Breaking News

स्कायमेट म्हणते, भारतीय हवामान खात्याची “ती” माहिती चुकीची केरळात मान्सून दाखल नाहीच

वाढत्या उन्हाच्या काहिलीने संपूर्ण भारतीय त्रस्थ झालेले असताना कधी एकदा मान्सूनचे आगमन होते आणि वातावरणात बदल होवून दिलासा मिळतो याची वाट पहात असताना नुकतेच भारतीय हवामान खात्याने केरळात मान्सून दाखल झाल्याचे जाहिर केले. मात्र भारतीय हवामान खात्याने जाहिर केलेली माहिती चुकीची असल्याचा दावा स्कायमेट या खाजगी हवामान कंपनीने केली. त्यामुळे नागरिकांमध्ये संभ्रम निर्माण झाला असून स्कायमेट म्हणते ते खरे की भारतीय हवामान खाते सांगते ते खरे असा प्रश्न निर्माण झाला आहे.

भारतीय हवामान खात्याने रविवारी २९ मे रोजी केरळमध्ये मान्सूनच्या आगमनाची घोषणा केली. यानंतर सर्वत्र मान्सूनच्या आगमनाच्या बातमीने चैतन्याचं वातावरण निर्माण झालं. मात्र, दोनच दिवसात ही घोषणा वादग्रस्त ठरलीय. हवामानाचा अंदाज लावणाऱ्या स्कायमेटसह काही स्वतंत्र हवामान संस्थांनी आयएमडी अर्थात भारतीय हवामान खात्याच्या या घोषणेवर आक्षेप घेतला आहे. आयएमडीने केरळमध्ये मान्सून दाखल होण्याची घोषणा करण्यासाठी ज्या मुलभूत निकषांची पूर्तता व्हायला हवी ते पूर्ण केले नसल्याचा गंभीर आरोप या संस्थांनी केला.

आयएमडीचे संचालक मृत्यूंजय मोहापात्रा एका इंग्रजी वर्तमानपत्राशी बोलताना म्हणाले की, आम्ही वैज्ञानिक निकषांबाबत कधीही तडजोड करत नाही. कारण केवळ खासगी हवामान संस्थाच नाही, तर जगभरातील प्रतिष्ठित संस्थांनाही आयएमडीच्या अंदाजाची मदत होते. अंदाज वर्तवताना आमची ओळख वैज्ञानिक निकषांचं कठोर पालन करण्यासाठी आहे.

स्कायमेटने सोमवारी ३० मे जारी केलेल्या निवेदनात आयएमडीच्या घोषणेवर तीव्र आक्षेप घेतले. यात म्हटलं आहे, आयएमडीने रविवारी केरळमध्ये मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यासाठी केवळ दोन दिवसांच्या वाऱ्याचा वेग आणि ओएलआरचा (आऊटगोईंग लाँगव्हेव रेडिएशन) विचार केला. मात्र, सर्वात महत्त्वाचा निकष म्हणजे केरळमधील विविध स्टेशन्सवरील पावसाच्या प्रमाणाच्या निकषाचं पालन झालेलं नाही.

आयएमडीनेच तयार केलेल्या निकषांप्रमाणे मान्सून दाखल झाल्याची घोषणा करण्यासाठी ठराविक स्टेशनवर दोन दिवस पावसाच्या निकषाची पूर्तता होणं आवश्यक आहे. मात्र, हे निकष केवळ २९ मे या एकच दिवशी पूर्ण झाले आहेत. एक दिवस आधी म्हणजे २८ मे आणि एक दिवस नंतर म्हणजे ३० मे रोजी निश्चित केलेल्या स्टेशन्सपैकी केवळ ४० टक्के ठिकाणीच पावसाचा निकष पूर्ण झाल्याचे स्कायमेटने सांगितले.

केवळ एका दिवसाच्या पावसाच्या आधारे मान्सून आगमनाची घोषणा करणे हे निकषांचं गंभीर उल्लंघन आहे. असं याआधी कधीही झालेलं नाही असा आरोप स्कायमेटने केला. तसेच आमच्या निरिक्षण आणि नोंदीनुसार अद्याप मान्सून केरळमध्ये दाखल झाला नसल्याचा दावाही स्कायमेटने केला. तसेच १४ पैकी ७ स्टेशन्सवर अजिबात पाऊस पडलेला नाही आणि २ स्टेशन्सवर १ मिमीपेक्षा कमी पाऊसाची नोंद असल्याचा दावाही स्कायमेटने केला.

Check Also

पाणथळ जागांसोबतच कांदळवनांच्या संरक्षणासाठी प्रभावी कारवाई मुख्यमंत्र्यांनी घेतली महाराष्ट्र पाणथळ प्राधिकरणाची बैठक

राज्यातील पाणथळ जागांसोबतच कांदळवनांचे संरक्षण करण्यासाठी जिल्हा प्रशासनाने अधिक प्रभावीपणे कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्री एकनाथ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *