Breaking News

माजी आदीवासी मंत्री विष्णू सावरा यांचे निधन वयाच्या ७२ व्या वर्षी निधन; भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला-देवेंद्र फडणवीस

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील भाजपाचा आदीवासी चेहरा असलेले आणि माजी आदीवासी मंत्री विष्णू सवरा यांचे आज संध्याकाळी वयाच्या ७२ व्या वर्षी निधन झाले. मागील दोन वर्षापासून त्यांना यकृताचा त्रास होता. त्यांच्यावर पार्थिवावर उद्या सकाळी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

राजकारणात येण्यापूर्वी ते स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये नोकरीस होते. १९८० साली त्यांनी बँकेतील नोकरीचा राजीनामा देत पूर्ण वेळ राजकारणात उतरत भाजपाचे सदस्य झाले. त्यावेळी वाडा मतदारसंघातून भाजपाने त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली. मात्र त्या निवडणूकीत त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले. १९८५ साली पुन्हा त्यांना उमेदवारी दिली. मात्र त्यावेळीही त्यांचा निसटता पराभव झाला. तरीही त्यांनी राजकारण न सोडता सामाजिक कार्यात स्वत:ला झोकून दिले. १९९० साली पक्षाने तिसऱ्यांदा उमेदवारी दिली. यावेळी मात्र त्यांनी विजय मिळवित विधानसभेत आमदार म्हणून पाऊल ठेवले. त्यानंतर २०१४ सालापर्यंत सलग सहा वेळा विजय मिळवित वाडा मतदारसंघांवर आपले वर्चस्व ठेवले. त्यांच्या निधनाने भाजपामधील अनेक नेत्यांबरोबर महाविकास आघाडीतील अनेक मंत्र्यांनी त्यांना दु:ख व्यक्त करत आदरांजली वाहीली.

भाजपाचा समर्पित कार्यकर्ता हरपला-फडणवीस

भारतीय जनता पार्टीचे ज्येष्ठ नेते, माजी मंत्री श्री विष्णू सावरा यांच्या निधनाने भारतीय जनता पार्टीचा एक सच्चा आणि समर्पित कार्यकर्ता हरपला आहे. आदिवासी समाजाच्या विकासासाठी त्यांनी दिलेले योगदान हे कायम स्मरणात राहील, अशा शब्दात माजी मुख्यमंत्री आणि विधानसभेतील विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी आपल्या शोकसंवेदना व्यक्त केल्या आहेत.

भारतीय जनता पार्टीत जिल्हाध्यक्ष, आदिवासी आघाडीचे अध्यक्ष, प्रदेश सचिव अशा विविध भूमिकांमधून संघटनात्मक कार्यात त्यांनी मोठे योगदान दिले. निवासी शाळांचे व्यवस्थापन, आदिवासी समाजात शिक्षणाचा प्रसार यासाठीही त्यांनी अनेक परिश्रम घेतले. स्पष्टवक्तेपणा आणि प्रत्यक्ष जमिनीवर काम करणारा नेता म्हणून त्यांची ओळख होती. मंत्री म्हणून सुद्धा त्यांनी आदिवासी कल्याणाच्या अनेक योजना परिणामकारकपणे राबविण्यासाठी पुढाकार घेतला. सुमारे ३० वर्ष त्यांनी विधिमंडळात प्रतिनिधीत्त्व केले. मी त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करतो, असे देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.

 

Check Also

प्रकाश आंबेडकर यांची घोषणा, ….. मी लाचारी मान्य करणार नाही ॲड. प्रकाश आंबेडकर यांनी युतीच्या सल्ल्यासंदर्भात व्यक्त केल्या भावना

वंचित बहुजन आघाडीचे कार्यकर्ते तसेच हितचिंतकांनी युतीच्या संदर्भात काय केलं पाहिजे, याविषयी सल्ला दिला. त्यामुळे …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *