Breaking News

युध्द ! संवेदनशील लेखक, विनोदी अभिनेते अंकुर विठ्ठलराव वाढवे यांचे खास सदर आपल्यासाठी

पुलवामाच्या हल्ल्यानंतर संपूर्ण देशभर निषेधाचा, विरोधाचा सूर प्रचंड मोठ्याप्रमाणात घुमू लागला, आणि तो घुमने साहजिकच आहे. आपल्या जीवाची पर्वा न करता उन्हात, पावसात, थंडीत गाठत संरक्षणाची भींत म्हणून उभ्या असलेल्या जवानावर हा हल्ला होता. त्यामुळे हा राग स्वाभाविक आहे. संपूर्ण देशात हा राग पसरलेला असताना रवी कसा शांत बसू शकतो. रवी वय वर्ष ३० गेली सहा वर्ष एम.पी.एस्सी.चा अभ्यास आणि सतत परिक्षा मध्ये एक दोन मार्काने नापास होत राहिला, वय निघून चाललं म्हणून चक्की चालवणाऱ्या त्याच्या बापाने त्याच लग्न लावून दिलं. अभ्यासाचा पिकअप जरी कमी असला तरी पाच वर्षात तीन मुलांना जन्माला आणले. असाच एकदा त्याला देशातल्या लोकांचा राग आला होता. तेव्हा नुकतेच सरकारने जाहिर केले होते की, हम दो हमारे दो ! नुसार ज्याना दोन मुलाच्यावर अपत्य असतील त्याना सरकारची कुठंलीच योजना मिळणार नाही. पण लोकं तीन आपत्य असले तरी दोन दाखवत होते. हा सरकारी हुकूमाचा अवमान आहे, म्हणून त्याने गावातली दहा जाणकार आणि सुजान नागरिक असलेले तरुण जमवले आणि आपण रॅली काढून लोकाना जागृत करायचा विडा आपहून हाती घेतला. पण या शुभकार्यात नेमकी माशी शिंकली, त्याची बायको भाग्यश्रीला तिसऱ्यांदा बाळांतपणाची कळ आली आणि आपले हे महत कार्य रवीला कुटुंबासाठी थांबवावे लागले.

पुलवामाच्या हल्ल्यानंतर मात्र त्याला राहवेना आपण सीमेवर जावून लढाई तर करू शकत नाही म्हणून त्याने पबजी गेम डाउनलोड केला. पण त्याला त्यात आपल्या रागाला शांत करता येत नव्हते वारंवार त्याला गोळ्या लागत आणि तो निराश व्हायचा, टि. व्ही. वरच्या बातम्या ऐकून त्याला स्फूर्ति यायची ’आज भारताने सर्जिकल स्ट्राइक केला‘ या बातमीने तो येवढा आनंदी झाला की त्याला तो आनंद कसा व्यक्त करू हे कळत नव्हते. त्याच्या मित्राने; शिवाने लगेच फेसबूक वर एक पोस्ट टाकली त्याला एका मिनिटांत वीस लाइक्स मिळाले! आणि रवीला व्यक्त होण्याचा साक्षात्कार झाला. त्यानेही फेसबुक, व्हॉट्सअपवरून पाकीस्तानचा खमखमीत समाचार घेत, ‘पाकीस्तानला बेचीराख करून टाकलं पाहिजे! भारतीय जवान कुणापुढे झुकणार नाही! ये नया हिन्दुस्थान है घर में घुसेगा भी और मारेगा भी’ अशा नुकत्याच पाहुन आलेल्या चित्रपटातले संवाद टाकुन पोस्ट शेअर केली. अवघ्या अर्धा तासात त्याला काही हजार लाइक्स आणि शेअर्स मिळाले. हे सातत्याने त्याने पाच दिवस सुरू ठेवले पण सहाव्या दिवशी त्याला हे थांबवाव लागलं, त्याच्या वडीलाची तब्येत बिघडल्यामुळे आता त्याला चक्की सांभाळावी लागत आहे. म्हणून त्याच्या या जनजागृतीचा आणि व्यक्त होण्याचा कार्याला अर्धविराम मिळाला.

रात्री जेवताना युध्द सादृश्य बातम्या बघून पाकिस्तानला शिव्या घालत होता,

त्याचे बाबा त्याच्यावर ओरडले ‘काम कर! काम, युध्दान कोणाचं भल झालं नाही!‘

रवी मात्र त्याच्या बाबावर उलटा ओरडला, ‘ओ बाबा तुम्ही शांत बसा! या पाकिस्तानला असाच धडा शिकवावा लागतो, तुम्हाला काय माहीत हो युध्दातलं? माझे आजोबा किमान सीमेवर लढून शहिद झाले, तुम्ही काय केलं? आयुष्यभर चक्की आणि उरलेल्या वेळेला हमाली! आले मोठे सांगणारे!‘

खाटेला टेकलेले त्याचे बाबा आईच्या मदतीने उठून बसले, ‘बाळा रवी, माझा बाप जेव्हा दुश्मनाच्या गोळीने घायाळ झाले होते आणि आपले शेवटचे क्षण विव्हळत मोजत होते. तेव्हा त्यांच्या सोबत मी होतो, अगदी तेरा-चौदा वर्षाचा होतो, बापाच्या पायात सोळा आणि खांद्यात दहा गोळ्या घुसल्या होत्या, पायाची आणि हाताची अगदी चाळण झाली होती, जखमा एवढ्या खोल होत्या की, डॉक्टरला त्यांचे पाय आणि हात कापावा लागला. पण त्याने त्यांचा जीव वाचला नाही. मलाही तेव्हा वाटलं होत सैन्यात भरती होउन देशाची सेवा करावी.‘

रवी, ‘करायची ना मग!‘

बाबा, ‘बापाचं छत्र हरवलं, काका नाही, मामाने शिक्षणासाठी मदत केली नाही, आईवर लोक वाईट नजर टाकत होते ते मला आवडत नव्हतं म्हणून मी काम करून शिक्षण घेत होतो, पण, शिक्षणाच्या खाजगीकरणामुळे शिक्षणाचा भार सोसवत नव्हता. एक दिवस आमचे ढेमाले गुरूजीनी वर्गावर तास घेताना सांगितले, फक्त सीमेवर लढणे म्हणजेच देशसेवा नाही. आपण जास्त काम करून देशाच्या अर्थव्यवस्थेत एक रूपयाचा का होईना हात भार लावणे याला पण देश सेवा म्हणतात! त्यांनी हिरोशिमा-नागासाकीचं उदाहरण दिलं अणुबॉम्ब पडल्यावर ज्या जागेवर वर्षानुवर्ष गवतही उगवत नाही ती जागा तेथील लोकानी काही वर्षातच हिरवी केली एवढंच नाही तर ढेपाळलेली अर्थव्यवस्था ही २४ तासातले १८ तास काम करुन पूर्ववत आणली.‘

रवी हसला आणि बोलंला, ‘बोलायला काय जाते बाबा कोण एवढं काम करतं का?‘

बाबा, ‘बाळा, चक्की आपलं घर सांभाळण्यासाठी चालवतो आणि आजही हमालीतून जमलेले पैसे मी शहिद जवानाच्या कुटुंबाला मदत म्हणून निधीमध्ये टाकतो. तुझ बर आहे तुझा बाप जीवंत आहे, युध्द जिंकता येतं पण बाप, भाऊ, पोरगा परत मिळवता येत नाही. आजही जपानने अणूबॉम्ब टाकलेल्या जागेवर जरी हिरवळ केली असली तरी त्या हल्यात जळालेल्या बिल्डींगचा ढाचा अजुनही तसाच ठेवला कामाची गती कमी होउ नये म्हणून‘

बाबाच्या शेवटच्या वाक्याने रवी बॉम्ब पडल्यासारखा शांत झाला होता, आणि दुसऱ्या दिवशीपासून सकाळी पीठाची चक्की आणि सांयकाळ नंतर मिळेल ते काम करू लागला हे, मोबाइलसाठी रूसून बसलेल्या मुलाला सांगताना अचानक त्याचे डोळे पाणावले.

Check Also

शेतकरी पोराच्या लग्नाची गोष्ट… सर्जनशील लेखक सुदेश जाधव यांची वास्तवाधारीत काल्पनिक कथा

केशव रत्नाकरची वाट बघत होता. दिवे लागणीची वेळ होत आली तरी सकाळी गेलेला माणूस अजून कसा आला नाही याची काळजी …

3 comments

  1. छान अंकुर अप्रतिम लेख प्रत्येकाच्या मलातील रवी शोधून काढलास देशभक्तीचे अवडंबर माजवणार्याना सनसनीत चपराक मारलीत.

  2. Ankur khup real truth mandlaay keep it up Ani congratulations tu ase blog lihinyas survaat Keli

  3. सतीश जाधव

    खुप सुंदर बोध कथा आहे अंकुर भाऊ आणि धन्यवाद योग्य मार्ग दाखवला माझ्यातल्या रवीला मार्ग दाखवल्या बद्दल

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *