Breaking News

वंचित आघाडीची स्थापना भाजपच्या पराभवासाठी की विजयासाठी ? आंबेडकरांच्या विरोधातील वाढत्या नाराजीने वंचित आघाडीत बिघाडी होण्याची शक्यता

मुंबईः प्रतिनिधी
केंद्रातील भाजप सरकारला पराभूत करण्यासाठी समविचारी पक्षांना एकत्रित करण्याच्या हालचाली सुरु असतानाच भाजपबरोबरच, काँग्रेस-राष्ट्रवादी कॉंग्रेसलाही विरोध करत भारिप-बहुजन महासंघाचे अध्यक्ष अँड. प्रकाश आंबेडकर यांनी वंचित आघाडीची स्थापना केली. परंतु त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या राजकारणावर वंचित आघाडीतील सहकाऱ्यांकडून संशय व्यक्त करत आंबेडकरांच्या विरोधात नाराजीचा सुर वाढत असून ही आघाडी भाजपच्या विजयासाठी कि पराभवासाठी असा सवाल वंचित आघाडीतील पक्षांकडूनच उपस्थित करण्यात येत असल्याची माहिती विश्वसनीय सूत्रांनी दिली.
हिंदूत्ववादी विचारसरणीच्या आधारावर केंद्रातील सरकार चालत असल्याने या सरकारला पराभूत करण्यासाठी पुरोगामी विचारसरणीच्या पक्ष आणि अराजकिय संघटनांकडून स्वतंत्र आघाडी उभारण्याचे काम राज्य आणि केंद्र पातळीवर सुरु आहे. त्यादृष्टीने सुरुवातीला अँड. प्रकाश आंबेडकर यांनी काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसबरोबर आघाडी करण्याची तयारी दाखविली. त्यादृष्टीने दोघांमध्ये चर्चेच्या फेऱ्याही झडल्या. परंतु अचानक आंबेडकर यांनी राज्यातील २२ लोकसभा मतदारसंघातील उमेदवारांची यादी जाहीर केली. त्याचबरोबर रा.स्व.संघाच्या मुद्यावरूनही जाणीवपूर्वक वेळकाढूपणा केल्याचे त्यांनी सांगितले.
या गोष्टी करत असतानाच दुसऱ्याबाजूला पुरोगामी विचारणीच्या संघटना आणि राजकिय पक्षांना सोबत घेण्याचे टाळत स्वतंत्ररित्या वंचित आघाडीची स्थापना केली. तसेच समविचारी पक्षाशी आघाडी करण्याची वेळ संपली असल्याचे जाहीर करत स्वतंत्ररित्या उमेदवार जाहीर केले. या जाहीर केलेल्या उमेदवारांनाच स्थानिक पातळीवर कोणी ओळखते असा प्रश्न निर्माण होत असून सामाजिक चळवळीत या उमेदवारांचे स्थान तरी काय असा सवालही त्यांनी केली.
या वाढत्या नाराजीच्या चर्चा करण्यासाठी अनुषंगाने बहुजन समाजातील काही सन्मानीय व्यक्तींनी प्रकाश आंबेडकर यांची भेट घेवून त्यांच्याकडून करण्यात येत असलेल्या राजकारणाविषयी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली. परंतु आंबेडकर यांनी त्यांची मते शांतपणे ऐकून न घेता त्यांनाच चुकीचे ठरवित आम्ही काँग्रेस-राष्ट्रवादीबरोबरच भाजपची मते खाणार असल्याचे सांगत त्यांना पाठवून दिल्याचे त्यांनी सांगितले.
याशिवाय वंचित आघाडीतील घटक पक्ष असलेल्या जनता दललाही विश्वासात प्रकाश आंबेडकरांनी घेतले नाही. त्यामुळे त्या पक्षाकडून जाहीर केलेला औरंगाबाद येथील उमेदवार कोळसे-पाटील यांना बाजूला करण्यात आले. त्यातच कोळसे-पाटील यांनी केलेल्या टीकेमुळे आणि त्यास उत्तर देण्याचे प्रकाश आंबेडकरांनी टाळल्यामुळे त्यांच्या भूमिकेबाबत संशय निर्माण होत असल्याचे सांगत वंचित आघाडीसोबत जायचे की स्वतंत्र रहायचे याबाबत लवकरच निर्णय घेण्यात येणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

Check Also

वंचितचा आरोप, सत्ताधारी पक्षाकडून वंचितच्या उमेदवारांना धमकावण्याचा प्रयत्न

वंचित बहुजन आघाडीचे जळगावचे उमेदवार प्रफुल्ल लोढा यांनी काही दिवसांपूर्वी उमेदवारी अर्ज मागे घेतला आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *