मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदी विजया रहाटकर यांची फेरनियुक्ती राज्य सरकारने केली. त्यांचा कार्यकाळ तीन वर्षांचा राहणार आहे.
माझी फेरनियुक्ती केल्याबद्दल मी राज्य सरकारचे, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि महिला व बाल कल्याण मंत्री पंकजा मुंडे यांचे आभार मानते. गेल्या तीन वर्षांत आयोगाने महिलांच्या अनेक प्रश्नांना हात घातलेला आहे. खूप काही करण्याचा प्रयत्न केला आहे. तीच रेघ पुढे ओढून पुढील तीन वर्षांमध्येही आयोगाचे काम सर्वस्पर्शी, सर्वांगीण करण्याचा मी प्रामाणिक प्रयत्न करेन अशी प्रतिक्रिया महिला अध्यक्षा रहाटकर यांनी दिली.
विजया रहाटकर यांच्या अध्यक्षतेखाली आयोगाने नानाविध उपक्रम राबविले आहेत. अँसिड हल्ल्यातील पीडितांसाठी ‘सक्षमा’ उपक्रम, कामांच्या ठिकाणी लैंगिक छळ प्रतिबंधक कायद्याच्या जनजागृतीसाठी ‘पुश’ (पीपल युनायटेड अगेन्स्ट सेक्युअल हरॅसमेंट) अभियान, बचत गटांच्या सक्षमीकरणासाठी ‘प्रज्ज्वला’ योजना, अडचणीतील महिलांना मानसिक आधार देण्यासाठी ‘सुहिता’ हेल्पलाइन, सामाजिक संस्थांच्या मदतीने राज्यभर कायदेशीर मार्गदर्शन शिबिरे, महिलांच्या प्रश्नांवर संशोधन करण्यासाठी अर्थसाह्य, महिला कैद्यांच्या प्रश्नांचा अभ्यास करण्यासाठी राज्यातील तुरुंगांना भेटी अशी अनेक पावले उचलली आहेत. याशिवाय महिला व मुलांच्या तस्करीविषयी आंतरराष्ट्रीय परिषद तर अनिवासी भारतीयांकडून होणारी वैवाहिक फसवणूक, बाल लैंगिक अत्याचार प्रतिबंधक कायदा (पोक्सो) आणि सरोगसीविषयक प्रस्ताविक कायद्याबाबत आयोगाने राष्ट्रीय परिषदा घेतलेल्या आहेत. पाळणाघरांसाठी नियमावली, आत्महत्या केलेल्या शेतकरयांच्या विधवा, शहीद जवानांच्या वीरपत्नी यांच्यासाठीही रहाटकर यांच्या नेतृत्वाखाली आयोगाने राज्य सरकारला वेळोवेळी महत्वपूर्ण शिफारशी केलेल्या आहेत. महिला अत्याचारांविरोधातील घटनांवर आयोगाने वेळोवेळी कडक पावले उचलली आहेत.
