Breaking News

पवार म्हणाले, आम्ही तिघे मिळून एकत्रित सरकार चालवतो, पक्ष नाही सहकार खाते, विधानसभा अध्यक्ष, स्वबळाच्या नाऱ्यावर पवारांनी भूमिका केली स्पष्ट

बारामती: प्रतिनिधी

मागील काही दिवसांपासून केंद्र सरकारने नव्याने स्थापन केलेल्या सहकार खात्यावरून राज्यातील साखर कारखानदारीबद्दल अनेक तर्क वितर्क लढविण्यात येत होते. तालिका अध्यक्ष तथा शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी विधानसभा अध्यक्ष पदावरून केलेली विधाने यासह काँग्रेस पाठोपाठ आता शिवेसेनेनेही दिलेला स्वबळाचा नारा यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी महाविकास आघाडी म्हणून असलेली भूमिका स्पष्ट केली.

केंद्राने जरी सहकार खाते निर्माण केलेले असले तरी राज्यातील कारखानदारींवर गडांतर येणार असल्याच्या चर्चेमध्ये तथ्य नाही. तसेच राज्यघटनेनुसार सहकार हा विषय राज्यांच्या सूचित येतो. त्यामुळे त्याविषयीचे कायदे यापूर्वी राज्य सरकारने केलेले आहेत. त्या कायद्यांमध्ये हस्तक्षेप करण्याचा अधिकार केंद्राला नसल्याचे त्यांनी स्पष्ट करत मल्टीस्टेट बँकांचा विषय हा केंद्र सरकारच्या अखत्यारीत येत असून यापूर्वी होता आणि आताही असल्याचे सांगत सहकार विषय नवा नसल्याचे त्यांनी स्पष्ट केले.

बारामतीत आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते

काँग्रेसेच्या हिश्शाचे विधानसभा अध्यक्ष पद सध्या रिक्त असतानाच नुकत्याच पार पडलेल्या पावसाळी अधिवेशनात तालिका अध्यक्ष म्हणून शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी ज्या पध्दतीने अध्यक्ष पद सांभाळून दाखविले. तसेच तिन्ही पक्षांनी मला आपल्याला अक्ष्य पदी बसविले तर स्विकारण्याची तयारी दर्शवित वन मंत्री पदही शिवसेनेकडे रहावे असे स्पष्ट केले. त्यामुळे शिवसेना विधानसभा अध्यक्ष पद हिसकावून घेणार असल्याची चर्चा राज्याच्या राजकारणात सुरु झाली. या चर्चेचा अनुषंगाने ते म्हणाले की, आमच्या तीन पक्षांचा निर्णय झाला आहे. विधानसभेचे अध्यक्षपद काँग्रेसकडे होतं आणि ते काँग्रेसकडेच राहणार आहे. त्यामुळे कोणीही काही बोलायचा संबंधच येत नाही. आम्हा तिन्ही पक्षांना काँग्रेसचा अध्यक्ष मान्य आहे. त्या निर्णयावर आम्ही कायम आहोत असल्याचे सांगत शिवसेनेला हे पद जाणार नसल्याचे स्पष्ट केले.

दरम्यान समान नागरी कायद्यासंदर्भात बोलताना त्यांनी केंद्र सरकार याबाबत निर्णय घेत नाही, तोपर्यंत यावर भाष्य करणं योग्य राहणार नाही. निर्णय घेण्याचा अधिकार हा केंद्र सरकारचा असल्याचे त्यांनी सांगत याप्रश्नी अधिक बोलण्याचे त्यांनी टाळले.

काँग्रेसपाठोपाठ आता शिवसेनेनेही स्वबळाचा नारा दिल्याच्या पार्श्वभूमीवर विचारले असता ते म्हणाले की, आम्ही आघाडीच्या माध्यमातून एकत्रित सरकार चालवित असलो तरी आम्ही पक्ष एकत्रित चालवित नसल्याचे स्पष्ट करत प्रत्येकजण आपला राजकीय पक्ष मोठा करण्याच्या प्रयत्नात असणार. काँग्रेसने भूमिका घेतली असेल तर त्यात काहीही चुकीचे नाही. आम्ही प्रत्येकजण पक्ष वेगळ्या पद्धतीने चालवतो. प्रत्येकाला आपल्या पक्षाची व्याप्ती वाढावी अशी इच्छा असणार. यात काहीही चुकीचं नाही. त्यामुळे यात गैरसमज असण्याचं काहीही नाही. सरकार एक विचारानं आहे की नाही हे महत्वाचं असल्याचे त्यांनी सांगितले.

Check Also

त्या हिंसक घटनांची सर्वोच्च न्यायालयाच्या निवृत्त न्यायमुर्तीकडून चौकशी करा भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांची मागणी

कोल्हापूरः प्रतिनिधी त्रिपुरामध्ये कोणतीही अनुचित घटना घडली नसताना, जगात कोठे तरी मशिदीची नासधूस झाल्याची व्हिडीओ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *