मुंबई-नवी दिल्लीः प्रतिनिधी
काही दिवसांपूर्वी केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथील कार्यक्रमात बोलतानात उत्तर प्रदेशात युवकांचे व्हॉट्सअॅप ग्रुपच्या माध्यमातून मतपरिवर्तन करून ३०० जागा कशा जिंकल्या याची सांद्यत माहिती दिली. त्याधर्तीवर महाराष्ट्रातही राजकिय प्रवाहाच्या बाहेर असणाऱ्या युवकांना युवक वॉरीअर्स संकल्पनेच्या माध्यमातून भाजपा विचाराच्या आणि भाजपेतर विचाराच्या युवकांचे ग्रुप तयार करण्यात येणार असल्याची माहिती भाजपा युवा मोर्चाचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांनी दिली.
भाजपा प्रदेश कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. यावेळी युवक आघाडीचे प्रभारी तथा माजी मंत्री चंद्रशेखर बावनकुळे, मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये, माधव भांडारी यांच्यासह अन्य उपस्थित होते.
मागील दोन महिन्यापासून दिल्लीत सुरु असलेल्या शेतकऱ्यांच्या आंदोलनामुळे सबंध देशभरात नवमतदार असलेला युवक भाजपापासून दुरावला आहे. तसेच भाजपाची नकारात्मक प्रतिमा तयार होत आहे. यापार्श्वभूमीवर दुरावलेल्या तरूण मतदारांना पुन्हा पक्षाच्या जवळ आणण्यासाठी यवक वॉरिअर्स ही संकल्पना तयार कऱण्यात आल्याची माहिती भाजपाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांकडून देण्यात आली.
१४ फेब्रुवारी २०२१ रोजी भाजपा नेते तथा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी लखनौ येथे आयोजित कार्यक्रमात बोलताना उत्तर प्रदेशात विधानसभा निवडणूकीच्याआधी पासून २५ लाख तरूणांचा व्हॉट्स ग्रुप तयार करण्यात आले होते. या ग्रुपवर कधी विनोदाच्या माध्यमातून, कधी व्यंगचित्राच्या माध्यमातून तर कधी घाबरविण्याच्या पोस्ट मधून तरूणांचे मत परिवर्तन करण्यात आले. त्यावेळी कुठे उत्तर प्रदेशात ३०० जागा जिंकता आल्याचा खुलासा केला होता. त्या आधारेच महाराष्ट्रातही अशा पध्दतीचे व्हॉट्सअॅप ग्रुप बनविण्यात येणार असून यामाध्यमातून नवतरूण आणि युवकांना भाजपाच्या विचाराशी जोडण्याचा प्रयत्न राहणार असल्याचे त्यांनी सांगितले.
यासंदर्भात युवक आघाडीचे अध्यक्ष विक्रांत पाटील यांना विचारले असता ते म्हणाले की, युवक आघाडीच्या माध्यमातून विध्वंस करणाऱ्या शक्तींना रोखण्यासाठी आणि जे युवक राजकारणाला लांब राहून नावे ठेवतात, शिव्या घालतात अशांना राजकारणाशी जोडण्याच्या प्रयत्नाचा भाग म्हणून युवक वॉरिअर्स ही संकल्पना राबविण्यात येणार आहे. यामध्ये भाजपा विचाराच्या युवकांबरोबरच बिगर भाजपा विचाराच्या, संगीत, नाट्य, लेखन यासह विविध गोष्टीत रस असणाऱ्या युवकांचा यात समावेश करण्यात येणार आहे.
याबाबत पाटील यांना विध्वंस करणाऱ्या कोणत्या शक्ती आहेत? असा प्रश्न विचारला असता त्यांना याप्रश्नांचे थेट उत्तर देता आले नाही. महाराष्ट्र प्रदेश भारतीय जनता युवा मोर्चा तर्फे विविध क्षेत्रातील युवकांना एकत्र आणण्यासाठी युवा वॉरियर्स अभियान सुरु करण्यात येणार आहे. 19 फेब्रुवारी या शिवजयंती दिनी किल्ले सिंहगड येथून या अभियानाचा प्रारंभ होईल, अशी माहिती युवा मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष विक्रांत पाटील यांनी बुधवारी पत्रकार परिषदेत दिली.
