Breaking News

तंबाखूमुक्त महाराष्ट्र करूया आरोग्य मंत्री एकनाथ शिंदे आवाहन

मुंबई : प्रतिनिधी
जागतिक तंबाखू विरोधी दिनाचे औचित्य साधून महाराष्ट्र तंबाखुमुक्त करण्याच्या दिशेने आपण कार्य करावयास हवे. तंबाखू विरोधी अभियान ही एक चळवळ म्हणून कायमस्वरूपी रूजविणे गरजेचे असल्याचे आवाहन आरोग्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केले.
येथील यशवंतराव चव्हाण प्रतिष्ठान, मुंबई येथे जागतिक आरोग्य संघटना व सलाम मुंबई फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने “जागतिक तंबाखू विरोधी दिन राज्यस्तरीय सोहळ्याचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाचे उद्घाटन आरोग्यमंत्री शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले.
आरोग्यमंत्री म्हणाले की, भारतात साधारणतः आठ ते नऊ लक्ष व्यक्ती तंबाखूमुळे दगावतात. तंबाखूजन्य पदार्थाच्या सेवनामुळे होणाऱ्या कर्करोग, उच्च रक्तदाब, मधुमेह, नपुंसकत्व यासारख्या गंभीर आजारांबाबत जनजागृती राज्य शासन करीत असून पानाच्या दुकानांमध्ये तंबाखूजन्य पदार्थांसोबतच अन्य खाद्य पदार्थ, शीतपेये, चॉकलेट व बिस्किटे या पदार्थांच्या विक्रीवर बंदी घातली आहे.
राष्ट्रीय असंसर्गजन्य रोग कार्यक्रमांतर्गत राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रम राज्यात सन २०१७-१८ पासून राबविण्यात येत असून, २०१७ च्या गॅट्स-२ ( ग्लोबल ॲडल्ट टू टोबॅको) या सर्वेक्षणानुसार महाराष्ट्र सर्वात कमी धूम्रपान करणारे राज्य म्हणून पुढे आल्याचे त्यांनी सांगितले.
राष्ट्रीय तंबाखू नियंत्रण कार्यक्रमांतर्गत आत्तापर्यंत राज्यभरात ३७४ तंबाखूमुक्ती केंद्रांची स्थापना करण्यात आली असून ८०४ आरोग्य संस्था तसेच दोन हजार ७५५ शाळा तंबाखूमुक्त करण्यात आल्या आहेत. आपणा सर्वांच्या प्रयत्नाने या आकड्यांमध्ये वाढ होऊन राज्य तंबाखूमुक्त होईल, अशी अपेक्षाही त्यांनी व्यक्त केली.
रेल्वे प्रशासन, अन्न्‍ व औषध प्रशासन, पोलिस प्रशासन व आरोग्य संस्था या कार्यात अग्रभागी असून, हे अभियान शहरी भागापासून ग्रामीण भागापर्यंत पोहचविण्यात येत आहे. मौखिक आरोग्य मोहिमेत सहभागी होण्याचे आवाहन त्यांनी केले.
डॉ. अनुप कुमार यादव म्हणाले, सार्वजनिक आरोग्य विभाग, सलाम मुंबई फाउंडेशन आणि जागतिक आरोग्य संस्थेच्या संयुक्त विद्यमाने सुरू असलेल्या या कार्यामुळे लवकरच राज्य तंबाखुमुक्त करण्यात यश प्राप्त होणार आहे. आजतागायत मौखिक आरोग्य मोहिमेअंतर्गत २ कोटी लोकांची तपासणी करण्यात आली आहे. यंदाचे तंबाखू विरोधी दिनाचे घोषवाक्य देखील तंबाखू आणि फुफ्फुसा संबंधित आरोग्यावरील दुष्परिणाम असेच आहे. आपण आपल्या आजुबाजुला तंबाखू सेवन करणा-यांना रोखण्यासाठी प्रयत्न करूया कारण त्यांच्या धुम्रपानाचा परिणाम आपल्या आरोग्यावर सर्वात जास्त होत असतो.
कार्यक्रमाच्या सुरुवातीस फुफ्फुसाच्या प्रतिकाचे अनावरण आरोग्यमंत्र्यांच्या हस्ते करण्यात आले. जनजागृतीपर रॅलीला प्रधान सचिव डॉ. प्रदिप व्यास यांनी झेंडा दाखवून रॅलीची सुरुवात करण्यात आली. कार्यक्रमादरम्यान तीन हजार विद्यार्थ्यांनी ई सिगारेट विरूद्ध स्वाक्षरी मोहीम राबविली होती. ही ई सिगारेट बंद करण्यासाठीचे निवेदन यावेळी देण्यात आले. पेन्सीलच्या प्रतिकाने ई-सिगारेट नष्ट करण्यात आली आणि विद्यार्थ्यांच्या हातात ई हुक्का किंवा सिगारेट न येता पेन आणि पेन्सील येऊन देशाचे भवितव्य घडविण्याचे आवाहन विद्यार्थ्यांना यावेळी करण्यात आले.

Check Also

नवजात बालक मृत्यू प्रमाण कमी करण्यासाठी समिती नेमणार

नवजात बालकांचा मृत्यूचे प्रमाण कमी करण्यासाठी तसेच त्यावर उपाययोजना सुचविण्यासाठी सार्वजनिक आरोग्य विभागाच्या मुख्य सचिव …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *