Breaking News

महाराष्ट्राच्या लोककवीच्या वारसांना भाड्याच्या घरासाठी पैसे देता का कोणी? प्रसिध्द लोककवी वामनदादा कर्डक यांचे कुटुंबिय बेघरच

मुंबई-नाशिक: प्रतिनिधी
राज्यातील आंबेडकरी चळवळीसह तमाम रसिकांना आपल्या काव्य आणि गायकीने वेड लावणाऱ्या लोककवी स्व. वामनदादा कर्डक यांचे एकमेव वारसदार रविंद्र वामन कर्डक आणि त्यांच्या कुटुंबियांवर बेघर राहण्याची पाळी आली आहे. विशेष म्हणजे त्यांना राज्य सरकारकडून घर मंजूर झाल्यानंतरही त्याचा ताबा अद्याप त्यांना मिळालेला नसल्याने घराची गरज भागविण्यासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी त्यांनी राज्यातील जनतेकडेच हात पसरले असल्याची धक्कादायक माहिती पुढे आली आहे.
लोककवी वामनदादा कर्डक आणि त्यांच्या पत्नी शांताबाई कर्डक यांना रविंद्र हे एकमेवच अपत्य. २००४ साली तेव्हाचे मुख्यमंत्री सुशिलकुमार शिंदे यांनी कर्डक यांना शासकिय कोट्यातून सदनिका मंजूर केली. मात्र या सदनिकेचा ताबा मिळण्यापूर्वीच त्याचे निधन झाले. पुढे त्यांच्या पत्नी शांताबाई कर्डक यांच्या नावावर सदर सदनिका हस्तांतरीत करून ती त्यांच्या ताब्यात द्यावी यासाठी राज्य सरकारने मान्यता दिली. मात्र महाराष्ट्रातील रसिकांसाठी आपल्यातील अतुलनीय प्रतिभेमुळे अनमोल मालमत्तेचा मालक असलेल्या वामनदादा कर्डक आणि त्यांच्या कुटुंबियांकडे व्यक्तीश मात्र आर्थिक सुबत्ताच नव्हती. त्यामुळे त्यांना सदर सदनिकेसाठी लागणारी रक्कम काही भरता आली नाही. यामुळे कर्डक कुटुंबियांना हक्काच्या घरात जाता आले नसल्याचे वामनदादा कर्डक यांचे पुत्र रविंद्र कर्डक यांनी सांगितले.
पुरेसे शिक्षण झालेले नसल्याने आम्हाला चांगली नोकरी मिळाली नाही. वडिलांनीही कुटुंबियांच्या भविष्यासाठी म्हणून कोणतीही तरतूद किंवा जमापूंजी अशी कधी जमा करून ठेवली नाही. त्याबद्दल आमच्याही मनात कधी किंतू आला नाही. भारतरत्न डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या विचारांचा प्रसार करण्याच्या उद्देशाने त्यांनी हयात घालविली. त्यामुळे त्यांनी आमच्यासाठी कोणती तरतूद करून ठेवली नाही याबद्दल काही वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले.
आजस्थितीला वामनदादांची अनेक गाणी, त्यांच्या काव्यसंग्रह, आत्मचरित्र आदींची अनेक पुस्तके प्रकाशित झाली. परंतु त्याच्या रॉयल्टी पोटी एक छदामही आमला मिळत नाही. यासंदर्भात संबधितांकडे संपर्क साधला असता ते काही आम्हाला दादही लागू देत नाहीत. त्यामुळे त्या रॉयल्टीच्या पैशामागे न लागता आम्ही नोकरी करून जगत असल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
मात्र आमच्या स्वकष्टावर आम्ही आपल्या राहण्याची सोय करत आलोय. परंतु घरात कोणीच चांगल्या नोकरीला, चांगल्या आर्थिक कमाविण्याच्या स्थितीत नसल्याने प्रत्येकवेळी आम्हाला घरासाठी लागणाऱ्या आर्थिक मदतीसाठी लोकांपुढे हात पसरावे लागते. माझे वय ६० वर्षे आहे. या वयातही घराचा खर्च चालविण्यासाठी सिक्युरिटी गार्ड म्हणून काम करावे लागते. एक मुलगा आहे. त्याचे बऱ्यापैकी शिक्षण झाले आहे. मात्र त्याला नोकरी नाही. तरी तो पडेल ते काम करून ५ ते ७ हजार रूपये महिन्याकाठी कमावतो. तसेच घरात एक २४ वर्षाची मुलगी असून तीने जिद्दीने शिक्षण घेत असून ती एम.ए.च्या अंतिम वर्षाला असल्याचे सांगितले.
आताच्या या काळात १२ ते १५ हजारात घराचा खाटला कसा चालविणार असा सवाल उपस्थित करून ते म्हणाले की, सध्याच्या लॉकडाऊनच्या काळात आर्थिक स्थैर्य नाही, सध्या आम्ही रहात असलेले घरही भाड्याचे आहे. या घराच्या मुळ मालकाने सदरचे घर दुसऱ्याला विकले. आता पुन्हा नव्याने भाड्याचे घर घेण्यासाठी डिपॉझिट द्यावे लागणार आहे. आधीच कमी उत्पन्नात घर कसेबसे चालवतो. त्यात नव्याने डिपॉझिट भाड्याच्या घरासाठी कसे उभे करायचे हा पैसा आणायचा कोठून ? त्यामुळे पुन्हा एकदा समाजाकडे हात पसरण्याशिवाय आमच्याकडे दुसरा पर्याय राहीला नसल्याचे त्यांनी सांगितले.

संपर्कासाठी खालील मोबाईल नंबर-बॅक खात्याची माहिती

Name- Ravindra Waman Kardak.*
*Bank Name- Syndicate Bank.*
*(Marwadi – Ambad Nasik Branch.*
*Account No- 52882200030691.*
*IFSC Code – SYNB0005288.*
रविंद्र वामनदादा कर्डक-9420681989
वैभव रविंद्र कर्डक-9405662919

 

Check Also

उच्च शिक्षणाच्या शिष्यवृत्ती योजनेत अर्ज सादर करण्यासाठी मुदतवाढ

देशातील नामांकित संस्थांमध्ये उच्च शिक्षण घेण्यासाठी राज्याच्या समाज कल्याण विभागाकडून राजर्षी शाहू महाराज गुणवत्ता शिष्यवृत्ती …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *