Breaking News

बदली तर झाली पण महिना झाला तरी अधिकाऱ्यांना मंत्रालयात पोस्टींग मिळेना पोस्टींग मिळेना म्हणून अधिकारी जून्याच विभागात कार्यरत

मुंबई: विशेष प्रतिनिधी

राज्याचे मुख्यालय असलेल्या मंत्रालयातील अधिकाऱ्यांच्या मोठ्या प्रमाणावर पदोन्नतीमुळे  आणि कालावधी पूर्ण झाल्याने बदल्या करण्यात आल्या. विशेष म्हणजे या बदल्या करताना सामान्य प्रशासन विभागाने पर्यायी अधिकाऱ्याची वाट न पाहता बदली झालेल्यांना तात्काळ कार्यमुक्त करावे असे सक्त आदेश बजावत बदली झालेल्या ठिकाणी तात्काळ रूजू करावे असे स्पष्ट निर्देश दिलेले असतानाही ४ सहसचिव आणि २ उपसचिवांना बदली होवून २५ दिवस झाले तरी अद्याप पोस्टींग न मिळाल्याने तिष्ठत थांबावे लागल्याची माहिती पुढे आली आहे.

मंत्रालयातील प्रशासनाचा गाडा हाकणाऱ्या सामान्य प्रशासन विभागाने ३० ऑगस्ट २०२१ रोजी २६ उपसचिव आणि सहसचिवांच्या बदल्यांचे आदेश जारी केले. यातील बहुसंख्य अधिकाऱ्यांना त्या त्या विभागांनी कार्यमुक्त केले तर बदली झालेल्या कार्यालयांनी त्यांना रूजू करून घेत त्यांना पोस्टींगही दिली. मात्र यातील ४ सहसचिव आणि २ उपसचिवांच्या बाबत मात्र या सगळ्याच गोष्टींचा अपवाद ठरल्याचे दिसून येत आहे.

बदली झालेल्यांमध्ये अ.ना.वळवी हे उपसचिव असून त्यांची बदली सामान्य प्रशासन विभागातून गृह विभागात करण्यात आली. मात्र त्यांना अद्यापही गृह विभागात रूजू करून घेण्यात आले नाही. त्यांच्या पाठोपाठ यु.ब.अजेटराव हे उपसचिव असून त्यांची गृह विभागातून सामान्य प्रशासन विभागात बदली करण्यात आली आहे. परंतु अजेटराव यांना अद्याप गृह विभागातून कार्यमुक्तच करण्यात आलेले नसल्याने ते अद्यापही गृह विभागातच काम करत आहेत.

तरस सु.सं.धपाटे हे सहसचिव पदावर कार्यरत असून यांची कृषी व पदुम विभागातून गृह विभागात बदली करण्यात आली. यांनाही अद्याप गृह विभागात रूजू करून घेण्यात आले नाही. तर याशिवाय प्र.का.साबळे सहसचिव यांची गृह विभागातून सार्वजनिक बांधकाम  विभागात बदली करण्यात आली. परंतु यांनाही सार्वजनिक विभागात अद्याप पोस्टींग मिळालेली नाही. याशिवाय सहसचिव कै.अ.गायकवाड यांची गृहनिर्माण विभागातून सहकार,  पणन व वस्त्रोद्योग विभागात करण्यात आली. परंतु यांना तर सहकार, पणन व वस्त्रोद्योग विभागात अद्याप रूजू करून घेण्यात आले नाही.

याशिवाय सहसचिव अ.ए.कुलकर्णी यांची सार्वजनिक बांधकाम विभागातून गृह विभागात बदली करण्यात आली. मात्र यांनाही अद्याप गृह विभागात रूजू करून घेण्यात आले नाही. तसेच सहसचिव रा.वि.कुलकर्णी यांचीही सामान्य प्रशासन विभागातून गृह विभागात बदली करण्यात आली. परंतु यांनाही अद्याप पोस्टींग देण्यात आली नसल्याने हे सहा ही अधिकारी सध्या कोणत्याही पोस्टींगशिवाय रिकामेच असल्याचे मंत्रालयातील एका अधिकाऱ्याने सांगितले.

प्रशासनात उपसचिव आणि सहसचिव पदावरील निर्णय प्रक्रियेत महत्वाची भूमिका बजावत असतानाही असे बदली झालेले अधिकारी कोणत्याही पदाशिवाय रिक्त कसे राहु शकतात असा सवाल मंत्रालयातील अधिकाऱ्यांमध्ये सुरु झाली आहे. सामान्य प्रशासन विभाग हा थेट मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्या अधिपत्याखाली असूनही त्यांच्याच विभागाने दिलेल्या आदेशाला जर विविध विभागाकडून केराची टोपली दाखविली जात असेल तर सामान्य प्रशासन विभागाचा इतर विभागांवर वचक राहीला नाही का ? असा सवालही उपस्थित करण्यात येत आहे.

Check Also

WhatsApp वर ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी, येत आहे हे नवे फिचर व्हाईस आणि व्हिडिओ कॉल शॉर्टकट मध्ये उपलब्ध

मुंबई: प्रतिनिधी ग्रुप कॉल करणाऱ्यांसाठी व्हॉट्सअॅपने आनंदाची बातमी दिली आहे. नवीन फिचर्समुळे ग्रुप कॉल करणं …

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *