Breaking News

हसमुख चेहऱ्याचे राजकारणातील वसंत डावखरे मित्र गेले सर्व पक्षिय नेत्यांकडून शोक व्यक्त

मुंबई: प्रतिनिधी

राज्यातील सर्वपक्षिय नेत्यांचे मित्र तथा राजकारणातील चमत्काराची किमया दाखविणारे राष्ट्रवादीचे नेते आणि विधान परिषदेचे माजी उपसभापती वसंत डावखरे यांचे काल रात्री गुरूवारी निधन झाले. गेल्या दोन महिन्यांपासून त्यांच्यावर बॉम्बे हॉस्पीटलमध्ये मूत्रपिंडाच्या विकारावर उपचार करण्यात येत होते. त्यांच्या पश्चात पुत्र आमदार निरंजन आणि प्रबोध, सुना नातवंडे असा परिवार आहे. त्यांच्यावर ठाण्यातील हरी निवास येथील गिरीराज हाइट्समध्ये सकाळी ११ ते दुपारी २ वाजेपर्यंत डावखरे यांचं पार्थिव अंत्यदर्शनासाठी ठेवण्यात येणार असून, दुपारी ३ वाजता त्यांच्या पार्थिवावर ठाणे येथे शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत.

त्यांच्या निधनाने सर्वपक्षिय नेत्यांनी शोक व्यक्त करत राजकारणातील मित्र गेल्याची भावना व्यक्त केली आहे. डावखरे यांचे बालपण पुणे जिल्ह्यातील शिरूर तालुक्यातील हिवरे या गावी गेले. अत्यंत कष्टात बालपण घालवलेल्या वसंत डावखरे यांची राजकीय कारकीर्द ठाणे शहरात बहरली. महाविद्यालयीन जीवनात असताना त्यांनी विद्यार्थी संघटनेत काम केले. पदवीधर झाल्यानंतर त्यांची ओळख राजकारणातील तत्कालीन मातब्बर नेते बाळासाहेब देसाई यांच्याशी झाली. डावखरे यांनी काही काळ देसाई यांचे स्वीय सहाय्यक म्हणून काळ काम पाहिले. १९८० साली ग्रामपंचायतीच्या माध्यमातून डावखरे यांनी राजकारणात प्रवेश केला. त्यांची सरपंचपदी बिनविरोध निवड झाली. १९८६ साली त्यांनी ठाणे महापालिकेची निवडणूक लढविली आणि ते विजयी झाले.

ठाण्यात शिवसेनेची सत्ता असतानाही काही भाजपाच्या नगरसेवकांशी मैत्रीचा हात पुढे करून त्यांनी १९८७ मध्ये प्रथमच महापालिकेवर काँग्रेसची सत्ता आणली. काही काळ त्यांनी ठाण्याचे महापौरपदही भूषविले. १९९२ साली डावखरे राज्य विधान परिषदेवर निवडून गेले. त्यानंतर सलग १८ वर्षे त्यांनी परिषदेचे उपसभापती पद भूषविले. राजकारणाबरोबरच क्रीडा, सांस्कृतिक आणि शैक्षणिक क्षेत्रातही त्यांनी आपल्या कर्तृत्वाने ठसा उमटवला. डावखरे यांचे कै. आनंद दिघे आणि त्यांची राजकारणा पलीकडची मैत्रीही नेते आणि कार्यकर्त्यांमध्ये विशेष चर्चेत राहिली.

१९९२ मध्ये ते राज्य विधान परिषदेवर निवडून आले. त्यानंतर १९९८ मध्ये झालेल्या चुरशीच्या निवडणुकीतही त्यांनी सात मतांनी विजय मिळवला. ‘मातोश्रीचे’ आशीर्वाद, ‘गणेशाची’ कृपा म्हणून ‘आनंद’दायी घटना घडली आणि जीवनात ‘सोनियाचा’ दिवस उजाडला, असे त्यांनी या यशाचे मार्मिक वर्णन केले होते. तत्कालीन शिवसेना जिल्हाप्रमुख आनंद दिघे आणि त्यांची मैत्रीही चांगलीच गाजली होती.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *