पुसदः प्रतिनिधी
मराठा आरक्षणाच्या प्रश्नावर मराठा समाजाने राज्यभर क्रांती मोर्चे काढले. या दरम्यानच्या काळात शिवसेनेचे मुखपत्र असलेल्या सामना या दैनिकात क्रांती मोर्चाचे विडंबन होणारे व्यंगचित्र प्रकाशित करण्यात आले. या व्यंगचित्रप्रकरणी पुसद न्यायालयाने शिवसेना पक्षप्रमुख उध्दव ठाकरे, दै.सामनाचे संपादक संजय राऊत आणि व्यंगचित्रकार श्रीनिवास प्रभुदेसाई, राजेंद्र भागवत यांच्याविरोधात पुसद न्यायालयाने अटक वॉरंट जारी केले.
दै.सामना मध्ये प्रसिध्द झालेल्या त्या व्यंगचित्रामुळे मराठा समाजाच्या भावना दुखावल्या गेल्या. त्यावेळी सबंध मराठा समाजाने शिवसेनेवर टीकेची झोड उठवित माफी मागण्याची मागणी केली होती.
त्यावर उध्दव ठाकरे यांनी मराठा समाजबांधवासोबत शिवसेना असल्याचे जाहीर करून याप्रश्नी माफी मागत याप्रकरणावर पडदा टाकण्याचा प्रयत्न केला. तरीही पुसद येथील न्यायालयात याप्रकरणी दत्ता सुर्यवंशी यांनी याचिका दाखल केली. याप्रकरणी पुसद न्यायालयाने ठाकरे, राऊत, प्रभुदेसाई यांना समन्स बजाविले होती. परंतु तरीही उध्दव ठाकरे हे न्यायालयात उपस्थित राहीले नसल्याने अखेर न्यायालयाने ठाकरे यांच्यासह चार जणांविरोधात अटक वॉरंट जारी केले.
