२०१४ साली झालेल्या देशातील सत्तांतरानंतर भाजपाचा दबदबा संपूर्ण देशभरात वाढला. तर दुसऱ्याबाजूला केंद्रातील भाजपा सरकारकडून लोकशाहीवादी लोकांच्या व्यक्ती स्वातंत्र्यांवर गदा येण्यास सुरुवात झाली. तसेच संपूर्ण सामाजिक जीवनाला वळण देणाऱ्या गोवंश हत्या, पाकिस्तानच्या अनुशंगाने सुरु झालेल्या राजकारणाच्या माध्यमातून देशात मुस्लिम विरोधी वातावरणाला मिळणारे खतपाणी आदी मुळे देशात पहिल्यांदाच मोदी भक्त विरूध्द लोकशाहीवादी असा संघर्ष सुरु झाल्याचे चित्र २०१९ पर्यंत पाह्यला मिळाले.
यातील जो महत्वाचा पहिला संघर्ष राजकिय पक्षाच्या नेतृत्वाचा होता. परंतु तो २०१४ साल उजाडण्यापूर्वीच सुरुही झाला आणि २०१४ च्या सुरुवातीला संपुष्टात आला. भाजपामधील पीएम इन वेटींग म्हणून ओळखल्या जाणारे लालकृष्ण अडवाणी यांच्याकडे असलेले पक्षाचे नेतृत्व काढून ते नेतृत्व त्यावेळचे गुजरातचे मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांच्याकडे सोपवित आगामी पंतप्रधान पदाचे प्रमुख दावेदार म्हणून निवड करण्यात आली. त्यानंतर ज्या पध्दतीने देशाच्या राजकारणातून भाजपाचे ज्येष्ठ नेते लालकृष्ण अडवाणी हे गायब झाल्याचे पाह्यला मिळाले.
या घटनेचा संदर्भ तांडव या वेबसीरिज मध्ये तो पूर्णतः वेगळ्या पध्दतीने अर्थात खून प्रकरणातून दाखविण्यात आला. याच अनुषंगाने गुजरातमध्ये घडलेल्या खोट्या चकमकी घडवून आणत करण्यात आलेल्या खूनांचा संदर्भही या सीरीजमध्ये दाखविण्यात आला.
या वेबसीरीजमध्ये यानंतर दाखविण्यात आलेल्या नाट्यात जो सत्तासंघर्ष दाखविण्यात आला, त्या संघर्षात विद्यार्थी नेत्यापासून ते प्रसारमाध्यमांचा वापर राज्यकर्त्यांकडून कसा सुनियोजित पध्दतीने करत माध्यमांना बटीक म्हणून ठेवण्यात येत असल्याबाबतचे चित्र विविध घटनांमधून अगदी ठळक घटनांमधून दाखविण्यात आले.
विशेष म्हणजे मागील पाच वर्षाच्या कालावधीत एखाद दुसऱ्या प्रसारमाध्यमांचा अपवाद वगळता अनेक प्रसारमाध्यमे विद्यमान राज्यकर्त्यांच्या वळचणीला बांधल्याचे चित्र सर्वच जण पहात आहेत.
मागील पाच वर्षात नवी दिल्लीतील जवाहरलाल नेहरू विद्यापीठात विद्यार्थ्यांच्या विरोधात करण्यात केंद्र सरकारने केलेली कारवाई, त्यावरून संबध देशभरात निर्माण झालेले वातावरण आदी गोष्टींचा संदर्भ वापरत सत्तेच्या संघर्षात युवकांचा कशा पध्दतीने वापर करून घेण्यात येतो. तसेच स्वपक्षातील राजकिय विरोधकाला सोशल मिडीयाच्या माध्यमातून कसे संपविले जाते किंवा त्याचे राजकिय कारकिर्द कशी उध्दवस्त केली जाते, त्यासाठी ट्रेंड कसा सुरु केला जातो, आयटी सेल कशी काम करते यासह अनेक गोष्टींचा सध्याच्या राजकारणात सुरु असलेला वापर अंत्यत चोख पध्दतीने दाखवित सध्याच्या राज्यकर्त्ये अर्थात सत्ताधाऱ्यांकडून विरोधकांना संपविण्यासाठी कशा पध्दतीने वापरली जात आहे याचे प्रात्यक्षिकच या वेबसीरीजमध्ये दाखविण्यात आली.
त्याशिवाय देशात लोकशाही असली तरी राजकारणात सत्ताकारण सांभाळताना त्याचे अवमुल्यन किंवा मुल्यांशी प्रतारणा कशी जाते याचे काही संदर्भही विद्यमान परिस्थितीतून घेण्यात आले. ते सर्व संदर्भ सूचक घटनांमधून तांडव सीरीज मधून दाखविण्यात आले आहे.
विशेष म्हणजे हि सीरीज पाहताना मागील पाच वर्षातील अनेक घटनांची उजळणी करण्याची संधी आपल्याला मिळते. त्यामुळे या सीरीजच्या माध्यमातून एकप्रकारे भाजपाने केलेल्या सत्तेसाठी कुरघोड्याच आपल्याला एकप्रकारे मिळतात. त्याचबरोबर राज्यघटनेने एक मत एक मुल्य अशी रचना करत धर्म-जातींमुळे होणारा भेदभाव संपुष्टात आणण्यात आला. परंतु वास्तवात सत्तेच्या राजकारणातही जातीयता कशी पाळली जाते यांचे बोलके चित्रणही यात करण्यात आले. त्यामुळे या वेबसीरीजला थेट विरोध भाजपाला करता आला नाही. त्यासाठी एका प्रसंगामध्ये रूग्णालयात दोन मुर्त्या दाखविण्यात आल्या. तसेच काही संवादात हरयाणवी शिवीगाळ केल्याचे दाखवित काही संदर्भ देण्यात आले. मात्र या दोन्ही संदर्भ घटनांमध्ये अवहेलनात्मक सुर दिसला नाही. परंतु भाजपाच्या नेत्यांना या सर्व संदर्भांना थेट विरोध करता येणे आवाक्याबाहेरचे झाल्याने कदाचित देवी-देवतांची नावे चुकिच्या नावे वापरण्यात आल्याचा आरोप करत ही सीरीज बंद करण्याची मागणी करण्यात आली.
मात्र ही वेबसीरीज पाहताना मागील पाच वर्षातील प्रमुख घटनांचा इतिहास नकळत डोळ्यासमोर जातो.
गिरिराज सावंत-gsawant2001@yahoo.co.in