Breaking News

शपथविधी नाही झाला तरी नवी विधानसभा अस्तित्वात येणार राज्यपाल कोश्यारी यांचे घडामोडींवर बारीक लक्ष

मुंबईः विशेष प्रतिनिधी
विधानसभा निवडणूकीचा निकाल लागून जवळपास आठवडा झाला तरी राज्यात सरकार स्थापन करण्यावरून भाजपा-शिवसेनेत कुरघोडीचे राजकारण सुरु आहे. मात्र विद्यमान विधानसभेची मुदत ९ नोव्हेंबर रोजी संपणार आहे. तत्पूर्वी नव्या सरकारचा शपथविधी नाही झाला तरीही १० नोव्हेंबरपासून नव्या सदस्यांची विधानसभा अस्तित्वात येणार असल्याची माहिती विधिमंडळातील विश्वसनीय सूत्रांनी दिली.
या निवडणूकीत राज्यातील जनतेने कोणत्याही एका राजकिय पक्षाला स्पष्ट बहुमत दिले नाही. त्यामुळे राजकिय पटलावर राज्याचे प्रमुख पद असलेल्या मुख्यमंत्री पदावरून भाजपा आणि शिवसेनेत रस्सीखेच सुरु आहे. त्यातच महायुतीतील प्रमुख घटक पक्ष असलेल्या शिवसेनेला भाजपाच्या विरोधात काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेसकडून पध्दतशीरपणे उसकाविण्याचे काम सुरु असल्याने सत्तास्थापनेच्या गोंधळात काँग्रेस पुरस्कृत आघाडीही उतरल्याचे चित्र निर्माण झाल्याचे त्यांनी सांगितले.
या गोंधळामुळे राज्यात नवे सरकार स्थापनेस वेळ लागणार असल्याचे दिसून येत आहे. विद्यमान विधानसभा ९ नोव्हेंबर २०१९ रोजी भंग होण्यापूर्वी राज्यात नवे सरकार अस्तित्वात येण्याचे राजकिय संकेत आहेत. मात्र विद्यमान परिस्थिती पाहता ९ नोव्हेंबर पूर्वी नवे सरकार अस्तित्वात येण्याची शक्यता कमीच आहे. मात्र नव्या २८८ आमदारांच्या नावाचे गॅजेट प्रसिध्द झालेले असल्याने १० नोव्हेंबर २०१९ रोजी पासून नवी विधानसभा अस्तित्वात येणार आहे. फक्त आमदारांचा शपथविधी हा नव्या सरकारच्या शपथविधीनंतरच शक्य होणार असल्याचे त्यांनी सांगितले.
दरम्यान, राज्यातील प्रत्येक राजकिय घडमोडींवर राज्यपाल भगतसिंह कोश्यारी हे बारीक लक्ष ठेवून आहेत. ९ नोव्हेंबर पर्यंत सरकारस्थापनेसाठी कोणता राजकिय पक्ष दावा करतो याकडे ते पहात आहेत. मात्र ९ नोव्हेंबर २०१९ नंतर राज्यपाल याप्रकरणी हस्तक्षेप करणार असल्याची माहिती राज्यपाल भवनातील उच्च पदस्थ अधिकाऱ्याने दिली.

Check Also

सर्वोच्च न्यायालयाचा मोठा निर्णय, उमेदवारही गोपनीयता बाळगू शकतो

देशातील प्रत्येक नागरिकांना निवडणूकीच्या कालावधीत विविध राजकिय पक्षाच्या उमेदवारांची संपत्ती किती, त्यांच्यावर गुन्हे किती, त्याची …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *