Breaking News

“आंधळ्याशी जग आंधळे, तया जग खोटे” मुख्यमंत्र्यांचे विरोधकांना प्रतित्तुर मस्करी करा, थट्टा करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका असा फडणवीस, मुनगंटीवार यांना इशारा

मुंबईः विशेष प्रतिनिधी

राज्यातील कोरोना परिस्थितीबरोबरच इतर मुद्यावर विरोधकांनी उपस्थित केलेल्या मुद्यावंर विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि सुधीर मुनगंटीवार यांनी केलेल्या आरोपास मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी जोरदार उत्तर देत आंधळ्याशी जग आंधळे, तया जग खोटे असा संत तुकारामाच्या अंभागातून मुख्यमंत्र्यांनी विरोधकांवर पलटवार करत टीका करायची असेल तर खुशाल करा पण महाराष्ट्राची बदनामी करू नका असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

सुधीर भाऊ (मुनगंटीवार) आपण बोलत होतात. त्यातील काही मी ऐकलं पण मी ते बघत असताना काही काळ मला जाणवलं की नटसम्राट बघत असल्याचं मला जाणवलं, मी अथेल्लो, हॅम्लेट, मी नटसम्राट सारखे आपण बोलत होतात. तसेच मला नटसम्राटासारखे  कोणी किंमत देता का किंमत असे विचारत असल्यासारखे वाटत होते. सुधीर भाऊ तुम्ही खुपच छान बोललात. तुमची कला अशी वारंवार उफाळून येते ही कला मारू नका अशी मिश्किल टिप्पणी करत मुनगंटीवार यांच्या आवेशावर मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी टोला लगावला.

राज्यपालांचे भाषण सर्वांनी ऐकले. त्यांनी ते संपूर्ण पणे मराठीत केले. त्यासाठी त्यांना धन्यवाद देतोय. त्यातील शिवभोजन थाळीच्या उल्लेखावरून सर्वांनी मस्करी केली. त्यामुळे राष्ट्रपतींचे भाषण पाहिले त्यात त्यांनी केंद्र सरकारने ८० कोटी रूपये गरीबांना मोफत ५ किलो धान्य देण्यासाठी खर्च केल्याचा उल्लेख केला. त्यानंतर मग या गरीब लोकांच्या आयुष्यात असे काय घडले की त्यांची परिस्थिती बदलली. आधीच महागलेल्या गॅसची खरेदी करण्यासाठी या गरीबांनी सुरुवात केली का? गरीबांसाठी आम्ही थाळी देतो, मात्र ती वाजवित नाही. तुम्ही मात्र वाजविली. म्हणून जनतेने तुमची वाजविली असा उपरोधिक टोला विरोधकांना त्यांनी लगावला.

कर्नाटक सीमावादावर तुम्ही आमच्या सोबत असल्याचे जाहिर केलात. त्याबाबत आपणास कर्नाटक व्याप्त मराठी माणसांच्यावतीने तुमचे धन्यवाद सांगत फडणवीसांचे आभार मानले. तसेच हा वाद संपविण्यासाठी आपण दोघे मिळून कर्नाटक सरकारकडे जावू केंद्रात जावू आणि हा सीमावाद संपवून तेथील मराठी जनतेला आनंद देवू असे आवाहनही त्यांनी यावेळी केले.

परवा मराठी भाषा दिन झाला. या मराठी भाषेला अभिजात दर्जा देण्यासाठी जे काही करायचाय ते केले आहे. मात्र केंद्रात बसलेले त्यांनी यासाठी काहीही केलेले नाही. माझी मातृभाषा आहे, ती छत्रपतींची भाषा आहे. असे असतानाही तीला केंद्रातील सरकारने दरवाज्याबाहेर तिष्ठत का ठेवलेय ? असा सवाल करत माझी मराठी भाषा भिकारी आहे का? जर छत्रपती नसते तर जे दिल्लीत बसलेत ते तरी दिसले असते का? असा खोचक सवाल करत हा करंटेपणा महाराष्ट्र कदापी विसरणार नाही असा इशारा त्यांनी विरोधकांना दिला.

औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर करणार

स्वा. सावरकर यांच्याबाबत सातत्याने विरोधक बोलत असतात. त्यांना भारतरत्न द्या  म्हणून पत्र दोन वेळा गेलेय. पण भारतरत्न कोण देतेय? त्यासाठी आमदारांची कमिटी आहे का? असा खोचक टोला विरोधकांना लगावत तुमचे हिंदूत्व म्हणजे जे तयार आदर्श असतात त्यांना आपले म्हणायचे आणि त्यावर आपली राजकिय पोळी भाजायची असे तुमचे हिंदूत्व आहे. ज्या ठिकाणी भारतीय क्रिकेट टीम एकही मॅच हारत नाही त्या स्टेडियमला सरदार वल्लभभाई पटेल यांचे नाव होते. ते नाव काढून स्वतःचे नाव लावायचे असे कसे चालेल. पण तुम्ही ते केलात. आमच्याबद्दल मात्र औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर कधी असा सवाल करता परंतु आम्ही औरंगाबादचे संभाजीनगर नामांतर करणार कोण म्हणतय करणार नाही असे सांगत औरंगाबादचे नामांतर करणार असे त्यांनी विरोधकांना निक्षूण सांगितले.

भाषणात यमक आणि गमक असायला हवं असे फडणवीस म्हणतात. यमक आणि गमक बरोबर काम करण्याची धमकही असायला हवी. आणि ती धमक आमच्यात आहे असे सांगत कृपा करून मिथ्या आता तरी सोडून द्या असा उपरोधिक टोला त्यांनी लगावला.

काही दिवसांपूर्वी भंडारीची कथा सांगितली गेली. तो भंडारी असा खोचक प्रश्न मुख्यमंत्र्यांनी विरोधकांना उद्देशून विचारला. त्यावेळी सत्ताधारी बाकावरील सदस्यांनी नारायण असा असल्याचे म्हणाले त्यावर पुन्हा मुख्यमंत्र्यांनी माधव कि नारायण असा उल्लेख करत विरोधकांना डिवचले. त्यानंतर नारायण भंडारी याची कथा ऐकवित असे नारायण भंडारी प्रत्येक गावात असतात असे सांगितले. त्यावर भाजपाच्या आमदारांनी आक्रमक पवित्रा घेत मुख्यमंत्र्यांचा एकेरी केला. त्यावर सत्ताधारी आणि विरोधी बाकांवर तणावाची परिस्थिती निर्माण झाली. परंतु विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी याबाबत दिलगीरी व्यक्त करत हा वादावर पडदा टाकला.

माझ्या ऑनलाईनचा उल्लेख केला. त्यामुळे मी जनतेच्या घरातील सदस्य झाल्याचे लोक मानायला लागले. माझे कुटुंब माझी जबाबदारी ही योजना राबविली, त्याचा उपयोग आता होतोय. कोरोनाबाबत सगळंच काही लोकांवर सोपवित नाही. तर हा आजार थोपविण्यासाठी सरकार खबरदारी घेत असल्याचे सांगत जगातलं सर्वात मोठे हॉस्पीटल आपण केले. तसेच संसर्ग रोखण्यासाठी ज्या काही गोष्टी आहेत त्या गोष्टी केल्याचे सांगितले.

काही दिवसांपूर्वी केंद्राचे कोविड पाहणीचे एक पथक महाराष्ट्राच्या दौऱ्यावर आले होते. त्यांनी करत असलेल्या कामाचे दोन वेळा स्तुती केली. मात्र त्यांनी अहवाल चुकीचा दिला. तेव्हा मी चौकशी केली त्या डॉक्टरांबद्दल तेव्हा कळलं की हे डॉक्टर वैद्यकीय क्षेत्रातील नसून अर्थशास्त्रातील आहेत. आता मला सांगा, कोविड पथकात अर्थशास्त्राच्या डॉक्टरचे काय काम? पण ते आले आणि त्यांनी पाहणी करून अहवाल दिला. त्या अहवालावर आता किती विश्वास ठेवायचा हे आता तुम्हीच ठरवा असा पलटवार करत विरोधकांच्या आरोपातील हवा काढून घेत राज्यातील रूग्णांची संख्या, मृतकांची संख्या आपण लपविली नाही. म्हणून ती जास्त दिसत आहे. इतर राज्यांप्रमाणे ती आपण लपविली नसल्याचे सांगत आम्ही खरं सांगतो आणि बोलतो असे त्यांनी स्पष्ट केले.

लॉकडाऊनमध्ये जेव्हा रहदारी बंद करण्याची गरज होती. त्यावेळी सुरु करण्यात आली. त्यामुळे मजूरांचे तांडे आपल्या गावाकडे चालले. परंतु आम्ही त्यांच्यावर जुलम-जबरदस्ती केली नाही. त्यांच्यासाठी तीन वेळच्या अन्नाची व्यवस्था केली. त्याबाबत कोणीच बोलणार नाही. आम्हाला जाब, हिशोब विचारताय जरूर विचारा पण तिकडे स्थापन केलेल्या पीएम केअर फंडाचा हिशोब कोण देणार, त्यांना प्रश्न विचारण्याची हिम्मत नाही. जरी प्रश्न विचारला तर त्याचे उत्तर देण्यास ते बांधील नाहीत. मात्र प्रश्ना विचारला की तुम्ही देशद्रोही अशी तुमची लोकशाही असा उपरोधिक टोलाही केंद्रातील भाजपा सरकारला लगावला.

संसर्गाची साखळी तोडण्यासाठी लॉकडाऊन हा प्रभावी पर्यायी आहे. पण आम्हाला कोणाची चुल बंद करायची नाही. केंद्राने गॅसच्या किंमती वाढल्याने पुन्हा चुलीकडे आलोय म्हणून चुलीचा उल्लेख केला. गरीबांना गॅस परवडत नाही. पण केंद्राच्या योजनेचा नुसता धुर येतोय ही तुमची आत्मनिर्भरता असा टोलाही त्यांनी लगावत लॉकडाऊन आता पुन्हा 0 परवडणारा नसल्याचे सांगत लॉकडाऊनची शक्यता त्यांनी फेटाळून लावली.

मी जबाबदार ही मोहिम हे उघडा, ते उघडा म्हणणाऱ्यांसाठी आहे. कोरोना सत्ताधारी आणि विरोधक असा भेद करत नाही. त्यामुळे ज्यांना वाटत नाही त्यांनी मास्क वापरू नये ज्यांना वाटते त्यांनी मास्क बरोबर त्रीसुत्रीचा वापर करावा असे आवाहन करत भले मला व्हिलन ठरविले तरी मी जनतेच्या हिताची काळजी घेणारच असे सांगून मी जनतेशी बांधील आहे. कोरोनावरून कृपया राजकारण करू नका असे आवाहनही त्यांनी यावेळी केले. कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी लसीकरणाची केंद्रे मोजकी न ठेवता खाजगी रूग्णालयांमध्येही ही सुविधा उपलब्ध करण्यासंदर्भात केंद्राकडे मागणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

हेच का तुमचे हिंदुत्व?

शेतकरी आंदोलनात मृत्यूमुखी पडलेल्यांना आदरांजली वाहिलीच पाहिजे. तिकडे जे शेतकरी आहेत त्यांची वीज, पाणी तोडलं जातंय. जे ताराचे कुंपण सीमेवर असायला हवे होते ते दिल्लीच्या सीमेवर आहे. शेतकऱ्यांसाठी खिळे आणि सीमेवर चीन दिसल्यानंतर पळे अशी अवस्था तुमची असल्याचे सांगत तुमची मातृसंस्था जी आहे ती कधीही स्वातंत्र्याच्या चळवळीत नव्हती असा आरएसएसचा नामोल्लेख टाळत त्यांनी टीका केली. तसेच शेतकऱ्यांना तुम्ही ताटकळत ठेवत असाल तर तुम्हाला भारत माता की जय म्हणण्याचा अधिकार नसल्याची टीकाही त्यांनी केली.

वेगळा विदर्भ नाहीच.. 

जस शेतकरी आमदनी दुगनी होईल असे सांगत होते म्हणून शेतकरी वाट बघतायत पण ती काही झालीच नाही. त्यामुळेच जे विकेल तेच पिकेल हे धोरण राज्य सरकारने स्विकारले असून त्यानुसारच ही योजना राबविण्यात येत आहे. विदर्भाचे माझ्या आजोळचे म्हणालं तर विदर्भ वेगळा होणार नाही असे निक्षून सांगत विदर्भाला सोबत ठेवून महाराष्ट्राचा एकत्रित विकास करणार असून माझं आजोळ माझ्यापासून तोडू नका असे भावनिक आवाहनही त्यांनी यावेळी केले.

अयोध्या आणि काश्मीर पंडीतासाठी शिवसेनाच

फडणवीस म्हणाले होते की, येथे येरे गबाळ्याचे काम नाही जेव्हा अयोध्येतील मस्जिद पाडली त्यावेळी सगळे पळून गेले होते. त्यावेळी एकटे बाळासाहेब होते. काश्मीरमधील निर्वासीत पंडीत पळून जात होते. तेव्हाही बाळासाहेबच होते. काश्मीरातील किती निर्वासितांना तुम्ही घरे दिली ते सांगा असे आवाहन देत हे काय काम येरा गबाळ्याचे नव्हते असा टोलाही त्यांनी फडणवीस आणि विरोधकांना लगावत आधी त्याचा हिशोब द्या मग हिंदूत्वावर बोला असे आव्हानही त्यांनी यावेळी विरोधकांना दिले.

मागील वेळीही तुम्हीच आमच्याबरोबरची युती तोडली. त्यानंतर बोलणी करायला आल्यानंतर फडणवीस यांना दरवाज्याच्या बाहेर का उभा ठेवले ? मला माहित नाही. पण अमित शाह आणि मी आत होता. त्यांनी आत शब्द दिला आणि त्यानंतर पुन्हा तुम्ही आमची फसवणूक करताय हे तुमचं हिंदूत्व का पहिल्यांदाही तुम्हीच फसवलं, आता ही पुन्हा तुम्हीच फसवताय असा टोलाही त्यांनी लगावला.

शर्जील उस्मानी ही उत्तर प्रदेशची घाण असून ती इथली घाण नाही. राम मंदीराचा पाया इतका ठिसूळ असेल तर राम मंदीर कसे बांधणार असा खोचक सवालही त्यांनी यावेळी उपस्थित केला. संघमुक्त भारत म्हणणाऱ्यांना तुम्ही डोक्यावर घेवून मुख्यमंत्री बनवताय, पासवानांना मांडीवर घेवून येरे माझ्या बाळा म्हणून बोलताय हे तुमच हिंदूत्व असा टोलाही त्यांनी लगावला.

शेतकऱ्यांसाठी जलयुक्त शिवार योजना होती.अंमलबजावणी केलेल्या जिल्ह्यामध्ये अंदाजापेक्षा कमी साठवण, ८३ गावात साठवण क्षमता नव्हती असा ठपका समितीने दिलाय हेच का तुमचं जलयुक्त शिवार योजना आणि हेच का शेतकरी प्रेम असा टोलाही त्यांनी यावेळी लगावला.

मेट्रोसाठी कांजूरच योग्य

आरे बद्दल असे आहे की मेट्रो-३ चा खर्च १० हजार कोटींनी वाढली. त्याला स्थगिती दिली नसताना. खर्च करण्या आधी या सगळ्या गोष्टी त्यात नव्हत्या. कालवे काढले पण धरण नाहीत अशी अवस्था नसल्याचे सांगत डेपोचा पत्ता नाही. देवेंद्रजी प्रश्न प्रतिष्ठीत करू नका. कांजूरची कनेक्टीव्हीटीथेट कल्याण अंबरनाथ पर्यत जाणार आहे. जागेच्या मालकीचा प्रश्न कोर्टात आहे. तसेच केंद्रातही आहे. जमिन आणि प्रकल्प हे दोन्ही सरकारच्या खर्चातून होणार असेल तर तुच-माझं असे म्हणण्यात काय हाशील त्यापेक्षा दोन्ही सरकारने मिळून हा प्रकल्प पूर्ण करू असे आश्वासन देत यात कृपया राजकारण करू नका असे आवाहनही त्यांनी केले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी विं.दा. करंदीकरांची ही लाट आहे तु गाजवून घे ही कविता वाचून सांगत संत तुकाराम यांच्या अंधाळ्याशी जग अंधाळे, तया जय अवघे खोटे हा अंभग वाचून दाखवित फडणवीसांना उत्तर देत आपले भाषण संपविले.

Check Also

कर्जबुडव्या कारखान्यांना पायघड्या, संकटग्रस्त सामान्यांची उपेक्षा! भाजपा मुख्य प्रवक्ते केशव उपाध्ये यांची ठाकरे सरकारवर टीका

मुंबईः प्रतिनिधी सहकारी साखर कारखान्यांनी व अन्य सहकारी संस्थांनी थकविलेली ३८०० कोटींची देणी सरकारी तिजोरीतून …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *