण पाहायला मिळणार आहे. पुणे, सातारा, अहमदनगर, नाशिक, दक्षिण कोकणातील काही भागात पावसाची शक्यता आहे. वेगवेगळ्या ठिकाणी हलक्या ते मध्यम स्वरुपाच्या पावसाच्या सरी कोसळण्याचा अंदाज आहे.

पूर्व-मध्य अरबी समुद्रावर कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्याने वातावरणातील बदल कायम आहे. परिणामी महाराष्ट्रात आणि गोव्यात शुक्रवारी धनत्रयोदशीला मुसळधार पाऊस पडला. शनिवारही ११ नोव्हेंबर रोजी कोकण-गोवा आणि मध्य महाराष्ट्रात अवकाळी पावसाची हजेरी लागणार आहे. रत्नागिरी, कोल्हापूर, सातारा आणि सिंधुदुर्ग या जिल्ह्यांना आजही हवामान खात्याने पावसाचा इशारा दिला आहे.

मुंबईसह उपनगर आणि ठाणे जिल्ह्यात गेल्या २४ तासांत जोरदार पाऊस पडला आहे. यामुळे शहरातील हवा गुणवत्ता निर्देशांक सुधारला आहे. पुणे आणि आजूबाजूच्या परिसरातही धनत्रयोदशीच्या मुहूर्तावर चांगला पाऊस झाला आहे. रहदारी, रस्त्यांची कोंडी, रस्त्यांवरील पाणी, खराब दृश्यमानता अशी परिस्थिती पुण्यामध्ये शुक्रवारी पाहायला मिळाली. कोकण आणि दक्षिण मध्य महाराष्ट्राच्या काही भागात पाऊस झाला आहे. अरबी समुद्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाल्यामुळे पुढील २४ तासांत या भागात हलक्या ते मध्यम पावसाच्या सरी कोसळण्याती शक्यता हवामान विभागाने व्यक्त केली आहे.

Exit mobile version