Breaking News

मंत्रिमंडळ विस्ताराच्या चर्चेने आयाराम आणि पक्षांतर्गत आमदारांमध्ये चढाओढ गृहनिर्माण मंत्री, रिक्त कृषीमंत्री पदावर आशा

मुंबईः प्रतिनिधी
लोकसभा निवडणूकीच्या विजयानंतर राज्य मंत्रिमंडळाच्या विस्ताराचा सुतोवाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केला. त्यामुळे एकाबाजूला भाजपमध्ये येणाऱ्या आयारामांच्या संख्येत वाढ होत असतानाच दुसऱ्याबाजूला भाजपामधील आमदारांच्या मध्ये रस्सीखेच सुरु झाल्याचे चित्र पाह्यला मिळत आहे.
विद्यमान गृहनिर्माण मंत्री प्रकाश महेता यांना एम.पी.मिल कंपाऊड प्रकरणी लोकायुक्तांनी दोषी ठरविल्यानंतर त्यांचे मंत्रिपद जाणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. तसेच स्व. पांडुरंग फुंडकर यांच्या जाण्याने राज्याचे कृषीमंत्री पद रिक्त असून त्याचा अतिरिक्त कार्यभार महसूल मंत्री चंद्रकांत पाटील यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. याशिवाय नुकतेच खासदार झालेले गिरीष बापट यांनी राजीनामा दिल्याने त्यांच्याकडील तीन खातीही रिक्त आहेत.
या रिक्त खात्यांचा कार्यभार सध्या जरी पर्यटन मंत्री जयकुमार रावल, वैद्यकीय शिक्षण मंत्री गिरिष महाजन यांच्याकडे सोपविण्यात आलेला असला तरी, या खात्यांसाठी स्वतंत्र मंत्र्यांची नेमणूक करणे गरजेचे आहे. विधानसभा निवडणूकांना तीन महिन्याचा कालावधी शिल्लक राहीलेला असतानाच केवळ तीन महिन्यासाठी मंत्रिमंडळ विस्तार करून पक्षांतर्गत असंतुष्ट आणि काँग्रेसमधून भाजपच्या वाटेवर असलेल्या राधाकृष्ण विखे-पाटील आणि अन्य आमदारांना खुष करण्याचा प्रयत्न मुख्यमंत्र्यांकडून करण्यात येत आहे. त्याचाच एक भाग म्हणून मंत्रिमंडळाचा विस्तार करण्याचा सुतोवाच मुख्यमंत्र्यांनी केला.
पण या रिक्त जागांवर आपलीच वर्णी लागावी यासाठी भाजपमधील आमदारांकडून मोठ्या प्रमाणावर ताकद लावण्यात येत असल्याची माहिती भाजपामधील सूत्रांनी दिली.

Check Also

छगन भुजबळ यांनी नाशिक लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढवावी

देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी व केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनी ओबीसींचे नेते मंत्री छगन भुजबळ …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *