Breaking News

सावरकर गौरव प्रस्तावावरून विरोधकांचा गोंधळ कामकाज तहकूब झाल्यानंतर विधानसभेत विरोधकांकडून प्रतिविधानसभा

मुंबईः विशेष प्रतिनिधी

विधानसभेत आज  स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या पुण्यतिथी दिनी सावरकर यांच्या गौरवपर प्रस्ताव सभागृहाने संमत करावा या मागणीसाठी विरोधी पक्षांनी प्रचंड गदारोळ केला. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी मांडलेल्या प्रस्तावास ज्येष्ठ भाजप चंद्रकांत पाटील यांनी समर्थन दिले. अध्यक्ष नाना पटोले यांनी अनुमती नाकारताच मी सावरकर अशा भगव्या टोप्या घातलेले  भाजप सदस्य उभे राहून घोषणा देऊ लागले, काहीनी सरकारच्या धिक्काराचा फलक फडकविला. फडणवीस यांनी यावेळी काँग्रेस पक्षाचे मुखपत्र असलेल्या शिदोरी मासिकात स्वा. सावरकर यांच्या बदनामी केल्याने त्या मासिकावर बंदी घालण्याची मागणीही केली.

अध्यक्षांनी गदारोळातच लक्षवेधी पुकारल्या. महिला अत्याचारासंबधातील लक्षवेधी व विधेयके मांडली जाण्याच्या वेळात फडणवीस वगळता सर्व भाजप सदस्य अध्यक्षांच्या समोरील मोकळ्या जागेत घोषणा देत होते. त्यानंतर मोकळ्या जागेत या सदस्यांनी ठाण मांडले. या गदारोळातच लक्षवेधीला गृहमंत्री अनिल देशमुख यांनी उत्तर दिले. पाच विधेयकेही संमत करण्यात आली. त्यांनंतर अध्यक्ष पटोले यांनी सभागृहाची बैठक स्थगित होत असल्याचे जाहीर केले.

विधानसभेत आज प्रश्नोत्तराचा तास पार पडल्यानंतर विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या गौरव प्रस्ताव संमत करावा आणि काँग्रेस पक्षाच्या शिदोरी मासिकावर बंदी घालण्याची मागणी लावून धरली. अध्यक्षांनी फडणवीस यांची सूचना अस्वीकृत करताच संतप्त भाजप सदस्यांनी प्रचंड गदारोळ सुरू केला. स्वा. सावरकर यांची बदनामी करणा-या सरकारचा धिक्कार असो , अशा घोषणेचा फलक फडकावीत भाजपा सदस्य अध्यक्षांपुढे आले.

सावरकर सावरकर, देशभक्त सावरकर अशा घोषणांनी सभागृह दणाणून जात होते. त्यातच अध्यक्षांनी पहिली लक्षवेधी पुकारली. गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या लक्षवेधीस गदारोळातच उत्तर देताना आंध्र प्रदेशच्या दिशा कायद्याच्या धर्तीवर महाराष्ट्रात याच अधिवेशनात महिलांवरील अत्याचार प्रतिबंधक कायदा अस्तित्वात येईल अशी घोषणा केली.

अध्यक्ष पटोले यांनी राज्यपाल अभिभाषणावर चर्चा असल्याचे त्यांनी स्मरण करून दिले. इतर लक्षवेधी पुढे ढकलल्या. शासकीय विधेयके संमत होत असताना विरोधी पक्षनेते फडणवीस यांनी आक्षेप घेतला. लोकशाहीचा मुडदा पाडू नका, सावरकराचा गौरवपर प्रस्ताव संमत झालाच पाहिजे, शिदोरी मासिकावर बंदी घाला, त्यामध्ये लिहिलेले शिवसेनेला मान्य आहे का असेही ते जोरजोरात विचारत होते. त्यावेळी भाजप सदस्यांची दादागिरी नही चलेगी या घोषणा सुरूच होत्या. अखेर गदारोळामुळे अध्य़क्षांनी सभागृहाची बैठक तहकूब होत असल्याचे जाहीर केले .

दरम्यान, सत्ताधाऱ्यांनी हा प्रस्ताव नाकारल्यानंतर आणि कामकाज स्थगित झाल्यानंतर विरोधी पक्षांनी प्रतिविधानसभा भरवित गौरव प्रस्ताव मान्य करून सावरकरांचा गौरव केला.

Check Also

काँग्रेसचे माजी आमदार मुश्ताक अंतुले यांचा अजित पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश

मुश्ताक अंतुले यांच्यासह अनेक लोकं आपल्यासोबत येत आहेत याचा अर्थ अजित पवार यांनी घेतलेला महत्वपूर्ण …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *