Breaking News

माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरील कारवाईला मुहूर्त मिळेना ३३ एसआरए प्रकल्पाच्या घोटाळ्यातील महापालिका अभियंता धिवर गायब

मुंबईः प्रतिनिधी

शहरातील एसआरएच्या ३३ एसआरए प्रकल्पाच्या घोटाळ्याप्रकरणी संशयाच्या भोवऱ्यात सापडलेले माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावरील कारवाईचा चेंडू गृहनिर्माण विभागाने एसआरएच्या आखत्यारीत टाकल्याने त्यांच्यावरील कारवाईला अद्याप मुहूर्त मिळत नसल्याची माहिती उघडकीस आली आहे.

झोपडीपट्टी पुनर्विकास प्रकल्पाच्या मंजूरीत अनियमितता केल्याप्रकरणी एसआरएचे माजी मुख्याधिकारी तथा माजी सनदी अधिकारी विश्वास पाटील यांच्यावर एसआऱएच्या समितीने ठपका ठेवला. तसेच याप्रकरणी विश्वास पाटील यांच्यासोबत महापालिकेतून एसआरएत प्रतिनियुक्तीवर आलेले अभियंते धिवर आणि सत्ते यांच्यावरही ठपका ठेवण्यात आला. यापैकी धिवर हे गेल्या अनेक महिन्यापासून बेपत्ता झाल्याची माहिती एसआरएतील एका वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली.

त्यानुसार विश्वास पाटील यांच्यासह या दोन अभियंत्यावर कारवाई करण्यासंदर्भातचा अहवाल राज्याच्या गृहनिर्माण विभागाकडे सादर करण्यात आला. त्यावर गृहनिर्माण विभागाने या घोटाळ्यातील दोषींवर जबाबदारी निश्चित करून कारवाईची शिफारस करावी अथवा थेट कारवाईचा बडगा उगारावा असे आदेश देण्यात आले. मात्र एसआरएकडून याप्रकरणी विश्वास पाटील यांच्या व्यतिरिक्त दोन अभियंत्यावरील कारवाईला हिरवा कंदील दाखवित तसे पत्र मुंबई महापालिकेच्या आय़ुक्तांना पाठविले. तसेच यातील एक अभियंता धिवर यांना पुन्हा महापालिकेत पाठविले. परंतु तेव्हापासून धिवर हे महापालिकेतील आपल्या मुळ पदावर रूजूच झाले नाहीत की, एसआरएतील पदभार सोडला नसल्याचे सांगत अभियंता सत्ते हे अजूनही एसआरएत कार्यरत असल्याचे त्यांनी सांगितले.

याबाबत मुंबई महापालिकेला कारवाईबाबत कळवूनही अद्याप महापालिकेकडून अद्याप कोणतीच कारवाई करण्यात आली नसल्याचे शेवटी त्यांनी सांगितले.

याबाबत एसआरएला जबाबदारी निश्चित करून त्यांच्यावर कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहेत. तसेच त्यांच्याकडून कारवाई करता येत नसेल तर त्यांनी दोषारोप निश्चित करून कारवाई करण्याची शिफारस गृहनिर्माण विभागाकडे केल्यास गृहनिर्माण विभागाकडून निश्चित कारवाई केली जाणार असल्याचे गृहनिर्माण विभागातील एका उच्च पदस्थ अधिकाऱ्याने नाव न छापण्याच्या अटीवर सांगितले.

Check Also

निवडणूक प्रक्रिया निर्भय वातावरणात होण्याच्या दृष्टीने यंत्रणांनी सतर्क रहावे

केंद्रीय निवडणूक आयोगाच्यावतीने लोकसभा निवडणूक कार्यक्रम जाहीर करण्यात आला असून संपूर्ण निवडणूक प्रक्रिया पारदर्शक,निर्भय आणि …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *