Breaking News

ठाकरे घराण्याचा रिमोट कंट्रोल संपुष्टात, आता थेट मुख्यमंत्री पदच शरद पवारांच्या भूमिकेने शिवसेनेची परंपरा खंडीत होणार

मुंबईः विशेष प्रतिनिधी
राज्यातील सत्ताकारणाच्या खेळात आतापर्यंत रिमोट कंट्रोलच्या माध्यमातून राजकिय सोंगट्या हलविणाऱ्या शिवसेनेने आता विधानसभा निवडणूकीच्या माध्यमातून कात टाकण्यास सुरुवात केली आहे. तसेच शरद पवारांच्या वक्तव्याने शिवसेना सरकारचे नेतृत्व करणार असल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे ठाकरे घराण्यातील व्यक्ती आता थेट मुख्यमंत्री विराजमान होणार असल्याचे स्पष्ट झाले.
हिंदूत्ववादाच्या मुद्यावरून शिवसेनेने भाजपाबरोबर २५-३० वर्षापूर्वी युती केली. या युतीत शिवसेनेने नेहमीच मोठ्या भावाची भूमिका पार पाडली. मात्र २०१४ आणि २०१९ च्या विधानसभा निवडणूकीत भाजपाला सर्वाधिक जागा मिळाल्याने मोठ्या भावाची भूमिका शिवसेनेकडून भाजपाकडे गेली. त्यामुळे शिवसेनेचे खच्चीकरण होण्यास सुरुवात झाली. तसेच २०१९च्या निवडणूकीत भाजपाने शिवसेनेला मुख्यमंत्रीपद देण्याचे आश्वासन दिल्याचा दावा शिवसेनेने केला. तर भाजपाने असे आश्वासन दिले नसल्याचे भाजपाच्यावतीने जाहीर करण्यात आले. यामुळे युतीच्या संबधावर परिणाम होत अखेर १८ नोव्हेंबर २०१९ रोजी जाहीर न करता युती तुटली.
१९९५ साली शिवसेना-भाजपाचे सरकार सत्तेवर आल्यानंतर शिवसेनाप्रमुख स्व.बाळासाहेब ठाकरे यांच्या इशाऱ्यावर राज्यातील युतीचे सरकार चालत होते. त्यावेळी मनोहर जोशी हे दादरला रहात होते. त्यामुळे बाळासाहेबांच्या हयातीतच मातोश्रीवरील शिवसैनिकांची गर्दी कमी होत ती दादर येथील जोशींच्या घराभोवती वाढत चालली होती. या गर्दीच्या ओसरण्यामुळे न कळत शिवसेनेत दोन सत्ता केंद्रे स्थापन झाल्याचे चित्र निर्माण झाले. त्याला छेद देण्याचा प्रयत्न म्हणून त्यावेळचे महसूल मंत्री नारायण राणे यांना शेवटच्या वर्षभरासाठी मुख्यमंत्रीपदी बाळासाहेबांनी बसविले.
आता २० वर्षानंतर काँग्रेस, राष्ट्रवादी काँग्रेसच्या मदतीने शिवसेनेचे सरकार स्थापन होत असल्याचे स्पष्ट झाले. त्यामुळे मुख्यमंत्री पदावर शिवसेनेतून कोणाची नियुक्ती केली जाणार याबाबत वेगवेगळे तर्क वितर्क मांडण्यात येत होते. जर ठाकरे घराण्यातील व्यक्तीशिवाय इतर व्यक्तीची निवड केली तर बाळासाहेबांच्या हयातीतील रिमोट कंट्रोलद्वारे सरकार चालणार का, की पुन्हा शिवसेनेत दुसरे सत्ता केंद्र निर्माण होणार असा प्रश्न सर्वचस्तरावर विचारला जात होता.
अखेर या प्रश्नावर शिवसेना, मनसे यांचे तारणहार आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे सर्वेसर्वा शरद पवार यांनी तोडगा काढत शिकाँरा अर्थात शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सरकारच्या नेतेपदी अर्थात मुख्यमंत्री पदी उध्दव ठाकरे यांचे नाव पुढे करत त्यावर इतरांचीही सहमती मिळवली. त्यामुळे आता पुढील आणखी काही काळ तरी ठाकरे यांच्या वांद्रे येथील मातोश्रीशिवाय सत्तेचे शिवसेनेतील दुसरे सत्ता केंद्र स्थापन होणार नाही.

Check Also

…आणि औरंगाबादचे आता “संभाजीनगर” शासकिय नामांतर झाले ? मुख्यमंत्री उध्दव ठाकरेंनीच औरंगाबादचा उल्लेख संभाजीनगर केला

औरंगाबाद : प्रतिनिधी काही महिन्यांपूर्वी महानगरपालिका निवडणूकीच्या पार्श्वभूमीवर नामांतराचा मुद्दा उपस्थित होत भाजपा आणि शिवसेनेकडून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *