Breaking News

विदर्भात दुष्काळ जाहीर करा विरोधकांसह सत्ताधारी बाकावरील आमदारांची मागणी: कामकाज तहकूब

नागपूर : प्रतिनिधी

विदर्भातील ६५ टक्के धान शेतींला तुडतुड्याचा प्रादुर्भाव झाला आहे. तर १० टक्के जमिनीवर पेरणीच झालेली नाही. त्यामुळे विदर्भातील शेतकऱ्यांवर मोठे संकट कोसळले असल्याने त्या भागात दुष्काळ जाहीर करण्याची मागणी विधानसभेतील विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे-पाटील यांनी केली.

विधानसभेत लक्षवेधीच्या माध्यमातून गडचिरोली, भंडारा, चंद्रपूर व गोंदीया जिल्ह्यात दुष्काळ जाहीर करावी अशी मागणी विखे-पाटील यांनी केली. त्यावेळी विरोधी बाकावरील सदस्यांसोबतच सत्ताधारी बाकावरील सदस्यांनीही अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेत याविषयीची घोषणा आताच करावी अशी मागणी अध्यक्ष हरीभाऊ बागडे यांच्याकडे केली.

सत्ताधारी आणि विरोधी बाकावरील सदस्यांनी अध्यक्षांसमोरील मोकळ्या जागेत धाव घेवून घोषणाबाजी करण्यास सुरुवात केल्याने गोंधळाचे वातावरण निर्माण झाले. तरीही याप्रश्नावर सभागृहात जाब मागण्याऐवजी मंत्र्यांकडे जा, मुख्यमंत्र्यांकडे जा अशा सूचना दोन्ही बाजूकडील सदस्यांना केल्या. मात्र सदस्य ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने त्यांच्याकडून सतत घोषणा देण्यात येत होत्या. अखेर कोणीही ऐकण्याच्या मनस्थितीत नसल्याने अखेर सभागृहाचे कामकाज १० मिनिटांसाठी तहकूब करावे लागले.

सभागृहाचे कामकाज पुन्हा सुरु झाल्यानंतर काँग्रेसचे आमदार गोपालदास अगरवाल आणि विरोधी पक्षनेते विेखे-पाटील यांनी पुन्हा मुद्दा उपस्थित करत याप्रश्नी राज्य सरकारकडून ठोस निर्णयाची अपेक्षा असल्याचे सांगितले.

यावेळी कृषीमंत्री पांडूरंग फुंडकर यांनी अधिवेशन संपण्याच्या आत याप्रश्नाच्या अनुषंगाने विदर्भातील आमदारांची बैठक घेवून मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून याबाबत सकारात्मक निर्णय जाहीर करण्याचे आश्वासन दिले.

Check Also

बाळासाहेब थोरात यांचा आरोप तर उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे बैठकीचे आश्वासन

दुधाचे भाव २५ रुपयांपर्यंत खाली आले आहेत, राज्यभर आंदोलने आणि मोर्चे सुरू आहेत. सरकार मात्र …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *