Breaking News

१२ वीची परिक्षा रद्द तर राज्यात पाच टप्प्यात पूर्णत: अनलॉक निर्बंध मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांची माहिती

मुंबई: प्रतिनिधी

१० वी पाठोपाठ १२ वीची परिक्षाही रद्द करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला असून राज्यात सध्या लागू असलेले निर्बंध पाच टप्प्यात उठविण्यात येणार असल्याची माहिती राज्याचे मदत व पुर्नवसन मंत्री विजय वडेट्टीवार यांनी दिली. प्रसारमाध्यमांशी बोलताना त्यांनी वरील माहिती दिली.

यासाठी संबंधित जिल्ह्यात असलेल्या पॉझिटिव्हिटी रेटची अट घालण्यात आली आहे. सध्याच्या परिस्थितीत ५ टप्प्यांमध्ये अनलॉक केलं जाणार आहे. या ५ टप्प्यांपैकी पहिल्या टप्प्यानुसार ज्या जिल्ह्यात ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आहे आणि ऑक्सिजन बेड २५ टक्क्यांपेक्षा कमी ऑक्युपाइड आहेत, अशा जिल्ह्यात संपूर्ण अनलॉक होईल. यामध्ये रेस्टॉरंट, मॉल, नियमित दुकानं किंवा ट्रेन देखील सुरू होतील. जिल्हे आणि महानगर पालिकांचे धरून एकूण ४३ भाग पाडले आहेत. या सर्व नियमांची उद्यापासून अंमलबजावणी केली जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पूर्ण अनलॉक लागू होणाऱ्या जिल्ह्यांमध्ये सार्वजनिक ठिकाणे, उद्याने, सायकलिंक ट्रॅक, वॉकिंग ट्रॅक, खासगी कार्यालये, सरकारी कार्यालयांना १०० टक्के मुभा, क्रिडांगणे आणि थिएटर्सला परवानगी असेल. शूटिंगला देखील परवानगी असेल. सांस्कृतिक कार्यक्रमांना परवानगी असेल. लग्नसोहळ्यांना देखील १०० टक्के उपस्थितीची परवानगी देण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.

पाच टप्प्यात अनलॉक करण्यात येणार असल्याने जिल्ह्यांची विभागणी खालीलप्रमाणे करण्यात आली आहे.

पहिला गट – पहिल्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ टक्क्यांहून कमी ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. औरंगाबाद, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, जालना, लातूर, नागपूर, नांदेड, नाशिक, परभणी, ठाणे, वर्धा, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा पहिल्या टप्प्यात समावेश आहे.

दुसरा गट – दुसऱ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये ५ टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि २५ ते ४० टक्क्यांदरम्यान ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अहमदनगर, अमरावती, हिंगोली, मुंबई शहर, मुंबई उपनगर, नंदुरबार या जिल्ह्यांचा समावेश दुसऱ्या टप्प्यात आहे.

तिसरा गट – तिसऱ्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये ५ ते १० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ४० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. अकोला, बीड, कोल्हापूर, उस्मानाबाद, पालघर, रत्नागिरी, सांगली, सातारा, सिंधुदुर्ग, सोलापूर या जिल्ह्यांचा समावेश तिसऱ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

चौथा गट – चौथ्या गटामध्ये ज्या जिल्ह्यांमध्ये १० ते २० टक्के पॉझिटिव्हिटी रेट आणि ६० टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पुणे आणि रायगड या जिल्ह्यांचा समावेश चौथ्या टप्प्यात करण्यात आला आहे.

पाचवा गट – पाचव्या गटात ज्या जिल्ह्यांमध्ये २० टक्क्यांपेक्षा जास्त पॉझिटिव्हिटी रेट आणि ७५ टक्क्यांहून जास्त ऑक्सिजन बेडची ऑक्युपन्सी असेल, अशा जिल्ह्यांचा समावेश आहे. पाचव्या गटात कायम रेड झोन असणार आहे. वरील ४ टप्प्यांमध्ये नसलेल्या सर्व जिल्ह्यांचा समावेश पाचव्या टप्प्यातील गटात करण्यात आला आहे.

दरम्यान, आत्तापर्यंतच्या आकडेवारीनुसार जिल्ह्यांची वर्गवारी ५ टप्प्यांमध्ये करण्यात आली असून यापुढे ज्याप्रमाणे जिल्ह्यांमधली करोनाची आकडेवारी बदलेल, त्यानुसार जिल्ह्यांची वर्गवारी देखील एक ते पाच अशा टप्प्यांमध्ये बदलेल. यासाठी दर शुक्रवारी आकडेवारीचा आढावा घेऊन जिल्ह्यांच्या वर्गवारीमध्ये बदल केला जाणार आहे.

Check Also

अतुल लोंढे यांची खोचक टीका, … ४०० पारच्या पोकळ गप्पा मारणा-यांचे २०० चे वांदे

भारतीय जनता पक्षाने ‘अब की बार ४०० पार’चा जो नारा दिला आहे, तो केवळ हवा …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *